पाली भाषा जगविण्याचे कार्य खांडेकरांनी केले
By admin | Published: December 30, 2016 02:40 AM2016-12-30T02:40:33+5:302016-12-30T02:40:33+5:30
पाली भाषा ही प्राचीन आर्यभाषा आहे. आज ही भाषा जिवंत ठेवण्याचे कार्य फार कमी लोक करीत असून ..
गौरव समारंभ : भदंत सत्यपाल यांचे प्रतिपादन
नागपूर : पाली भाषा ही प्राचीन आर्यभाषा आहे. आज ही भाषा जिवंत ठेवण्याचे कार्य फार कमी लोक करीत असून पाली विभूषण प्रा. डॉ. बालचंद्र खांडेकर यांचे नाव यात अग्रक्रमाने घेता येईल. तेव्हा त्यांचा गौरव हे आमचे सामाजिक दायित्व आहे, असे प्रतिपादन दिल्ली विद्यापीठातील बौद्ध अध्ययन विभागाचे प्रमुख भदंत डॉ. सत्यपाल यांनी येथे केले.
पाली व बौद्ध धम्माला दिलेल्या योगदानाबद्दल डॉ. बालचंद्र खांडेकर यांचा श्रीमंत पूर्णचंद्र बुटी सभागृह रामदासपेठ येथे गौरव करण्यात आला. सन्मानपत्र, शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. राष्ट्रसंत तुकडोजी महराज नागपूर विद्यापीठाचे कुलसचिव पूरणचंद्र मेश्राम, उपकुलसचिव डॉ. अनिल हिरेखण, भदंत संघरत्न माणके, कांचन खांडेकर, डॉ. कृष्णा कांबळे , डॉ. प्रदीप आगलावे, इंजि. विजय मेश्राम, ताराचंद्र खांडेकर, इ.मो. नारनवरे, शंकर ढेंगरे, भीमराव वैद्य प्रामुख्याने उपस्थित होते. आपल्या सत्काराला उत्तर देताना डॉ. खांडेकर म्हणाले, अनेक लोकांनी मदत केल्यामुळेच मी आंबेडकरी चळवळ व बौद्ध धम्माच्या क्षेत्रात काम करू शकलो. माझे जीवन हे पाली व बौद्ध धम्माच्या सेवेसाठी समर्पित आहे. प्रास्ताविक पाली व प्राकृत विभागाच्या प्रमुख डॉ. मालती साखरे यांनी केले. संचालन डॉ. नीलिमा चव्हाण यांनी केले. डॉ. नीरज बोधी यांनी आभार मानले.(प्रतिनिधी)