छत्तीसगडमधील अपहृत सपना पोहचणार कुटुंबियांत

By नरेश डोंगरे | Published: February 24, 2024 10:56 PM2024-02-24T22:56:17+5:302024-02-24T22:56:55+5:30

बलरामपूर जिल्ह्यातून झाले होते अपहरण : आरपीएफने घेतले ताब्यात

kidnapped sapna in chhattisgarh will reach the family | छत्तीसगडमधील अपहृत सपना पोहचणार कुटुंबियांत

छत्तीसगडमधील अपहृत सपना पोहचणार कुटुंबियांत

नरेश डोंगरे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : छत्तीसगडमधून अपहरण करण्यात आलेल्या एका अल्पवयिन मुलीचा छडा लावण्यात नागपूर आरपीएफने यश मिळवले. शुक्रवारी रात्री येथील रेल्वे स्थानकावर ही घटना घडली. सपना (नाव काल्पनिक, वय १७) छत्तीसगडमधील बलरामपूर जिल्ह्यातील रहिवासी असून आज सायंकाळी पोलिस तिला घेऊन बलरामपूरकडे रवाना झाले.

बलरामपूर जिल्ह्यातील एका १७ वर्षीय मुलीचे अपहरण झाले असून तिचे लोकेशन नागपूरकडे दिसत असल्याची माहिती छत्तीसगड पोलिसांकडून शुक्रवारी सायंकाळी ६.४० वाजता रेल्वे पोलीस (जीआरपी) आणि रेल्वे सुरक्षा दलाला (आरपीएफ) मिळाली होती. त्यानुसार, येथील रेल्वे स्थानकावर जीआरपी तसेच आरपीएफचे जवान संबंधित मुलीचा शोध घेत होते. पोलिसांनी कळविलेल्या वर्णनाची मुलगी फलाट क्रमांक ८ वर सहायक उपनिरीक्षक जुम्मा इंगळे, डी. एस. सिसोदिया यांच्या नजरेस पडली. त्यांनी तिला ताब्यात घेऊन पोलीस उपनिरीक्षक प्रियंका सिंग यांच्यासमोर हजर केले.

आरपीएफचे पोलीस निरीक्षक आर. एल. मिना यांनी तिला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता तिने घटनेच्या काही तासांपूर्वी तिघांनी तिचे अपहरण केल्याची माहिती दिली. ती आपल्या आजोबासोबत दुपारी बाजारात गेली होती. आजोबा दुसरीकडे आणि ती दुसरीकडे खरेदी करीत असताना तीन तरुणांनी तिला नशिला पदार्थ खाऊ घातला. त्यानंतर लाल रंगाच्या कारमध्ये बसवून नरसिंगपूरपर्यंत नेले. तेथून तिला रेल्वेत बसवून नागपूरकडे घेऊन आले. दरम्यान, शुद्धीवर आल्यानंतर आरोपींना गुंगारा देऊन आपण रेल्वे स्थानकावर उतरल्याचे तिने पोलिसांना सांगितले. अपहरणाच्या गुन्ह्यातील पीडित त्यात अल्पवयीन असल्याने आरपीएफने लगेच ही माहिती छत्तीसगड, बलरामपूर पोलिसांना कळवून सपनाला शुक्रवारी रात्री चाईल्ड लाईनच्या हवाली केले.

नातेवाईकांनी घेतले ताब्यात

दरम्यान, आज दुपारी बलरामपूर पोलीस सपनाच्या नातेवाईकांसह नागपुरात पोहचले. त्यांनी प्राथमिक विचारपूस केल्यानंतर कागदोपत्री औपचारिकता पूर्ण करून सपनाला आपल्या ताब्यात घेतले. हे पथक आज सायंकाळी बलरामपूरकडे रवाना झाले. सपनाच्या कथनाचे वास्तव तपासून पुढील कारवाई बलरामपूर पोलीस करणार असल्याचे स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितले.
 

Web Title: kidnapped sapna in chhattisgarh will reach the family

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस