अग्रवाल यांना निर्जन ठिकाणी नेऊन वसुलणार होते खंडणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2018 09:18 PM2018-07-04T21:18:14+5:302018-07-04T21:20:59+5:30
हल्दीराम फूड प्रा. लि. कंपनीचे मालक राजेंद्र अग्रवाल यांचे अपहरण करून त्यांना निर्जन ठिकाणी न्यायचे आणि अग्रवाल यांच्या नातेवाईकांकडून खंडणीची रक्कम मागायची, असा आरोपींचा कट होता. पोलिसांच्या तपासात आरोपींनी या प्रकारची कबुलीजबाबवजा माहिती तपास अधिकाऱ्यांना दिली आहे. दरम्यान, या प्रकरणातील आरोपींची संख्या वाढण्याची शक्यताही सूत्रांनी वर्तविली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : हल्दीराम फूड प्रा. लि. कंपनीचे मालक राजेंद्र अग्रवाल यांचे अपहरण करून त्यांना निर्जन ठिकाणी न्यायचे आणि अग्रवाल यांच्या नातेवाईकांकडून खंडणीची रक्कम मागायची, असा आरोपींचा कट होता. पोलिसांच्या तपासात आरोपींनी या प्रकारची कबुलीजबाबवजा माहिती तपास अधिकाऱ्यांना दिली आहे. दरम्यान, या प्रकरणातील आरोपींची संख्या वाढण्याची शक्यताही सूत्रांनी वर्तविली आहे.
मध्यभारतातील व्यापारी-उद्योजकांत प्रचंड खळबळ निर्माण करणाऱ्या या प्रकरणाचा उलगडा करून धंतोली पोलिसांनी २ जुलैच्या रात्री टळलेल्या या अपहरण कांडाचा सूत्रधार पप्पू ऊर्फ श्यामबहादूर समशेर सिंग (वय ४०, रा. हिवरीनगर), सौरभ भीमराव चव्हाण (वय २१), रोहित राजेंद्र घुमडे (वय २९), अतुल गोपाळ पाटील (वय २४), विनोद भूमेश्वर गेडाम (वय २३) यांना अटक केली. न्यायालयातून त्यांची ९ जुलैपर्यंत पोलीस कोठडी मिळवण्यात आली आहे. त्यांचा साथीदार बाळू ऊर्फ नीलेश अंबाडरे (वय २७, रा. इमामवाडा) हा फरार आहे.
अटकेतील आरोपींकडून पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली एक मारुती व्हॅनही जप्त केली आहे. या आरोपींची गेल्या ४८ तासांपासून पोलीस चौकशी करीत आहेत. त्यांनी या गुन्ह्यात आणखी काही आरोपी असल्याची कबुली पोलिसांना दिल्याचे समजते. सूत्रांच्या माहितीनुसार, अग्रवाल यांना कळमेश्वर मार्गावर एका निर्जन ठिकाणी नेऊन तेथून त्यांच्या नातेवाईकांना फोन करायचा आणि खंडणीची रक्कम वसूल करायची, असाही आरोपींचा कट होता,असे आरोपींनी सांगितल्याचे समजते.