नव्या दमाच्या खोब्रागडे, कराळेंनी वेधळे लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2020 04:13 AM2020-12-05T04:13:19+5:302020-12-05T04:13:19+5:30
नागपूर : नागपूर पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत यंदा भाजपचा गड काँग्रेसने नेस्तनाबूद करीत इतिहास घडविला. परंतु यंदाच्या निवडणुकीतील आणखी ...
नागपूर : नागपूर पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत यंदा भाजपचा गड काँग्रेसने नेस्तनाबूद करीत इतिहास घडविला. परंतु यंदाच्या निवडणुकीतील आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे दिग्गजांच्या या निवडणुकीत अतुल खोब्रागडे आणि नीतेश कराळे या दोन नवीन दमाच्या तरुण उमेदवारांनी विशेष लक्ष वेधून घेतले. खोब्रागडे हे शेवटपर्यंत शर्यतीत कायम राहत तिसऱ्या क्रमांकावर राहिले.
या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे राहुल वानखेडे आणि सिनेट परिवर्तन पॅनलचे उमेदवार प्रशांत डेकाटे हे आंबेडकरी चळवळीत एक प्रमुख उमेदवार म्हणून मैदानात होते. यासोबतच परिवर्तन पॅनलचे उमेदवार असलेले नव्या दमाचे तरुण अतुलकुमार खाेब्रागडे हेसुद्धा आंबेडकरी चळवळीतील प्रमुख उमेदवारांपैकी हाेते. त्यांना आप, भीम आर्मी आणि लोकजागर पार्टीनेही समर्थन जारी केले होते. वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांची मजबूत फळी असल्याने वानखेडे आणि बसपाचे समर्थन मिळाल्याचा दावा करणारे डेकाटे यांना आंबेडकरी समाजाची मते बऱ्यापैकी मिळतील असा दावा केला जात होता. दुसरीकडे परिवर्तन पॅनलचे कार्यकर्ते अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने काम करीत होते. मतदानाच्या दिवशी तब्बल ३०४ बूथ त्यांनी लावले होते. याचा परिणाम दिसून आला. पहिल्या पसंतीची तब्बल ८५२८ मते त्यांनी घेतली. कोटा पूर्ण होईपर्यंत झालेल्या शेवटच्या फेरीपर्यंत खाोब्रागडे यांनी लढा दिला. १२,०६६ मते घेऊन ते तिसऱ्या क्रमांकावर राहिले.
यासोबतच वर्ध्याचे नीतेश कराळे यांनीही विशेष लक्ष वेधून घेतले. ६,९३१ मते घेऊन ते चौथ्या क्रमांकावर राहिले.
विदर्भवादी उमेदवाराला पुन्हा अपयश
विदर्भाचा झेंडा बुलंद करीत पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत उतरलेले आणखी एक नव्या दमाचे तरुण म्हणजे नितीन रोंघे हे होत. त्यांना ५२२ मते मिळाली. निवडणुकीत विदर्भाचा मुद्दा ज्वलंत ठेवण्याचे काम त्यांनी केले, परंतु त्यांना समाधानकारक मतेही मिळू शकली नाहीत.