नागपुरातून अपहरण करून मालेगावजवळ हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 04:12 AM2021-09-17T04:12:06+5:302021-09-17T04:12:06+5:30
आरोपी पवार महिलेला पाहून लवकर भाळतो, हे ध्यानात घेत वासनिकने त्याच्याशी संबंधित एका महिलेला घेऊन ११ सप्टेंबरला सकाळी ५ ...
आरोपी पवार महिलेला पाहून लवकर भाळतो, हे ध्यानात घेत वासनिकने त्याच्याशी संबंधित एका महिलेला घेऊन ११ सप्टेंबरला सकाळी ५ वाजता पवारच्या घरी गेला. त्यानंतर विक्की ऊर्फ विकल्प विनोदराव मोहोड, शुभम ऊर्फ लाला भीमराव कन्हारकार (वय २२) व्यंकेश ऊर्फ टोनी मिसन भगत (वय २५, तिघेही, रा. आराधनानगर वाठोडा) आणि गज्जू ऊर्फ गजानन गुणगुणे यांना सोबत घेतले. कोंढाळीला पहिला थांबा घेतल्यानंतर आरोपी वासनिकने पवारमागे पैशाचा हिशेब आणि ‘त्या’ मोबाईलबाबत विचारणा केली. पवारने कानावर हात ठेवल्यानंतर आरोपी वासनिक आणि साथीदारांनी त्याला मारहाण सुरू केली. धावत्या वाहनात मारहाण करीत त्याला ते पुढे नेत होते. आरोपींनी पवारला विवस्त्र करून बेदम मारले. मात्र, तो हिशेब द्यायला तयार नसल्याने अखेर वाशिम जिल्ह्यातील पांगरीकुटे (मालेगाव) शिवारात वासनिकने पिस्तुलातून गोळ्या झाडून पवारची हत्या केली. त्याचा मृतदेह फेकून आरोपी नागपूरकडे पळून आले.
----
असा लावला छडा
हे प्रकरण उघड झाल्यानंतर मृत पवारचा फोटो मालेगाव पोलिसांनी ओळख पटावी म्हणून व्हायरल केला. पवारच्या घरमालकाने त्याची ओळख पटविली. त्यानंतर गुन्हे शाखेचे पथक सक्रिय झाले. अतिरिक्त आयुक्त सुनील फुलारी, उपायुक्त गजानन राजमाने यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या युनिट चारचे एपीआय शंकर धायगुडे, एपीआय सोनटक्के, पीएसआय अतुल इंगोले, हवालदार पानबुडे, सतीश ठाकरे, बबन राऊत, नायक युवानंद कडू, प्रशांत कोडापे यांनी पवारसोबत कोण राहत होते, त्याची माहिती काढून सर्वात आधी लाला कन्हारकरला ताब्यात घेतले. त्याने विक्की मोहोडचे तर विक्कीने टोनी भगतचे नाव सांगितले. बुधवारी सायंकाळी या तिघांनाही ताब्यात घेतले. त्यांनी हत्येची कबुली दिल्यानंतर सूत्रधार निशिद वासनिकचेही नाव सांगितले. त्यावरून स्थानिक अधिकाऱ्यांनी मालेगाव पोलिसांना बोलवून आरोपी लाला कन्हारकर, विक्की मोहोड आणि टोनी भगतला त्यांच्या हवाली केले. सूत्रधार वासनिक, गज्जू गुणगुणे आणि त्या महिलेचा पोलीस शोध घेत आहेत.
----