नागपुरातील खाऊगल्ली बनली असामाजिक तत्त्वांचा अड्डा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2019 10:29 PM2019-07-26T22:29:47+5:302019-07-26T22:30:39+5:30
महापालिकेचे माजी स्थायी समिती अध्यक्ष बंडू राऊत यांनी खाऊगल्लीची संकल्पना बजेटमध्ये ठेवली होती. रमण विज्ञान केंद्रासमोरील जागेची निवड करण्यात आली होती. ८० लाख खर्च करून येथे प्लॉस्टिकचे डोम तयार करण्यात आले. लाखो रुपये खर्चून टाईल्स लावण्यात आल्या, आवश्यक सोयीसुविधा विकसित करण्यात आल्या. परंतु अडीच वर्षानंतरही खाऊगल्लीच्या उद्घाटनाचा मुहूर्त निघाला नाही. आज खाऊगल्लीची दुरावस्था झाली आहे. तिथे असामाजिक तत्त्वांचा अड्डा बनला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिकेचे माजी स्थायी समिती अध्यक्ष बंडू राऊत यांनी खाऊगल्लीची संकल्पना बजेटमध्ये ठेवली होती. रमण विज्ञान केंद्रासमोरील जागेची निवड करण्यात आली होती. ८० लाख खर्च करून येथे प्लॉस्टिकचे डोम तयार करण्यात आले. लाखो रुपये खर्चून टाईल्स लावण्यात आल्या, आवश्यक सोयीसुविधा विकसित करण्यात आल्या. परंतु अडीच वर्षानंतरही खाऊगल्लीच्या उद्घाटनाचा मुहूर्त निघाला नाही. आज खाऊगल्लीची दुरावस्था झाली आहे. तिथे असामाजिक तत्त्वांचा अड्डा बनला आहे.
खाऊगल्लीमध्ये ३० डोम लावण्यात आले आहे. हे डोम तुटलेले आहे. टाईल्स निघालेल्या आहे. ज्या सुविधा करण्यात आल्या होत्या. त्या सुद्धा आता अस्ताव्यस्त झाल्या आहे. आता तर खाऊगल्ली ही असामाजिक तत्त्वांचा अड्डा झाला आहे. अंधार झाला की, दारुड्यांची मैफिल, अमली पदार्थांचे सेवन करणारे येथे दिसतात. दुपारच्या सुमारास भिकारी येथे झोपा काढतात. प्रेमी युगुलही अश्लील चाळे येथे करीत असतात. ज्या उद्देशाने खाऊगल्ली साकारण्यात आली होती आज तिची दुरवस्था झाली आहे.
विशेष म्हणजे बंडू राऊत यांच्यानंतर स्थायी समितीच्या कुठल्याच अध्यक्षांनी खाऊगल्लीबाबत उत्साह दाखविला नाही. स्थानिक काँग्रेसचे नगरसेवक हर्षला मनोज साबळे यांनी खाऊगल्ली सुरू करण्यासंदर्भात अनेकदा प्रयत्न केले पण त्यांना यश आले नाही.
दर जास्त असल्यामुळे दुकान घ्यायला कुणी तयार नाही
खाऊगल्लीमध्ये दुकान लावण्यासाठी अनेकवेळा उद्यान विभागामार्फत निविदा काढण्यात आल्या. परंतु निविदा भरण्यासाठी कुणीही पुढे आले नाही. मिळालेल्या माहितीनुसार एका दुकानदाराकडून १० हजार रुपये महिना भाडे घेण्याचा प्रस्ताव आहे व १० हजार रुपये सिक्युरिटी डिपॉझिट सुद्धा द्यायचे आहे. त्याचबरोबर काही अटी आणि शर्तीही ठेवण्यात आल्या आहे. त्यामुळे या गल्लीची रौनक अद्यापही येऊ शकली नाही.
भाडे अर्धे करावे - साबळे
नगरसेवक हर्षला साबळे यांचे म्हणणे आहे की, खाऊगल्लीची संकल्पना खरंच चांगली होती. मात्र मनपा प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे याचे उद्घाटन होऊ शकले नाही. भाडे १० हजाराऐवजी ५ हजार रुपये ठेवणे आवश्यक होते. सिक्युरिटी डिपॉझिट सुद्धा घ्यायला नको. पहिले खाऊगल्लीचे उद्घाटन होणे गरजेचे आहे. लोक जसजसे येतील, तसतसा किराया वाढवायला हरकत नाही. खाऊगल्लीकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे सर्व नासधूस झाली आहे. त्यामुळे खाऊगल्लीचे उद्घाटन होणे गरजेचे आहे. जर मनपा प्रशासनाने लवकरच पावले उचलली नाही, तर पावसाळ्यानंतर येथे हॉकर्सला बसवावे लागेल.