वैरभाव नष्ट करून मित्रभाव वृद्धिंगत करतो ‘खमत खामणा’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2020 08:43 PM2020-08-21T20:43:08+5:302020-08-21T20:43:44+5:30
दिवसभर आपल्या हातून अनवधानाने होणाऱ्या पापाचरणाचा पश्चात्ताप, खेद व्यक्त करण्यासाठी आणि आपल्यामुळे दुसऱ्याला होणाऱ्या दु:ख, हिंसाचारासाठी किंवा प्रत्येक चुकीसाठी ‘मिच्छामि दुक्कडम्’ म्हटले जाते. यात कुठेच क्षमा मागितली जात नाही किंवा क्षमा केलीही जात नाही.
स्वप्निल जैन : लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पर्वराज पर्युषण पर्वाच्या तात्काळ नंतर साजरा होणाऱ्या क्षमावाणी महापर्वात वैरभाव सोडून एकमेकांना क्षमायाचना केली जाते आणि एकमेकांप्रति क्षमाभाव व्यक्त केला जातो. मनोमालिन्य दूर करण्याचा हा क्षमापना पर्व वर्तमानात केवळ शिष्टाचारापुरता उरलेला आहे. शिष्टाचार आणि परंपरेनुसार प्रत्येक जण एकमेकांना ‘मिच्छामि दुक्कडम्’ बोलून किंवा मोबाईल संदेशाद्वारे मोकळे होत आहेत. वास्तवात वर्तमान पिढी ‘मिच्छामि दुक्कडम्’च्या खऱ्या अर्थापासून अनभिज्ञ आहे.
‘मिच्छामि दुक्कडम्’चा अर्थ ‘माझे पाप निष्फळ ठरोत, खोटे ठरोत’ असा होतो. या शब्दांमध्ये क्षमाभाव कुठेच उल्लेखित होत नाही. परंतु, अनुकरणाच्या आहारी जाऊन अज्ञानतेमुळे या अनुपयुक्त शब्दांचा सर्रास उपयोग केला जातो. इतक्या वर्षापासून पर्युषण पर्वाच्या अखेरच्या दिवशी क्षमापनेच्या वेळी ‘मिच्छामि दुक्कडम्’ हेच शब्द उपयोगात आणून क्षमा मागितली जात आहे आणि यावर आजवर कुणीच आक्षेपही घेतला नाही. मग, अचानक आजच हा शब्द चुकीचा कसा, असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. तात्पर्य हाच की हा शब्द चुकीचा नाहीच. केवळ क्षमायाचना महापर्वासाठी हा शब्द उपयुक्त नाही, हेच सांगणे आहे. एकमेकांची क्षमा मागताना ‘मिच्छामि दुक्कडम्’ ऐवजी ‘खमत खामणा’ हे शब्द अत्यंत उपयुक्त आहे. या शब्दाचा सामान्य अर्थ ‘आपली क्षमा मागतो आणि तुम्हाला क्षमा करतो’ असा होतो. त्यामुळे, क्षमापनेच्या दिवशी एकमेकांना ‘खमत खामणा’ म्हणणेच उत्तम ठरेल.
इथे होतो प्रयोग
‘मिच्छामि दुक्कडम्’चा उपयोग दररोज प्रतिक्रमण करताना केला जातो. दिवसभर आपल्या हातून अनवधानाने होणाऱ्या पापाचरणाचा पश्चात्ताप, खेद व्यक्त करण्यासाठी आणि आपल्यामुळे दुसऱ्याला होणाऱ्या दु:ख, हिंसाचारासाठी किंवा प्रत्येक चुकीसाठी ‘मिच्छामि दुक्कडम्’ म्हटले जाते. यात कुठेच क्षमा मागितली जात नाही किंवा क्षमा केलीही जात नाही. मात्र, आपले पाप निष्फळ करण्याची विनवणी आणि पश्चात्ताप भाव व्यक्त होतो.
‘खमत खामणा’चा अर्थ क्षमा मागणे व क्षमा करणे असा होतो. वैरभाव नष्ट करणे आणि मैत्रीभाव वाढविण्यासाठी याचा उपयोग केला जातो. या शब्दात दोन्ही क्रिया एकसाथ होतात. या शब्दात सहज मनाने आपल्या ज्ञात, अज्ञात चुकांना, दुष्प्रवृत्ती व दुष्कृत्यांसाठी क्षमायाचना आहे. जर कुणाच्या कठोर शब्दांनी आपले मन दुखावले असेल तर त्याला सहज क्षमा करण्याचा भावही आहे. ‘मिच्छामि दुक्कडम्’ कर्मांच्या नाशासाठी म्हटले जाते आणि ‘खमत खामणा’ प्रतिक्रमणाच्या अखेर सोबती साधक, श्रावकांविषयी झालेल्या चूकभूलसाठी क्षमा करण्यास व्यक्त करण्यासाठी म्हटले जाते. एकूणच ज्या जिनआमनायांच्या नुसार ‘मिच्छामि दुक्कडम्’चा उपयोग प्रतिक्रमणावेळी आणि ‘खमत खामणा’चा उपयोग प्रतिक्रमणानंतर केला जातो.
हे दोन्ही शब्द जिनाम्नाय चे
‘मिच्छामि दुक्कडम्’ आणि ‘खमत खामणा’ हे दोन्ही शब्द एकदम उपयुक्त असून, जिन आमनायमध्ये उल्लेखित आहेत. दोन्ही शब्दांचे भाव आणि अर्थ अत्यंत वेगळे आहेत. या दोन्ही शब्दांचे समान अर्थ सांगणारे किंवा पर्याय म्हणून वापरले जाणारे शब्द म्हणने चुकीचे आणि आगमच्या विरूद्ध ठरेल. प्रसंगानुरूप योग्य शब्दांचाच उपयोग करणे व्यवहारप्रद असल्याचे नेहमीच सांगितले जाते.