खंडणीसाठी चार वर्षीय चिमुकलीचे अपहरण; अवघ्या दोन तासात पोलिसांनी केली सुटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2022 08:25 PM2022-06-24T20:25:52+5:302022-06-24T20:26:41+5:30
Nagpur News चार वर्षीय चिमुकली घराच्या अंगणात खेळत असताना चाॅकलेट देऊन तिचे अपहरण केले आणि नंतर तिच्या आई-वडिलांना सात लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली.
नागपूर : चार वर्षीय चिमुकली घराच्या अंगणात खेळत असताना चाॅकलेट देऊन तिचे अपहरण केले आणि नंतर तिच्या आई-वडिलांना सात लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली. खंडणी न दिल्यास त्या चिमुकलीला जिवे मारण्याची धमकीही देण्यात आली. हा प्रकार एमआयडीसी बुटीबाेरी पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील टाकळघाटनजीकच्या भारकस येथे (दि. २४) शुक्रवारी सकाळी घडला असून, पाेलिसांनी घटनेच्या दाेन तासात दाेघांना अटक करून चिमुकलीची सुटका करीत तिला आई-वडिलांच्या स्वाधीन केले.
आकाश साेनवणे, रा. गणेशपूर, ता. हिंगणा व संकेत अनिल ठाकरे, रा. टेंभरी, ता. हिंगणा अशी अटक करण्यात आलेल्या आराेपींची नावे आहेत. चार वर्षीय चिमुकली शुक्रवारी सकाळी नेहमीप्रमाणे तिच्या घराच्या अंगणात एकटीच खेळत हाेती. तिच्याकडे कुटुंबीयांचे लक्ष नसल्याचे पाहून आकाशने तिला चाॅकलेट दाखवून जवळ बाेलावले आणि तिला माेटारसायकलवर बसवून पळ काढला. चिमुकली अचानक दिसेनाशी झाल्याने घाबरलेल्या आई-वडिलांनी लगेच पाेलिसांत तक्रार दाखल केली.
चिमुकलीसह आराेपींच्या शाेधार्थ पाेलिसांनी चार पथके तयार केली हाेती. आराेपींचे माेबाइल लाेकेशन ट्रेस करीत ते नागपूर-बुटीबाेरी महामार्गावरील डाेंगरगाव शिवारात असल्याचे स्पष्ट हाेताच पाेलिसांनी सापळा रचला आणि चिमुकलीच्या जीवितास काेणताही धाेका उद्भवणार नाही, याची विशेष काळजी घेत आराेपींवर झडप घातली. यात पाेलिसांनी चिमुकलीसह आकाश व संकेतला सुरक्षितरीत्या ताब्यात घेतले. त्यानंतर दाेघांना अटक करून चिमुकलीला सुखरूप तिच्या आई-वडिलांच्या स्वाधीन केले.
याप्रकरणी एमआयडीसी बुटीबाेरी पाेलिसांनी अपहरण व खंडणीचा गुन्हा नाेंदवून तपास सुरू केला आहे. ही कारवाई पाेलीस निरीक्षक तथा ठाणेदार अशाेक काेळी, पाेलीस उपनिरीक्षक रामेश्वर राय, इकबाल शेख, प्रफुल्ल राठाेड, किशाेर डेकाटे, रमेश नागरे, भास्कर मेटकर, दीप पांडे, प्रवीण सिराम, अमाेल काेठेकर, राेशन बावणे, वंदना सारवे, सुषमा धनुष्कार, सायबर सेलचे सतीश राठाेड यांच्या पथकाने केली.
...