नागपुरात तरुणाला मारहाण करून केले अपहरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2018 12:06 AM2018-02-04T00:06:07+5:302018-02-04T00:07:28+5:30
प्रेम प्रकरणात निर्माण झालेल्या त्रिकोणातून एका तरुणाचे अपहरण करून सशस्त्र आरोपींनी त्याला बेदम मारहाण केली. वेळीच पोलिसांना माहिती मिळाल्याने त्यांनी आरोपींची शोधाशोध केली. ते कळाल्याने आरोपींनी त्या तरुणाला मारहाण करून सोडून दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : प्रेम प्रकरणात निर्माण झालेल्या त्रिकोणातून एका तरुणाचे अपहरण करून सशस्त्र आरोपींनी त्याला बेदम मारहाण केली. वेळीच पोलिसांना माहिती मिळाल्याने त्यांनी आरोपींची शोधाशोध केली. ते कळाल्याने आरोपींनी त्या तरुणाला मारहाण करून सोडून दिले. फुटाळ्याच्या चौपाटीवर शुक्रवारी रात्री ९.३० वाजता ही घटना घडली.
अॅन्डी ऊर्फ कुलदीपसिंग उत्तमसिंग (वय २४) असे या प्रकरणातील अपहृत तरुणाचे नाव आहे. तो हजारीपहाड भागात राहतो. पोलिसांच्या माहितीनुसार, प्रेमत्रिकोणात सहभागी असलेल्या अॅन्डीने आरोपी आकाश ऊर्फ आशूच्या नावाने शिवीगाळ केली. ते कळाल्याने आरोपी आशिष ऊर्फ आशू कुत्तरमारे (वय २८, रा. रामदासपेठ), सानू कन्हैयालाल मंडपे (वय २६, रा. रामदासपेठ, सीताबर्डी) आणि त्याच्या एका अल्पवयीन साथीदाराने शुक्रवारी रात्री ९ च्या सुमारास अॅन्डीला फुटाळा तलावाच्या चौपाटीवर पकडले. त्याला चाकूचा धाक दाखवून बेदम मारहाण केली. आशूची बदनामी केल्यास जीवे ठार मारू, अशी धमकी देऊन त्याला आपल्या स्वीफ्ट कारमध्ये कोंबले. त्याचे अपहरण करून आरोपींनी त्याला पळवून नेल्याची माहिती कळताच अंबाझरी तसेच गुन्हे शाखेचा पोलीस ताफा शोधाशोध करू लागला. गुन्हे शाखेच्या पथकाने तसेच अंबाझरी पोलिसांनी संयुक्त कारवाई करून आरोपी आशू कुत्तरमारे, सानू मंडपे आणि त्यांच्या एका अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेतले. अॅन्डीच्या तक्रारीवरून त्यांच्याविरुद्ध अपहरण तसेच मारहाणीचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. पुढील तपास सुरू आहे.