गरीब दाम्पत्याशी सलगी करून सहा महिन्यांच्या चिमुकल्याचे अपहरण; अमरावतीतील घटना

By नरेश डोंगरे | Published: July 11, 2024 10:37 PM2024-07-11T22:37:31+5:302024-07-11T22:38:04+5:30

रेल्वे स्थानकावरच्या घटकाभराच्या ओळखीनंतर आरोपी महिलेकडून विश्वासघात

Kidnapping of a six-month-old baby from poor couple Incident in Amravati | गरीब दाम्पत्याशी सलगी करून सहा महिन्यांच्या चिमुकल्याचे अपहरण; अमरावतीतील घटना

गरीब दाम्पत्याशी सलगी करून सहा महिन्यांच्या चिमुकल्याचे अपहरण; अमरावतीतील घटना

नरेश डोंगरे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: गरीब दाम्पत्याशी सलगी करून एका महिलेने अमरावती जिल्यातील एका दाम्पत्याच्या सहा महिन्याच्या चिमुकल्याचे अपहरण केले. गुरुवारी पहाटे येथील मुख्य रेल्वे स्थानकावर ही घटना घडली. दरम्यान, अपहरण करणाऱ्या महिलेची कसलीही माहिती उपलब्ध नसल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.

ललिता आणि उमाकांत इंगळे (वय ३०) हे दाम्पत्य अमरावती जिल्ह्यातील राजूरा येथील रहिवासी आहे. ते रोजमजुरी करतात. त्यांना एक पाच वर्षांचा तर दुसरा सहा महिन्यांचा चिमुकला असून त्याचे नाव राम आहे. ललिता काहीशी गतीमंद आहे. घरगुती समस्यांमुळे वैतागलेले हे दाम्पत्य बुधवारी सायंकाळी गोंदिया येथे जायला निघाले. दरम्यान, बडनेरा रेल्वे स्थानकावर त्यांच्याकडे एक महिला आली. तिने इंगळे दाम्पत्याशी सलगी करून कुठे चालले, काय करता वगैरे माहिती काढली. इंगळेंनी गोंदियाला जात असल्याचे सांगताच, आरोपी महिलेने आपणही गोंदियाला जात आहे, असे सांगितले. नंतर ते सर्व रात्रीच्या पुणे-हटिया एक्सप्रेसने नागपूर स्थानकावर पहाटे १.४५ वाजता पोहचले. गोंदियाला जायला सकाळची गाडी असल्याने त्यांनी फलाट क्रमांक ४ वर मुक्काम केला. खूप भूक लागल्याचे सांगितल्यामुळे उमाकांतने पहाटे ३ वाजता सर्वांसाठी समोसे आणले. ते खाल्ल्यानंतर हे सर्व पहाटे ४ पर्यंत गप्पा करीत बसले. नंतर झोपी गेले. सकाळी ७.३० ला उमाकांतला जाग आली तेव्हा त्याला सहा महिन्याचा राम आईच्या कुशित दिसला नाही. त्याने पत्नीला उठविले आणि चिमुकल्याबाबत विचारणा केली. नंतर बाजुची महिलाही गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे इंगळे दाम्पत्य आपल्या पाच वर्षीय मुलाला सोबत घेऊन रेल्वे स्थानकावर चिमुकल्यासह त्या महिलेचाही शोध घेऊ लागले. सकाळचे ९ वाजले तरी ते दोघे आढळले नाही. त्यामुळे त्यांनी आरपीएफच्या माध्यमातून रेल्वे पोलीस ठाणे गाठले. चिमुकल्याच्या अपहरणाची तक्रार ऐकताच हादरलेल्या रेल्वे पोलिसांनी लगेच फलाट क्रमांक चारचे सीसीटीव्ही फुटेज तपासणे सुरू केले.
----------------
ते शोधत होते, ती नजर चुकवून निघून गेली
सैरभैर झालेले इंगळे दाम्पत्य रेल्वे स्थानकावर आपल्या चिमुकल्याचा शोध घेत होते तर त्यांच्या मुलाचे अपहरण करणारी आरोपी महिला रेल्वे स्थानकावर अमरावतीकडे जाणाऱ्या गाडीची वाट बघत होती. सकाळी ७.५५ वाजता ती वर्धा मेमू ट्रेनमध्ये बसून चिमुकल्याला घेऊन निघून गेली. सीसीटीव्हीत हा प्रकार दिसला तेव्हा सकाळचे १० वाजले होते. त्यामुळे रेल्वेच्या पोलीस निरीक्षक मनीषा काशिद यांनी त्या फुटेजवरील महिलेच्या फोटोसह गुन्ह्यांची माहिती सर्व रेल्वे पोलीस ठाणे, आरपीएफ तसेच ठिकठिकाणच्या पोलिसांना पाठविली.
----------------
तीन पथकांकडून तपास
चिमुकल्याच्या अपहरणाची माहिती कळताच रेल्वे पोलीस अधीक्षक अक्षय शिंदे आपल्या सहकाऱ्यांसह रेल्वेच्या पोलीस ठाण्यात पोहचले. त्यांनी वेगवेगळे तीन पथके नेमून अपहृत चिमुकला आणि आरोपी महिलेच्या शोधार्थ वर्धा, बडनेरा, अमरावतीकडे पाठविले. मात्र, रात्री ९ पर्यंत पोलिसांच्या हाती काहीही लागले नव्हते.
----------------
महिनाभरातच दूसरी घटना
६ जून २०२४ च्या पहाटे ४.१५ वाजता याच रेल्वे स्थानकावर अशीच घटना घडली होती. माया आणि सुनील रुढे या दोन आरोपींनी सहा महिन्यांच्या चिमुकल्याचे अपहरण करून त्याला तेलंगणात नेऊन विकण्याचा प्रयत्न केला होता. आरोपी सुनीलच्या मोबाईलवरून त्यांचा काही तासातच छडा लावण्यात त्यावेळी पोलिसांना यश आले होते. यावेळी मात्र महिला कोण, कुठली ते काहीच माहिती नाही. ती पिवळ्या साडीत आहे त्यामुळे तिचा छडा लावून चिमुकल्याला सहीसलामत सोडवून आणण्याचे आव्हान पोलिसांपुढे ठाकले आहे.
-----------------

Web Title: Kidnapping of a six-month-old baby from poor couple Incident in Amravati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.