हिरव्या आणि भगव्याच्या मध्ये खाकी खंबीरपणे उभी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2022 08:00 AM2022-05-06T08:00:00+5:302022-05-06T08:00:07+5:30
आम्ही सामंजस्याच्या भूमिकेत आहोत. मात्र, कुणी जोरजबरदस्ती करून कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचे काम करत असेल तर त्यांना आयुष्यभर लक्षात राहील, असा धडा शिकवू, असा सज्जड इशारा पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी आज पत्रकारांशी बोलताना संबंधितांना दिला.
नागपूर - हिरव्या आणि भगव्याच्या मध्ये खाकी खंबीरपणे उभी आहे. कुणी जिंकले अन् कुणी नमले, असे मानण्याचे कारण नाही. आम्ही सामंजस्याच्या भूमिकेत आहोत. मात्र, कुणी जोरजबरदस्ती करून कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचे काम करत असेल तर त्यांना आयुष्यभर लक्षात राहील, असा धडा शिकवू, असा सज्जड इशारा पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी आज पत्रकारांशी बोलताना संबंधितांना दिला.
आम्ही ईदमुळे शांत होतो. आता सर्व धर्मांच्या, पक्षाच्या प्रमुखांशी आमची निरंतर चर्चा सुरू आहे. कायदा सर्वांसाठीच सारखा आहे. यांच्यासाठी वेगळा अन् त्यांच्यासाठी वेगळा, असा नियम लावता येणार नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी मंदिर-मशीद आणि इतर प्रार्थनास्थळासोबतच मंगल कार्यालये, सभागृह अन् लॉनमधील भोंग्यांवरही लागू होणार आहे. रात्री १० ते सकाळी ६ या वेळेत शांतता सर्वांनाच पाळावी लागणार आहे. त्यासंबंधाने आम्ही सर्व बाजूने विचारविमर्श करीत आहोत.
जातीय सलोखा, कायदा व सुव्यवस्थेला सर्वोच्च प्राधान्य
जातीय सलोखा आणि कायदा व सुव्यवस्थेची स्थिती उत्तम राहावी, याला पोलिसांचे सर्वोच्च प्राधान्य आहे. त्यासाठी सर्वांसोबत आमची चर्चा सुरू आहे. मात्र, यात कुणी कुरघोडी अथवा उपद्रव करण्याचा प्रयत्न करून तेढ निर्माण केल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असेही आयुक्तांनी स्पष्ट केले. यावेळी अजान सोबतच काकड आरतीपासून प्रार्थना, आरतीपर्यंतची चर्चा झाली.
परवानगीची मागणी वाढली
ध्वनिप्रदूषणाची मर्यादा पाळूनही भोंगे, डीजे ज्या ठिकाणी वाजवायचे, त्यांना परवानगी आवश्यक करण्यात आली आहे. त्यामुळे अशी परवानगी मागणारे अर्ज पोलीस आयुक्तालयात येणे सुरू झाले आहे. बुधवारी सायंकाळपर्यंत ७४ अर्ज पोलिसांकडे आले. आजही अर्ज येणे सुरू होते, असे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी पत्रकारांना सांगितले.
तर अनेकांच्या रोजगारांवर संक्रांत
लाउडस्पीकर, डीजे संदर्भातील निर्णय कठोरपणे अमलात आणला गेल्यास अनेकांच्या रोजगारावर संक्रांत येण्याची भीती आहे. लाउडस्पीकरवाल्यांचा धंदा मंडप डेकोरेशनशी कनेक्ट आहे. डीजेही त्यासोबत जुळला आहे. मंगल कार्यालये, सभागृह अन् बॅण्डवाल्यांनाही त्याची झळ पोहचण्याची भीती आहे.
----