अपहरण करून हत्या
By admin | Published: May 28, 2016 02:48 AM2016-05-28T02:48:52+5:302016-05-28T02:48:52+5:30
पैशाच्या जुन्या व्यवहारातून एका वाहनचालकाचे त्याच्या मित्रांनी अपहरण करून निर्घृण हत्या केली. शुक्रवारी सकाळी ही थरारक घटना उघडकीस आली.
सीताबर्डीतील जंगलात आढळला मृतदेह : मित्रांनीच केला मित्राचा घात, चौघे ताब्यात
नागपूर : पैशाच्या जुन्या व्यवहारातून एका वाहनचालकाचे त्याच्या मित्रांनी अपहरण करून निर्घृण हत्या केली. शुक्रवारी सकाळी ही थरारक घटना उघडकीस आली. प्रमोदकुमार ऊर्फ पिंटू भरतलाल पांडे (वय २०) असे मृताचे नाव आहे. तो जयताळ्यातील माऊली मंदिराजवळ राहत होता.
पिंटू छोटे मालवाहू वाहन चालवत होता. २५ मे रोजी त्याचा त्याच्या काही मित्रांसोबत वाद झाला. त्यानंतर या मित्रांनी त्याला महाराजबाग मार्गावरील हरीश बारजवळून सोबत नेले. तेव्हापासून तो बेपत्ता होता. दोन दिवसांपासून पिंटू घरी परत आला नाही. त्यामुळे पिंटूचा मोठा भाऊ विनोद भरतलाल पांडे (वय ३०) याने सीताबर्डी ठाण्यात तक्रार नोंदवली होती. पोलीस पिंटूचा शोध घेत असतानाच हरीश बारच्या नाल्याजवळून तीव्र दुर्गंध येत असल्याचे काही जणांनी गुरुवारी सायंकाळी सीताबर्डी पोलिसांच्या लक्षात आणून दिले. पोलिसांनी रात्री शोधाशोध सुरू केली. श्वान पथकाला पाचारण केले. गुन्हेशाखेचे पथकही पोहचले. त्यानंतर नाल्याच्या बाजूला (पशू चिकित्सालयाजवळच्या भागात) खड्यात मृतदेह आढळला. पोलिसांनी विनोद पांडेकडून पिंटूच्या मृतदेहाची ओळख पटवून घेतली. मृतदेह पुरता कुजला होता.
त्याचा बुधवारी रात्री वाद झाल्याचे कळल्यानंतर पोलिसांनी गुरुवारी रात्रीपासूनच पिंटूच्या मित्रांची चौकशी सुरू केली. त्यानंतर अजीम कादीर बेग (वय १८, रा. वसंतराव नाईक झोपडपट्टी, धरमपेठ), हिमांशू सुभाष पांडे (वय १९, रा. श्रीनगर, इंगोले ले-आऊट, मानकापूर) घनश्याम गौतम शाहू (वय १८, रा वसंतराव नाईक झोपडपट्टी, धरमपेठ) आणि अन्य एक अल्पवयीन साथीदार अशा चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
आरोपींची निर्दयता
पिंटूची हत्या करणाऱ्या आरोपींनी निर्दयतेच्या सर्व सीमा ओलांडल्या. त्याचा एक हात शरीरापासून वेगळा केला. पोलिसांनी पिंटूचा हात शोधण्यासाठी बरीच धावपळ केली. दरम्यान, या थरारक हत्याकांडाने सीताबर्डीतील वाहनचालक, हातठेलेवाले, छोटे व्यापारी अक्षरश: हादरले आहेत. माहिती कळताच परिमंडळ दोनचे उपायुक्त शैलेश बलकवडे यांच्यासह अनेक पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. मृत पिंटूला तीन भाऊ असून, तो सर्वात लहान होता. तो विवाहित असून त्याची पत्नी सध्या माहेरी (उत्तर प्रदेशात) गेली असल्याचे संबंधित सूत्रांनी सांगितले.