अल्पवयीन मुलीला पळवून नेणाऱ्याला आरपीएफने पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:07 AM2021-06-11T04:07:28+5:302021-06-11T04:07:28+5:30
प्राप्त माहितीनुसार, रेल्वे सुरक्षा बलचे आरक्षक आदेशकुमार गुप्ता आणि नीरजकुमार बुधवारी सकाळी नागपूर स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक-२ वर गस्त घालत ...
प्राप्त माहितीनुसार, रेल्वे सुरक्षा बलचे आरक्षक आदेशकुमार गुप्ता आणि नीरजकुमार बुधवारी सकाळी नागपूर स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक-२ वर गस्त घालत होते. तेव्हा त्यांना एक अल्पवयीन मुलगी कुटुंबीयांविना संदिग्ध स्थितीत दिसून आली. तिची विचारपूस केल्यानंतर तिने आपले नाव कुसुम (काल्पनिक), वय १७ आणि पत्ता मंडला असे सांगितले. डिंडोरी जिल्ह्यातील रहिवासी रामसिंह महेशसिंह चौधरी (२१) याच्यासोबत बसने नागपुरात आल्याचे ती म्हणाली. या आधारावर कुसुम आणि रामसिंहला आरपीएफ ठाण्यात आणण्यात आले. सहायक उपनिरीक्षक सीताराम जाट यांनी कुसुमच्या वडिलांशी मोबाइलवरून बातचीत केली. तिच्या वडिलांनी माझी मुलगी नातेवाईक रामसिंह याच्यासोबत घरी कुणालाही न सांगता निघून गेल्याचे सांगितले. या घटनेची तक्रार पोलिसांत केलेली नाही. दोन ते तीन दिवसांत नागपुरात येऊन मुलीला घेऊन जाऊ, असे ते म्हणाले. त्यानंतर कुसुम आणि रामसिंहला पुढील कारवाईसाठी रेल्वे चाईल्ड प्रतिनिधी अंजली शेरेकर यांच्या हवाली करण्यात आले. त्यानंतर चाईल्ड लाइनच्या मदतीने दोघांनाही रेल्वे पोलिसांच्या हवाली केले. याप्रकरणी जीआरपी ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.