अपहृत हर्षितची सुखरूप सुटका : वाडी अपहरण प्रकरणात चौघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2018 11:55 PM2018-10-09T23:55:37+5:302018-10-09T23:59:32+5:30
दिल्लीतील खतरनाक गुन्हेगार प्रिन्स ऊर्फ सिजो चंद्रन चंदन एल. आर. याने हर्षितच्या मित्राच्या माध्यमातूनच त्याचे अपहरण केले होते. त्याची गुन्हेगारीवृत्ती लक्षात आल्यामुळे आम्हीही अस्वस्थ होतो. मात्र, रात्रंदिवस केलेल्या तपासामुळे आम्हाला अपहरणकर्त्यांच्या तावडीतून हर्षितची सुखरूप सुटका करण्यात यश मिळाले, असा खुलासावजा माहिती गुन्हे शाखेचे उपायुक्त संभाजी कदम तसेच परिमंडळ-१ चे उपायुक्त विवेक मासाळ यांनी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दिल्लीतील खतरनाक गुन्हेगार प्रिन्स ऊर्फ सिजो चंद्रन चंदन एल. आर. याने हर्षितच्या मित्राच्या माध्यमातूनच त्याचे अपहरण केले होते. त्याची गुन्हेगारीवृत्ती लक्षात आल्यामुळे आम्हीही अस्वस्थ होतो. मात्र, रात्रंदिवस केलेल्या तपासामुळे आम्हाला अपहरणकर्त्यांच्या तावडीतून हर्षितची सुखरूप सुटका करण्यात यश मिळाले, असा खुलासावजा माहिती गुन्हे शाखेचे उपायुक्त संभाजी कदम तसेच परिमंडळ-१ चे उपायुक्त विवेक मासाळ यांनी दिली. यावेळी वाडीचे ठाणेदार नरेंद्र पवार उपस्थित होते. या प्रकरणात पोलिसांनी चार जणांना अटक केली तर गौरव सूर्यवंशी नामक आरोपी अद्याप फरार आहे. अपहरणाचा मुख्य सूत्रधार प्रिन्स याला मध्य प्रदेश पोलिसांनी अटक करून न्यायालयीन कोठडीत पोहोचविल्यामुळे पुढचा तपास रखडला आहे.
वाडीतील वाहतूक व्यावसायिक संतोष पाल यांचा १७ वर्षीय मुलगा हर्षित याचे २ आॅक्टोबरच्या रात्री दिल्लीतील कुख्यात गुंड प्रिन्स याने प्रथमेश ऊर्फ दत्ता संजय गोरले (खडगाव), गौरव भुवनलाल सूर्यवंशी (वाडी), नारायण सुंदरलाल पवार (दुनावा, बैतूल), दिनेश मोतीराम बारस्कर (बैतूल, मध्य प्रदेश) आणि बिट्टू उईके यांच्या मदतीने अपहरण केले होते. कारने हर्षितला नरखेड, बैतूलकडे नेल्यानंतर त्याने हर्षितच्याच मोबाईलचा वापर करून संतोष पाल यांना फोन करून एक कोटीची खंडणी मागितली. खंडणीसाठी फोन आल्याचे कळाल्याने पोलीस यंत्रणेत खळबळ उडाली. पोलिसांनी धावपळ करून बिट्टू उईके, नारायण पवार, दत्ता गोरले आणि दिनेश बारस्कर यांना अटक केली. हर्षितची सुटका करून घेण्यासाठी पोलीस प्रिन्स आणि गौरवचा जागोजागी शोध घेत होते. शुक्रवारी प्रिन्सचे लोकेशन बैतूलकडे दिसताच गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त संभाजी कदम आणि परिमंडळ-१ चे उपायुक्त विवेक मासाळ शुक्रवारी रात्रभर आपल्या सहकाऱ्यांसह बैतूलमध्ये शोधाशोध करीत फिरले. मात्र पोलिसांना ते हाती लागले नाही. अखेर रविवारी रात्री भोपाळजवळच्या पाचेर पोलीस ठाण्यांतर्गत प्रिन्सचे लोकेशन मिळाल्याने आम्ही तेथील पोलीस अधिकाऱ्यांना टोलनाक्याजवळ नाकाबंदी करण्यास सांगितले. प्रिन्सच्या कारचा क्रमांक आणि त्याचा तसेच हर्षितचा फोटोही त्यांना पाठवला होता. त्यावरून पाचेर पोलिसांनी कार अडवून प्रिन्सला अटक केली आणि त्याच्या ताब्यातून हर्षितची सुखरूप सुटका केली.
नांदेडवरून चोरली कार
कुख्यात प्रिन्सने अपहरणासाठी वापरलेली कार नांदेडमधून औरंगाबादला जाण्यासाठी भाड्याने घेतली होती. रस्त्यात कारचालकाला गुंगारा देऊन आरोपीने ती कार पळवून आणली. कुख्यात प्रिन्सने यापूर्वी तेलंगणामधील एका बँक व्यवस्थापकाची हत्या केली होती. त्याच्यावर लुटमार, दरोडा आदी गंभीर गुन्हे दाखल असून, नागपुरात त्याने एका तरुणीवर गोळी झाडली होती. अपहरण केल्यापासून तो स्वत: कार चालवून बाजूला हर्षितला बसवत होता. त्याचा गुन्हेगारी अहवाल लक्षात आल्याने हर्षितला धोका होऊ शकतो, हे ध्यानात घेऊन आम्ही रात्रंदिवस तपास केला. त्याने एक कोटीची खंडणी मागितली आम्ही ‘खऱ्या भासाव्या अशा नोटांची’ही व्यवस्था केली होती. ऐनवेळी प्रिन्स सापडल्यानंतर पाचेर पोलिसांनी तेथे गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. दुसऱ्या दिवशी त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली. त्यामुळे नागपूर पोलिसांच्या तपासात अडथळा निर्माण झाला आहे. या प्रकरणात मोक्का लावला जाऊ शकतो, असे संकेतही पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना पोलीस उपायुक्त कदम आणि मासाळ यांनी दिले.