सना खान प्रकरणात नागपुरात अपहरणाचा गुन्हा दाखल; तपास पथक परत जबलपूरकडे रवाना
By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2023 10:23 AM2023-08-11T10:23:36+5:302023-08-11T10:24:10+5:30
जबलपूर पोलिसांच्या भूमिकेवर संशय
नागपूर : भाजप पदाधिकारी सना खान या बेपत्ता झाल्याच्या प्रकरणात अनेक बाबी संशयास्पद आहेत. प्रकरण गंभीर असूनदेखील जबलपूर पोलिसांनी आवश्यक तशी पावले उचललेली नसल्याने विविध प्रश्न उपस्थित होत आहेत. दरम्यान, नागपुरातील मानकापूर पोलिस ठाण्यात गुरुवारी जबलपूर येथील गुन्हेगार व या प्रकरणातील संशयित अमित साहूविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाण्यातील पथक तपासासाठी जबलपूरला रवाना करण्यात आले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
सना खान या १ ऑगस्टला अमित साहूला भेटण्यासाठी गेल्या होत्या. तेव्हापासून त्या बेपत्ताच होत्या. अमित साहू हा जबलपूरचा गुन्हेगार आहे. सना यांच्या आईने मानकापूर पोलिस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल केली. मानकापूर पोलिसांनी तत्काळ जबलपूरला एक पथक पाठवून मध्य प्रदेश पोलिसांच्या मदतीने महिला पदाधिकाऱ्यासह अमित साहू आणि त्याचा भाऊ मनीष यांचा शोध घेतला. तिघांचाही काहीच सुगावा लागलेला नव्हता. दरम्यान, पोलिसांनी अमितचा नोकर जितेंद्र गौडला अटक केली. त्याने चौकशीदरम्यान अमितची गाडी धुतल्याची कबुली दिली. गाडीत रक्त सांडले होते व त्याच्या सांगण्यावरून गाडी स्वच्छ केल्याची तसेच रक्ताने माखलेले कपडे एका नदीत फेकल्याची त्याने माहिती दिली. त्यामुळे सना यांच्यासोबत बरेवाईट झाल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. मात्र जबलपूर पोलिस तपास करत असल्याने नागपूर पोलिसांच्या पथकाला हात हलवत परत यावे लागले होते.
पोलिसांची उदासीनता पाहून सनाच्या आईने गुरुवारी मानकापूर पोलिस ठाण्यात पप्पू साहू याने आपल्या मुलीचे अपहरण केल्याची तक्रार दाखल केली. त्याआधारे पोलिसांनी साहूविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. तक्रारीनुसार साहूने सनाला जबलपूरला बोलावले. तेथे पोहोचल्यानंतर षडयंत्र करून तिला गायब करण्यात आले. सनाकडे १० तोळे सोन्याचे दागिनेही होते. दागिन्यांचा मागमूसही सापडला नाही. अपहरणाचा गुन्हा दाखल केल्यानंतर मानकापूर पोलिसांनी एक तपास पथक जबलपूरला रवाना केले आहे.