खरीपाचे वेध!
By admin | Published: April 15, 2016 02:58 AM2016-04-15T02:58:05+5:302016-04-15T02:58:05+5:30
खरीप हंगामाला दीड महिन्याचा कालावधी शिल्लक असला, तरी कृषी विभागाने आतापासूनच खरीप हंगामाच्या नियोजनाची तयारी सुरू केली आहे.
आढावा बैठकीची तयारी : जिल्ह्यात
४ लाख ८३ हजार लागवड क्षेत्र
नागपूर : खरीप हंगामाला दीड महिन्याचा कालावधी शिल्लक असला, तरी कृषी विभागाने आतापासूनच खरीप हंगामाच्या नियोजनाची तयारी सुरू केली आहे. मागील दोन वर्षाच्या दुष्काळानंतर यंदा विदर्भ व मराठवाड्यासह संपूर्ण देशात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडणार असल्याचे हवामान विभागाने संकेत दिले आहे. यामुळे निश्चितच विदर्भातील शेतकऱ्यांसह कृषी विभागाच्या चेहऱ्यावर हसू फुलले आहे.
शेतकरी हा खरीप हंगामातील पेरणीपूर्वीच्या मशागतीला लागला आहे. तर कृषी विभाग नियोजनात व्यस्त झाला आहे. माहिती सूत्रानुसार पुढील आठवड्यात पालकमंत्री जिल्ह्याची खरीप आढावा बैठक घेऊ शकतात. त्यामुळे सध्या नागपूर कृषी विभागाला त्या बैठकीचे वेध लागले असून, संपूर्ण यंत्रणा कामाला लागली आहे. कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात एकूण लागवडीखालील सरासरी क्षेत्र ४ लाख ८३ हजार ३६० हेक्टर आहे. त्यापैकी कापूस पिकाखाली ६३ हजार ९०० हेक्टर क्षेत्र असून, सोयाबीनसाठी २ लाख ७४ हजार ३०० हेक्टर, धानासाठी ५९ हजार १०० हेक्टर व तूर पिकाखाली ५५ हजार ६०० हेक्टर क्षेत्र आहे. नागपूर कृषी विभागाने याच आकडेवारीच्या आधारे पुढील खरीप हंगामाची तयारी सुरू केली असल्याची माहिती एका कृषी अधिकाऱ्यांनी दिली. विशेष म्हणजे, यावर्षी नागपूर कृषी विभागाने शेततळे व जलयुक्त शिवार योजनेवर आपले संपूर्ण लक्ष केंद्रित केले आहे. त्यातच आता खरीप हंगामाची सुद्धा तयारी सुरू झाली आहे. (प्रतिनिधी)