नागपुरात चाकूच्या धाकावर अपहरण : २० लाखांची खडणी मागितली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2020 06:55 PM2020-05-09T18:55:17+5:302020-05-09T20:53:44+5:30

धरमपेठमधील एका दुकानाच्या व्यवहारातून वाद निर्माण झाल्यामुळे आपले आणि आपल्या मुलाचे ६ ते ७ आरोपींनी चाकूच्या धाकावर अपहरण करून २० लाख रुपयांची खंडणी मागितल्याची तक्रार एका व्यक्तीने पोलिसांकडे नोंदविली आहे.

Kidnapping at knife point in Nagpur: Rs 20 lakh demanded | नागपुरात चाकूच्या धाकावर अपहरण : २० लाखांची खडणी मागितली

नागपुरात चाकूच्या धाकावर अपहरण : २० लाखांची खडणी मागितली

Next
ठळक मुद्देधरमपेठमधील दुकानाचा वाद : ११ हजार हिसकावून नेले : सदरमध्ये गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : धरमपेठमधील एका दुकानाच्या व्यवहारातून वाद निर्माण झाल्यामुळे आपले आणि आपल्या मुलाचे ६ ते ७ आरोपींनी चाकूच्या धाकावर अपहरण करून २० लाख रुपयांची खंडणी मागितल्याची तक्रार एका व्यक्तीने पोलिसांकडे नोंदविली आहे.
२ मे २०१९ ते २७ फेब्रुवारी २०२० यादरम्यान घडलेल्या या प्रकाराची तक्रार घेऊन पोलिसांनी शुक्रवारी गुन्हा दाखल केला आहे. गौरव दिलीप दाणी (वय ३८) असे तक्रार नोंदविणाऱ्याचे नाव आहे. दाणी मयूरेश अपार्टमेंट विनायकनगर, एमआयडीसी येथे राहतात. दाणी यांच्या तक्रारीनुसार, त्यांची भगवाघर ले-आऊट धरमपेठमध्ये शिवगौरव इस्टेट ही वडिलोपार्जित मालमत्ता आहे. यातील एका दुकानाच्या व्यवहारातून आरोपींसोबत त्यांचा वाद सुरू होता. या मालमत्तेतील दुकान आपल्याला देण्यात यावे, यासाठी अनेकदा त्यांच्यात भांडणही झाले. या पार्श्वभूमीवर, आरोपी अंकित पाली, रोशन शेख अभिषेक व त्यांच्या तीन ते चार साथीदारांनी २ मे २०१९ ते २७ फेब्रुवारी २०२० या दरम्यान सदरमधील मोती महाल रेस्टॉरन्ट येथून दाणी यांना चाकूचा धाक दाखवून जबरदस्तीने वाहनात बसविले. त्यांना आणि त्यांच्या मुलाला जीव घेण्याची भीती दाखवून २० लाख रुपये खंडणीची मागणी केली.

ज्या दुकानाचा वाद सुरू आहे, ते दुकान आपल्या सुपूर्द करावे, यासाठी आरोपींनी दाणी यांच्या मानेवर व छातीवर चाकू लावला तसेच त्यांच्या खिशातील ९ ते ११ हजार रुपये हिसकावून घेतले. आरोपींनी आपल्याला अनेकदा मारहाण करून खंडणीची मागणी केली, असेही दाणी यांनी तक्रारीत नमूद केले आहे. याप्रकरणी गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पोलिसांनी शुक्रवारी सदर पोलिस ठाण्यात जाऊन अपहरण करून जीवे मारण्याची धमकी देणे आणि खंडणीची मागणी करणे तसेच ९ ते ११ हजार रुपये हिसकावून घेणे, अशा आरोपावरून विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला. विशेष म्हणजे, सदर पोलीस ठाण्यात या गुन्ह्याविषयी माहिती विचारली असता पोलिसांनी हे प्रकरण थेट गुन्हे शाखेकडून दाखल झाल्यामुळे आपल्याला काहीही माहिती नसल्याचे सांगितले.

विलंबाचे कारण अंधारात
२ मे २०१९ ते २७ फेब्रुवारी २०२० या दरम्यान हा गुन्हा घडल्याचे दाणी यांनी तक्रारीत नमूद केले आहे. मात्र हा गुन्हा दाखल करण्यास पोलिसांनी एवढा विलंब का लावला, याबाबत माहिती देण्यास पोलिस टाळाटाळ करीत आहे. त्यामुळे या प्रकरणातील संशय वाढला आहे.

कुख्यात रोशन शेखला अटक

२० लाख रुपयाच्या खंडणी प्रकरणाचा मुख्य सूत्रधार रोशन शेख असल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे.
गुन्हा दाखल होताच पोलिसांनी त्याची शोधाशोध करून ताब्यात घेतले. त्याची वैद्यकीय तपासणी करून शनिवारी रात्री त्याला अटक करण्यात आली. दरम्यान, रोशन याने अनेक जणांना ब्लॅकमेल केल्याचीही माहिती पुढे आली आहे. गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त गजानन शिवलिंग राजमाने यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट २ चे प्रमुख, पोलीस निरीक्षक अनिल ताकसांडे या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

Web Title: Kidnapping at knife point in Nagpur: Rs 20 lakh demanded

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.