अपहरण करणारा पोलिसांच्या कोठडीत : २२ पर्यंत पीसीआर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2020 01:17 AM2020-09-19T01:17:10+5:302020-09-19T01:18:32+5:30

तीन वर्षीय चिमुकल्याचे अपहरण करून त्याला नेपाळला नेण्याच्या तयारीत असलेला आरोपी फारुख ऊर्फ बम्बईया इब्राहिम खान (वय ५०) याला सक्करदरा पोलिसांनी इंदूर (मध्य प्रदेश) मध्ये अटक करून नागपुरात आणले.

Kidnapper in police custody: PCR up to 22 | अपहरण करणारा पोलिसांच्या कोठडीत : २२ पर्यंत पीसीआर

अपहरण करणारा पोलिसांच्या कोठडीत : २२ पर्यंत पीसीआर

Next
ठळक मुद्देअपहृत बालक आईच्या कुशीत

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : तीन वर्षीय चिमुकल्याचे अपहरण करून त्याला नेपाळला नेण्याच्या तयारीत असलेला आरोपी फारुख ऊर्फ बम्बईया इब्राहिम खान (वय ५०) याला सक्करदरा पोलिसांनी इंदूर (मध्य प्रदेश) मध्ये अटक करून नागपुरात आणले.
पोलिसांनी त्याच्या ताब्यातून बालकाची सुखरूप सुटका करून त्याला गुरुवारी पहाटे त्याच्या आईच्या कुशीत सोपविले.
फारुखऊर्फ बम्बईया इब्राहिम खान मूळचा नेपाळच्या विराटनगर, भूमी प्रशासन चौक तिंगतौलिया येथील रहिवासी आहे. काही वर्षांपासून तो जालना जिल्ह्यातील मोहपुरी (ता. अंबड) येथे राहत होता. नुकताच तो नागपुरात आला होता. तो लकडा पॉलिश करायचा.
आरोपी फारुखने ताजबागमधील फु टपाथवर राहणाऱ्या फिरदोस फातिमा शब्बीर खान नामक महिलेचा तीन वर्षीय चिमुकला अदनान समीर याला पतंग घेऊन देतो, असे म्हणून सोमवारी सकाळी ८ वाजता उचलून नेले होते. तो सायंकाळ झाली तरी परतला नाही. त्यामुळे फातिमाने सक्करदरा पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलिसांनी आरोपींच्या शोधासाठी लगेच धावपळ सुरू केली. आरोपी अकोल्याकडे जात असल्याचे कळताच पोलीस तिकडे धावले. मात्र तेथून तो मध्य प्रदेशातील इंदूरकडे गेल्याचे लक्षात आल्यानंतर स्थानिक वरिष्ठांनी इंदूरचे डीआयजी हरिनारायणाचारी मिश्र यांना माहिती कळविली. त्यामुळे इंदूर पोलिसांनी तत्परता दाखवून आरोपी फारुखला चिमुकल्या समीरसह मंगळवारी एका बसमधून ताब्यात घेतले. इंदूर पोलिसांनी नागपूर पोलिसांना ही माहिती कळविली. त्यानुसार सक्करदरा पोलिसांचे पथक इंदूरला रवाना झाले. बुधवारी आरोपी तसेच चिमुकल्याला ताब्यात घेतल्यानंतर हे पथक गुरुवारी पहाटे २.३० ला नागपुरात पोहोचले.

पोलिसांचे ६० तासांचे परिश्रम
सलग ६० तासापर्यंत पोलिसांनी धावपळ केल्यामुळेच चिमुकला सुखरूप त्याच्या आईच्या कुशीत पोहोचला. ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहआयुक्त नीलेश भरणे, उपायुक्त विवेक मासाळ आणि सहायक आयुक्त विजय धोपावकर यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार सत्यपाल माने, द्वितीय निरीक्षक चंद्रकांत यादव यांच्या नेतृत्वात सहायक पोलीस निरीक्षक सागर आव्हाड, राजू बस्तवाड, उपनिरीक्षक राष्ट्रपाल लोखंडे, मधुकर टुले, शिपाई गोविंद देशमुख, रोहन चौधरी, नीलेश शेंदरे, पवन लांबट, राशीद शेख, मनोज ढोले तसेच मिथुन नाईक आणि दीपक तऱ्हेकर यांनी बजावली.

आरोपीची चौकशी सुरू
आरोपी फारुखला गुरुवारी पोलिसांनी न्यायालयात हजर करून त्याची २२ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी मिळवली. चिमुकल्या अदनानला नेपाळला नेण्यामागे त्याचा कोणता हेतू होता, तसेच त्याने यापूर्वी आणखी काही गुन्हे केले का, त्याची चौकशी केली जात आहे.

Web Title: Kidnapper in police custody: PCR up to 22

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.