मजुरी मागितली म्हणून अपहरण करून मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2019 01:06 AM2019-05-29T01:06:07+5:302019-05-29T01:06:54+5:30
ईद साजरी करण्यासाठी आपल्या गावाला जातो, असे सांगून मजुरीचे पैसे मागितले म्हणून तीन तरुणांचे सहा आरोपींनी अपहरण केले. त्यांना गोदामात डांबून बेदम मारहाण केली. जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही खळबळजनक घटना घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ईद साजरी करण्यासाठी आपल्या गावाला जातो, असे सांगून मजुरीचे पैसे मागितले म्हणून तीन तरुणांचे सहा आरोपींनी अपहरण केले. त्यांना गोदामात डांबून बेदम मारहाण केली. जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही खळबळजनक घटना घडली. पोलिसांनी या प्रकरणात कृष्णा रमाशंकर गुप्ता नामक तरुणाच्या तक्रारीवरून आशिष शाहू, छोटू शाहू, सदन, दीपेंद्र शाहू, विनीत शाहू आणि अविश नामक आरोपींविरुद्ध अपहरण करून मारहाण करणे, धमकी देणे आदी आरोपांखाली गुन्हा दाखल केला.
कृष्णा गुप्ता, आमिन राईन, अजमेर राईन, मोहम्मद आरिफ (आणि आणखी काही) अशी पीडितांची नावे आहेत. ते उत्तर प्रदेशातील जंघईजवळचे रहिवासी आहेत. आरोपींकडे ते हातठेल्यावर काम करतात.
रमजान ईद साजरी करण्यासाठी ते आपल्या गावाला जाण्याच्या तयारीत होते. त्यासाठी त्यांनी आपल्या कामाचे पैसे आरोपींकडे मागितले. कृष्णाचेही १२,५०० रुपये होते. मित्र गावाला चालले, त्यांच्या हाती आपल्या कुटुंबीयांना पैसे पाठविण्याचा त्याचा मानस होता. त्यामुळे कृष्णा आणि त्याच्या उपरोक्त मित्रांनी सोमवारी आरोपी शाहूंना पैसे मागितले. ते काम सोडून जातील, अशी शंका आल्याने आरोपींनी त्यांच्याकडून दिवसभर काम करून घेतल्यानंतर त्यांना घरी जाण्यास सांगितले. ते आपल्या रूमवर गेल्यानंतर उपरोक्त आरोपींनी कृष्णा, आरिफ आणि अजमेर राईन या तिघांना सोमवारी मध्यरात्री एका ऑटोत जबरदस्तीने बसविले. त्यांना मेकोसाबागमधील आशिष शाहूच्या गोदामात नेले. तेथे हातठेल्यावरील पैसे चोरल्याचा आळ घेऊन त्यांना बेदम मारहाण केली. विशेष म्हणजे, आरोपींनी तेथे त्यांच्यापूर्वी कृष्णाचा भाऊ तसेच मित्राला आधीच हात बांधून डांबून ठेवले होते. त्यांना शटर उघडून बाहेर काढले आणि त्यांनाही बेदम मारहाण केली.
सामाजिक कार्यकर्त्यांचा दिलासा
गंभीर मारहाणीत जखमी झाल्यामुळे हे सर्व तरुण दहशतीत आले. त्यांची ती अवस्था बघून काही सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांना दिलासा देऊन जरीपटका ठाण्यात तक्रार नोंदविण्याचा सल्ला दिला. त्यामुळे कृष्णा आणि राईन ठाण्यात पोहचले. त्यांची तक्रार नोंदवून घेत पोलिसांनी उपरोक्त आरोपींविरुद्ध अपहरण करून मारहाण करणे, डांबून ठेवणे, धमकी देण्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला. वृत्त लिहिस्तोवर आरोपींना अटक झाली की नाही, ते जरीपटका पोलिसांकडून स्पष्ट झाले नव्हते.