‘खली’ला अर्धांगवायूने ग्रासले : गोरेवाडा रेस्क्यू सेंटरमध्ये उपचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 23:46 IST2021-05-10T23:44:20+5:302021-05-10T23:46:54+5:30
Tiger Khali paralyzed ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील सुप्रसिद्ध ‘खली’ या वाघाला अर्धांगवायूने ग्रासले आहे. रविवारी रात्री त्याला गोरेवाड्याला आणण्यात आले असून, सध्या त्याच्यावर नागपुरातील गोरेवाडा रेस्क्यू सेंटरमध्ये उपचार सुरू करण्यात आले आहेत. त्याच्या शरीराच्या मागील बाजूला असलेली जखम लक्षात घेता, एखाद्या वाहनाच्या धडकेमध्ये तो जखमी झाला असावा, अशी शक्यता वर्तविली जात आहे.

‘खली’ला अर्धांगवायूने ग्रासले : गोरेवाडा रेस्क्यू सेंटरमध्ये उपचार
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील सुप्रसिद्ध ‘खली’ या वाघाला अर्धांगवायूने ग्रासले आहे. रविवारी रात्री त्याला गोरेवाड्याला आणण्यात आले असून, सध्या त्याच्यावर नागपुरातील गोरेवाडा रेस्क्यू सेंटरमध्ये उपचार सुरू करण्यात आले आहेत. त्याच्या शरीराच्या मागील बाजूला असलेली जखम लक्षात घेता, एखाद्या वाहनाच्या धडकेमध्ये तो जखमी झाला असावा, अशी शक्यता वर्तविली जात आहे.
सोमवारी त्याच्या रक्ताचे नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात आले. त्याच्या लकवाग्रस्त बाजूचे एक्स-रे काढले जाणार आहेत. मात्र रविवारी त्याला डोज मारून ट्रँक्यूलाईज केल्याने दुसरा डोज काही दिवसानंतरच द्यावा लागणार आहे. त्यामुळे तीन-चार दिवसानंतरच एक्स-रे काढले जाण्याची शक्यता आहे.
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील १० वर्षीय खली हा वाघ मागील काही दिवसात व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनच्या आगरझरी रेंजमध्ये लंगडत चालत असल्याचे दिसले होते. कॅमेरा ट्रॅपची पहाणी केली असता, त्याच्या शरीराच्या मागील बाजूला जखम झाल्याचे लक्षात आले. यामुळे त्याच्यावर उपचार करण्यासाठी त्याला ट्रँक्यूलाईज करून पकडण्याचा निर्णय घेण्यात आला होता. रविवारी ही प्रक्रिया झाल्यावर त्याला पुढील उपचारासाठी गोरेवाड्याला नेण्याच्या सूचना वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मिळाल्या होत्या. त्यानुसार त्याला येथे आणण्यात आले आहे.
‘त्या’च्या शस्त्रक्रियेचेही निश्चित नाही
गोरेवाडा येथे मागील काही दिवसापासून देवलापार येथील वाघ उपचारासाठी दाखल आहे. त्याच्या पायावरील शस्त्रक्रियाही अद्याप झालेली नाही. ती केव्हा होणार, हे अद्याप नक्की नाही. या वाघाच्या मागील पायाचे हाड चार ते पाच ठिकाणी तुटलेले आहे.