अन् खैरी गावात पोहोचली एसटी
By Admin | Published: March 30, 2016 03:10 AM2016-03-30T03:10:48+5:302016-03-30T03:10:48+5:30
दुर्गम गावात एसटी बस येण्याचा आनंदोत्सव या प्रगत काळात साजरा होत असेल तर कुणालाही नक्कीच आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही.
महिला नागरिकांचा आनंदोत्सव : मुलींचा शैक्षणिक प्रवास होणार सुलभ
नागपूर : दुर्गम गावात एसटी बस येण्याचा आनंदोत्सव या प्रगत काळात साजरा होत असेल तर कुणालाही नक्कीच आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. देशाला स्वातंत्र्य मिळून ६५ वर्षे उलटूनही एसटी बसच्या सुविधेपासून गाव वंचित असेल, याची कल्पनाही आपण करू शकत नाही. परंतु तसे झाले आहे. राज्याच्या उपराजधानीपासून ४० किमी अंतरावर अडेगाव मार्गावर जंगल व डोंगरदऱ्यांनी वेढलेल्या खैरी (सीता) या दुर्गम गावात रविवारी (दि. २७) एसटी बस सुरू झाली. गावात एसटी पोहोचताच महिला नागरिकांनी आनंदोत्सव साजरा केला.
सुमारे ४०० लोकवस्ती असलेल्या या आदिवासीबहुल गावात एसटी बससेवा सुरू झाली. तीन किलोमीटर अंतरावरील अडेगाव फाट्यावरून वाजतगाजत आणि गुलाल उधळत महिलांनी नाचत गावात बस आणली. खैरी सीता हे गाव नागपूर-अमरावती महामार्गावरील शिवासावंगा गावापासून १५ किमी अंतरावर वसले आहे. चांगला डांबरी रस्ता, दुतर्फा वृक्षांची रांगच-रांग, सभोवताली डोंगर, त्यापैकी एका डोंगराच्या पायथ्याशी हे गाव आहे.
या गावातून लहानाचे मोठे झालेले, सध्या अमरावती येथे विभागीय जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त असलेले भीमराव खंडाते यांनी आपल्या या गावाचे ऋण फेडाण्यासाठी प्रयत्न सुरू केले. रणजितसिंह देओल यांच्याशी संपर्क साधून खैरी सीता या गावात विद्यार्थ्यांच्या शिक्षणात होणारी गैरसोय टाळण्यासाठी एसटी बस सुरू करण्याची विनंती त्यांनी केली. देओल यांनी संबंधिताना त्याबाबत आदेश दिले. काही तांत्रिक बाबी दूर करून बससेवा सुरू झाली आणि गावकऱ्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. याप्रसंगी एसटीचे प्रादेशिक व्यवस्थापक ए.एन. गोहात्रे, किशोर भोयर, उपसरपंच विलास वाघाडे, विभागीय वाहतूक निरीक्षक टी. डी. काळमेघ, सहायक वाहतूक निरीक्षक दाचेवार व ठोसर आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)