खासदार महोत्सव : आकाशी झेप घे रे पाखरा, सोडी सोन्याचा पिंजरा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2018 11:56 PM2018-12-01T23:56:54+5:302018-12-02T00:00:22+5:30

जगभरातील मराठी माणसांच्या भावविश्वाचा एक हळवा कोपरा ज्यांच्या गीतांनी सदैव व्यापून ठेवला, असे महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व म्हणजे श्रेष्ठ संगीतकार-गायक सुधीर फडके ऊर्फ बाबूजी. बाबूजींनी समोर आलेल्या कवितेचा एकेक शब्द, एकेक ओळ मोहक अशा सुरांनी अशी काही सजविली की ते एकेक गाण ऐकताना हरवून जावं. शांत, शीतल, निवांत क्षणी कुणी मनात हळूच शिरावं आणि व्यापून जावं, असं त्यांच गाणं. ‘फिटे अंधाराचे जाळे, झाले मोकळे आकाश..., तोच चंद्रमा नभात..., सखी मंद झाल्या तारका..., आकाशी झेप घे रे पाखरा, सोडूनी सोन्याचा पिंजरा...’ अशा अनेक गीतांमधून रसिकतेचा गोड ठेवा येणाऱ्या कित्येक पिढ्यांना सदैव आनंदच देत राहील. बाबूजींनी मागे ठेवलेला हा ठेवा शनिवारी नागपूरकर रसिकांनी त्यांचे पुत्र श्रीधर फडके यांच्या स्वरांमधून ऐकला, अनुभवला आणि हृदयात साठवला.

Khasdar Mahotsav: Akashi zep ghe re pakhara,sodi sonyacha pinjara... | खासदार महोत्सव : आकाशी झेप घे रे पाखरा, सोडी सोन्याचा पिंजरा...

खासदार महोत्सव : आकाशी झेप घे रे पाखरा, सोडी सोन्याचा पिंजरा...

Next
ठळक मुद्देश्रीधर फडके यांनी गाण्यातून उलगडल्या सुधीर फडके यांच्या आठवणी : ‘बाबूजींची गाणी’ ऐकून रसिकही सुखावले

