नागपुरात साडेचार वर्षांच्या चिमुकल्याचे अपहरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2018 11:30 PM2018-09-06T23:30:12+5:302018-09-06T23:31:51+5:30
घराशेजारी राहणाऱ्या एका आरोपीने साडेचार वर्षांच्या चिमुकल्याचे अपहरण केले. तो रडत असल्याने गप्प करण्यासाठी या निरागस बालकाला मारहाणही केली. मोखारे कॉलेजच्या सुरक्षा रक्षकाचे वेळीच लक्ष गेल्यामुळे त्याने आरोपीला हटकले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. चिमुकल्याला तेथेच सोडून आरोपी पळून गेला. ही खळबळजनक घटना बुधवारी दुपारी ४ ते ४.३०च्या सुमारास सोनेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. यामुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : घराशेजारी राहणाऱ्या एका आरोपीने साडेचार वर्षांच्या चिमुकल्याचे अपहरण केले. तो रडत असल्याने गप्प करण्यासाठी या निरागस बालकाला मारहाणही केली. मोखारे कॉलेजच्या सुरक्षा रक्षकाचे वेळीच लक्ष गेल्यामुळे त्याने आरोपीला हटकले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. चिमुकल्याला तेथेच सोडून आरोपी पळून गेला. ही खळबळजनक घटना बुधवारी दुपारी ४ ते ४.३०च्या सुमारास सोनेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. यामुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
नैतिक नितीन सायरे असे अपहृत बालकाचे नाव आहे. त्याचे वडील खासगी काम करतात तर आई वंदना गृहिणी आहे. नैतिकला एक बहीण आहे. हा परिवार स्वावलंबीनगरातील मनीषनगर लेआऊटमध्ये राहतो. बुधवारी दुपारी ४ च्या सुमारास नैतिक खेळता खेळता गेटबाहेर गेला. ही संधी साधून आरोपी शेखर बालाजी जाधव (वय २३, रा. न्यू पिरॅमिड सिटीसमोर, नागपूर) याने चिमुकल्या नैतिकचे अपहरण केले. त्याला त्याने मोखारे कॉलेजजवळ नेले. अनोळखी शेखर जबरदस्तीने घेऊन पळत असल्याने चिमुकला नैतिक घाबरला होता. त्यामुळे तो रडू लागला. आरोपीने त्याचे तोंड दाबून त्याला गप्प करण्याचा प्रयत्न झाला. तो ऐकत नसल्याचे पाहून त्या चिमुकल्याच्या गालावर थापडा मारल्या. हा प्रकार पाहून मोखारे कॉलेजच्या सुरक्षा रक्षकाला संशय आला. त्यांनी आरोपी शेखरला हटकले. त्यामुळे आरोपीने नैतिकला तेथेच सोडून पळ काढला. सुरक्षा रक्षकाची आरडाओरड ऐकून कॉलेजमधील कर्मचारी बाहेर आले. त्यातील प्रणाली राऊत नामक महिला सायरे यांच्या शेजारी राहत असल्याने त्यांनी नैतिकला ओळखले. त्यांनी लगेच नैतिकच्या आई वंदना यांना फोन करून कॉलेजच्या जवळ नैतिक रडत असल्याची माहिती दिली. परिणामी सायरे कुटुंबीय लगेच तेथे पोहचले. त्यांनी चिमुकल्या नैतिकला जवळ घेतल्यानंतर त्याचे अपहरण झाले होते, हे उघड झाले. अपहरण करणारा आरोपी शेखरने त्याला मारहाण केल्याचेही त्याच्या गालावरच्या ओरबडल्यावरून दिसत होते. वंदना सायरे यांनी सोनेगाव पोलिसांकडे तक्रार नोंदवली.
तीव्र संतापाचे वातावरण
चिमुकल्याचे अपहरण झाल्याची वार्ता परिसरात वायुवेगाने पोहचली. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. अनेकांनी सायरेंच्या घरासमोर आणि नंतर सोनेगाव ठाण्यात गर्दी केली.
निरागस बालकाला आरोपीने मारहाणही केल्याचे कळाल्याने तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत ठाणेदार मनोहर कोटनाके यांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून घेत लगेच आरोपीची शोधाशोध सुरू केली. त्याच्या घरी पोलीस पथक पोहचले असता तो तीन ते चार दिवसांपासून घरी आलाच नसल्याचे कुटुंबीयांनी सांगितले.
आजूबाजूच्यांनी नेताना बघितले
आरोपी शेखर जाधव हा सायरे यांच्या घराजवळच राहत होता. नुकतेच त्याच्या कुटुंबीयांनी बेसा परिसरात घर बांधल्याने तो परिवारासह तिकडे राहायला गेला. सूत्रांच्या माहितीनुसार, आरोपी शेखर गुन्हेगारी वृत्तीचा आहे. तो रोजगाराच्या निमित्ताने पुण्याला गेला होता. राखीच्या निमित्ताने नागपूरला आला आणि त्याने चिमुकल्याच्या अपहरणासारखा गंभीर गुन्हा केला. नैतिकला उचलून स्कुटीवर नेताना त्याला आजूबाजूच्यांनी बघितले होते. त्यावेळी तो अपहरणासारखा गुन्हा करीत आहे, अशी कल्पनाही कुणी केली नाही. लाडाने घेऊन जात असावे, असे शेजाºयांना वाटले. त्याने घरापासून एक ते दोन किलोमीटर दूर अंतरावर मारहाण करून नैतिकला सोडले आणि पळ काढल्याने हा अपहरणाचा प्रकार असल्याचे सर्वांच्या लक्षात आले. दरम्यान, नैतिक गरीब कुटुंबातील मुलगा आहे. त्यामुळे त्याच्या अपहरणामागे आरोपीचा नेमका कोणता उद्देश होता, असा प्रश्न निर्माण झाला आहे. आरोपीच्या अटकेनंतरच त्याचा खुलासा होणार आहे.