व्यापाऱ्याचे अपहरण करून खंडणीची मागणी, ‘लिटील सरदार’सह दोघांना अटक
By योगेश पांडे | Published: August 8, 2023 05:21 PM2023-08-08T17:21:12+5:302023-08-08T17:28:22+5:30
तुझा प्लॉट आमच्या नावावर कर, नाहीतर तुला ठार मारू म्हणत धमकावले
नागपूर : कपड्याच्या व्यापाऱ्याचे अपहरण करून खंडणीची मागणी करणाऱ्या दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. यात कुख्यात लिटील सरदार उर्फ शैलेंद्रसिंह लोहिया (४७, श्रीवास अपार्टमेंट, अशोक चौक, पाचपावली) व सिद्धू हरजितसिंह गुरुचरणसिंह कौर (३४, एनआयटी मैदान, बिनाकी मंगळवारी) यांचा समावेश आहे. जरीपटका पोलीस ठाण्यातील पथकाने त्यांना अटक केली.
मनिंदरसिंह हरविंदरसिंह चंडोक (३९) हे कपड्याचे व्यापारी आहेत. २ ऑगस्ट रोजी दुपारी दीड वाजता लिटील सरदार व सिद्धू हरजितसिंह हे त्यांच्या दुकानात गेले व त्यांनी चंडोक यांना जबरदस्तीने उचलून लिटील सरदारच्या अशोक चौक येथील कार्यालयात आणले. तुझ्यामुळे हत्येच्या प्रकरणात आम्ही फसलो असून सुनावणीच्या पुढील तारखेला आम्हाला सात लाख रुपये दे. जर पैसे नसतील तर तुझा प्लॉट आमच्या नावावर कर, नाहीतर तुला ठार मारू, या शब्दांत त्यांनी चंडोक यांना धमकी दिली. चंडोक यांनी त्यानंतर जरीपटका पोलीस ठाणे गाठून दोन्ही आरोपींविरोधात तक्रार केली. पोलिसांनी लिटील सरदार व सिद्धू हरजितसिंहविरोधात गुन्हा नोंदवत त्यांना अटक केली.