आंबेडकरवादी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी खोब्रागडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2019 12:22 AM2019-03-07T00:22:40+5:302019-03-07T00:23:59+5:30
जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळातर्फे पहिल्या अखिल भारतीय आंबेडकरवादी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात येत आहे. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कवी, समीक्षक व विचारवंत डॉ. आंबेडकर कॉलेज, दीक्षाभूमीचे मराठी विभागप्रमुख प्रा. दीपककुमार खोब्रागडे यांची निवड झाली आहे. चिमूर, जि. चंद्रपूर येथे येत्या १६ व १७ मार्च रोजी हे साहित्य संमेलन आयोजित केले जाईल.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळातर्फे पहिल्या अखिल भारतीय आंबेडकरवादी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात येत आहे. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कवी, समीक्षक व विचारवंत डॉ. आंबेडकर कॉलेज, दीक्षाभूमीचे मराठी विभागप्रमुख प्रा. दीपककुमार खोब्रागडे यांची निवड झाली आहे. चिमूर, जि. चंद्रपूर येथे येत्या १६ व १७ मार्च रोजी हे साहित्य संमेलन आयोजित केले जाईल.
संमेलनाचे उद्घाटक म्हणून अ.भा. मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस व प्रमुख पाहुणे ९९ व्या अ.भा. मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गज्वी यांच्यासह विचारवंत व लेखक अशोक भारती, भदंत ज्ञानज्योती महाथेरो, किशोर गजभिये प्रामुख्याने उपस्थित राहतील. प्रा. खोब्रागडे हे मूळ चिमूरजवळच्या खापरी येथील रहिवासी असून, चिमूर येथे होणाऱ्या संमेलनाचे अध्यक्षपद त्यांना देण्याचा निर्णय आंबेडकरवादी साहित्य महामंडळाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत घेण्यात आला. प्रा. खोब्रागडे यांचे कविता, समीक्षण व साहित्य संशोधनपर कार्यात विशेष योगदान असून, आतापर्यंत त्यांचे १६ ग्रंथ प्रकाशित झाले आहेत. या दोन दिवसीय साहित्य संमेलनात राज्यभरातून ५०० हून अधिक साहित्यिक सहभागी होणार असून, विविध कार्यक्रमात अनेक लेखक, समीक्षक, कथाकार, कादंबरीकार व विचारवंत आपले विचार मांडणार असल्याचे संमेलनाचे स्वागताध्यक्ष अॅड. भूपेश पाटील, सचिव सुचित मुरमाडे व कार्याध्यक्ष डॉ. रवींद्र तिरपुडे यांनी सांगितले.