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जगभरातील मराठी माणसांच्या भावविश्वाचा एक हळवा कोपरा ज्यांच्या गीतांनी सदैव व्यापून ठेवला, असे महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व म्हणजे श्रेष्ठ संगीतकार-गायक सुधीर फडके ऊर्फ बाबूजी. बाबूजींनी समोर आलेल्या कवितेचा एकेक शब्द, एकेक ओळ मोहक अशा सुरांनी अशी काही सजविली की ते एकेक गाण ऐकताना हरवून जावं. शांत, शीतल, निवांत क्षणी कुणी मनात हळूच शिरावं आणि व्यापून जावं, असं त्यांच गाणं. ‘फिटे अंधाराचे जाळे, झाले मोकळे आकाश..., तोच चंद्रमा नभात..., सखी मंद झाल्या तारका..., आकाशी झेप घे रे पाखरा, सोडूनी सोन्याचा पिंजरा...’ अशा अनेक गीतांमधून रसिकतेचा गोड ठेवा येणाऱ्या कित्येक पिढ्यांना सदैव आनंदच देत राहील. बाबूजींनी मागे ठेवलेला हा ठेवा शनिवारी नागपूरकर रसिकांनी त्यांचे पुत्र श्रीधर फडके यांच्या स्वरांमधून ऐकला, अनुभवला आणि हृदयात साठवला.
निमित्त होते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतील खासदार महोत्सवांतर्गत आयोजित ‘बाबूजींची गाणी’ या कार्यक्रमाचे. सादर केले ते संगीतकार-गायक पुत्र श्रीधर फडके यांनी. हे वर्ष तसे बाबूजी आणि श्रेष्ठ कवी गदिमा यांचे जन्मशताब्दी वर्ष. या जोडीने मराठी रसिकांसाठी शब्दांचा, संगीताचा व भावनांचा अनमोल असा ठेवा ठेवला आहे. त्यातील प्रत्येक गीत हा स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे. ‘देव देव्हाऱ्यात नाही, देव नाही देवालयी...’ हे कार्यक्रमाच पहिलं गीत. श्रीधर फडके म्हणाले, ‘गाणं कसे लिहावे, कस बांधावे आणि श्रोत्यांपुढे कसे मांडवे याचा आदर्श वस्तूपाठच बांधून दिला आहे.’ गदिमांनी शब्द द्यावे आणि बाबूजींनी त्यात स्वर आणि सुरातून भावना ओताव्या. ‘सखी मंद झाल्या तारका...’ श्रीधर यांनी सादर केलेलं हे दुसरं गाणं. प्रिय मिलनाची उत्कट पण तेवढीच हळुवार भावना. पुढे सादरीत ‘संथ वाहते कृष्णामाई...’ निश्चलपणे वाहणाऱ्या नदीच्याही भावनांना हात घालणारे, राग वृंदावनी सारंग मधले हे गाणे. शास्त्रीय संगीतात पारंगत असलेल्या बाबूजींनीकठीण अशा या अभिजात रागांना भावगीत, भक्तिगीतातून एक सुगमता प्रदान केली. ‘आकाशी झेप घे रे पाखरा, सोडूनी सोन्याचा पिंजरा...’ हे राग यमन व तिलक कामोद रागातील गीत, कार्यक्रमात शेफाली कुळकर्णी-साकोरीकर यांनी गायलेले ‘ज्योती कलश छलके...’ हे राग भूपमधील गाणे, राग यमनमध्ये बांधलेले ‘धुंदी कळ्यांना धुंदी फुलांना, शब्दरुप आले मुक्या भावनांना...’ अशी अनेक गीते बाबूजींची प्रगल्भता व प्रतिभेचा परिचय देणारे आहेत.
भक्तिगीतामधील मांगल्य आणि प्रासादिकता, भावगीतातील भावार्थ, प्रेमगीतातील शृंगारिकता आणि शालिनता त्यांच्या गीतात होती. बाबूजींनी गायलेले व श्रीधर यांनी संगीतबद्ध केलेले ‘फिटे अंधाराचे जाळे, झाले मोकळे आकाश...’ हे गीत यावेळी श्रीधर यांनी गाताना रसिकांनी टाळ्यांच्या गजरात ताल देत त्यांना अभिवादन केले. यावेळी श्रोत्यांनी अनेक गीतांना ‘वन्स मोअर’ची साद दिली. ‘आज कुणी तरी यावे..., झाला महार पंढरीनाथ..., निजरुप दाखवा हो..., का रे दुरावा का रे अबोला..., हा माझा मार्ग एकला..., तुझे रुप चित्ती राहो..., कानडा राजा पंढरीचा..., चंद्र आहे साक्षीला..., विकत घेतला शाम...’ अशी भावगीते, भक्तिगीतांसह ‘जाळीमंदी पिकली..., रंगू बाजारात जाते..., पतंग उडवित होते...’ अशा बाबूजींनी संगीतबद्ध केलेल्या लावण्या गायक कलावंतांनी यावेळी सादर केली. श्रीधर यांच्यासमवेत शेफाली साकोरीकर व शिल्पा पुणतांबेकर यांनी साथसंगत केली.
तत्पूर्वी आमदार सुधाकर कोहळे, आमदार रामदास आंबटकर, प्रा. अनिल सोले, जेएनपीेटीचे ट्रस्टी राजेश बागडी, उपमहापौर दीपराज पार्डीकर, राजू हडप, पीआय संदीप पवार व श्रीधर फडके यांनी दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे औपचारिक उद्घाटन केले.
गडकरी यांच्या हस्ते सेवा संस्थांना ७.४० कोटींचे धनादेश
बाबूजींची गाणी ऐकण्यासाठी नितीन गडकरी यांनी आवर्जून हजेरी लावली. जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी) च्या सीएसआर फंडातून सेवाभावी कार्य करणाऱ्या संस्थांना ७४० लाख (७.४० कोटी) रुपये देण्यात येत असून त्यापैकी ४.६० कोटी रुपयांचे धनादेश नितील गडकरी यांच्या हस्ते या संस्थांना प्रदान करण्यात आले. यामध्ये शहरातील मातृ सेवा संघाला २१ लाख, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कॅन्सर हॉस्पिटलसाठी २ कोटीपैकी ८० लाख, भवानी माता सेवा समितीला २ कोटी, भारतीय शिक्षण मंडळाला १.४८ कोटींपैकी ५९.२० लाख रुपयांचे धनादेश वितरित करण्यात आले. इतर संस्थांमध्ये पुणे व लातूरच्या संस्था आहेत. सीएसआरची उर्वरीत रक्कम एक-दोन महिन्यात देण्यात येणार असल्याचे ट्रस्टी राजेश बागडी यांनी सांगितले.

Web Title: Khasdar Mahotsav: Akashi zep ghe re pakhara,sodi sonyacha pinjara...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.