स्वत:चेच अपहरण, स्वत:च केली खंडणीची मागणी अन् स्वत:च दिली जीवे मारण्याची धमकी

By नरेश डोंगरे | Published: April 30, 2023 09:07 PM2023-04-30T21:07:47+5:302023-04-30T21:07:54+5:30

ऑनलाईन जुगाराच्या व्यसनाने तरुण बेभान : जन्मदात्यांनाच धरले वेठीस

Kidnapping himself, demanding ransom and threatening to kill himself | स्वत:चेच अपहरण, स्वत:च केली खंडणीची मागणी अन् स्वत:च दिली जीवे मारण्याची धमकी

स्वत:चेच अपहरण, स्वत:च केली खंडणीची मागणी अन् स्वत:च दिली जीवे मारण्याची धमकी

googlenewsNext

नागपूर : यवतमाळ जिल्ह्यातील एक व्यक्ती घामाघूम होऊन रेल्वे पोलीस ठाण्यात शिरतो. त्यांच्या चिंताग्रस्त चेहऱ्यावर प्रचंड दडपण अन् बऱ्याच शंका-कुशंका दिसतात. त्या बघून रेल्वेच्या पोलीस निरीक्षक मनीषा काशिद, त्यांचे सहकारी काही वेळेसाठी अस्वस्थ होतात. काही तरी गंभीर असल्याचा अंदाज आल्यामुळे पोलीस त्या व्यक्तीला 'काय झाले' अशी थेट विचारणा करतात. 'मुलाचे अपहरण झाले. सुटकेसाठी दोन लाख रुपयांची खंडणी अपहरणकर्ते मागत आहेत. खंडणीची रक्कम दिली नाही तर'... असे म्हणताना ते रडायचेच बाकी राहतात. आपल्या मोबाईलमध्ये कथित अपहरणकर्त्यांनी पाठविलेले मुलगा रोशन (काल्पनिक नाव, वय २१) याचे फोटोही पोलिसांना दाखवितात. तातडीने मदत करा, नाही तर.... म्हणत रोशनचे वडिल रडू लागतात.

फोटोत रोशनचे पाय आणि तोंडाला स्कार्फ बांधून दिसतो. त्याचे हात मात्र त्याने स्वत:च पाठीमागे घेतल्यासारखे दिसते. त्यामुळे पोलीस चमकतात. ठाणेदार काशिद लगेच आपल्या वरिष्ठांना माहिती देऊन अपहृत रोशनच्या मोबाईलवर संपर्क करतात. तो प्रतिसाद देत नाही मात्र व्हॉटस्अॅपवर चॅटिंग करतो. त्यामुळे पोलिस अधिकारी त्याचे मोबाईल लोकेशन काढून वेगवेगळ्या चमू कामी लावतात. तीन - चार तास शोधाशोध केल्यानंतर कथित अपहृत रोशन झिरो माईल जवळ दिसून येतो. त्याला ताब्यात घेतल्यानंतर या कथित अपहरणनाट्याचा दुसरा अंक सुरू होत आणि तो संबंधितांना स्तंभित करणारा ठरतो.

रोशन नोकरीचे ट्रेनिंग आहे म्हणून ८ एप्रिलला भोपाळला जातो, असे सांगून तो गावातून बाहेर पडतो. २४ एप्रिलपर्यंत त्याचे कुटुंबीयांशी फोनवर बोलणे सुरू असते. भोपाळला ट्रेनिंग झाले आणि आता नागपूरला रेल्वेस्थानकावर हिरवी झेंडी दाखविण्याची आपल्याला नोकरी मिळाली, असे तो सांगतो. त्यामुळे घरची मंडळी जाम खूष होते. मात्र, २४ तारखेनंतर त्याचा मोबाईल बंद होतो अन् २५ तारखेला त्याच्याच मोबाईलवरून त्याच्या वडिलांना त्याचे अपहरण झाल्याचा मेसेज येतो. पुढचे दोन दिवस दोन लाख रुपयांच्या खंडणीचे मेसेज, रोशनचे तोंड, पाय बांधलेले फोटो अन् धमक्याही मिळतात.

'सब कुछ झूठ !

पोलिसांनी चौकशी सुरू केल्यानंतर रोशनने वडिलांसोबतच प्रारंभी पोलिसांचीही दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतो. मात्र, पोलिसांनी त्याची थोडीफार कानशेकणी करताच तो हलका होतो. वडिलांना त्याने नोकरी मिळाल्याची दिलेली गोड बातमी, त्यानंतर त्याचे झालेले अपहरण आणि त्याच्या वडिलांच्या मोबाईलवर हात-पाय तोंड बांधल्यासारखे दिसणारे फोटो 'सब कुछ झूट' असल्याचे तो कबुल करतो.

म्हणून रचला डाव
रोशनला ऑनलाईन रमी खेळण्याचा शाैक आहे. त्यामुळे घरून मिळणारे सर्व पैसे तो रमीत उडवित होता. घरून नागपुरात आल्यानंतर तो बर्डीतील एका लॉजमध्ये थांबला होता. तेथे त्याने जवळची सर्व रक्कम रमीत उडवली अन् लॉजचे चार हजारांचे बीलही थकविले. ते वसुल करण्यासाठी वारंवार फोन येत असल्याने त्याने स्वत:च्या अपहरणाचा डाव रचून स्वत:च वडिलांना आधी एक तर नंतर दोन लाखांची खंडणी मागून स्वत:लाच जीवे मारण्याची धमकी दिल्याचे कबुल केले.

रम असो, रमा असो की रमी...
म्हणतात की, रम असो, रमा असो की रमी यात जो गुंतला त्याची मती फिरतेच. नंतर तो काय करेल, त्याचा नेम नसतो. आपण काय करतो, त्याचेही त्याला भान नसते. या प्रकरणात रमीच्या आहारी गेलेल्या रोशनचे वर्तन असेच बेभान होते. त्यामुळे त्याने सलग तीन दिवस आपल्या जन्मदात्यांचे, नातेवाईकांचे अन्न-पाणी कडू केले. मात्र, पीआय मनीषा काशिद, एपीआय अश्विनी पाटील, पीएसआय ओमप्रकाश भलावी आणि अंमलदार प्रवीण खवसे यांनी रोशनचे वडिल पोलीस ठाण्यात पोहचल्यानंतर अवघ्या तीन तासांत रोशनचा छडा लावून या कथित अपहरण अन् खंडणी प्रकरणातील वास्तव बाहेर आणले.

Web Title: Kidnapping himself, demanding ransom and threatening to kill himself

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.