एक कोटीच्या खंडणीसाठी नागपुरात विद्यार्थ्याचे अपहरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2018 10:10 AM2018-10-06T10:10:21+5:302018-10-06T10:11:44+5:30
एका वाहतूक व्यावसायिकाच्या १६ वर्षीय मुलाचे एक कोटीच्या खंडणीसाठी अपहरण झाल्याचे वृत्त पुढे आले असून यामुळे पोलीस दलासह सर्वत्र खळबळ निर्माण झाली आहे.
जगदीश जोशी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : एका वाहतूक व्यावसायिकाच्या १६ वर्षीय मुलाचे एक कोटीच्या खंडणीसाठी अपहरण झाल्याचे वृत्त पुढे आले असून यामुळे पोलीस दलासह सर्वत्र खळबळ निर्माण झाली आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, वाहतूक व्यावसायिकाचा अपहृत मुलगा बारावीचा विद्यार्थी आहे. २ आॅक्टोबरला तो घरी असताना रात्री ८.३० च्या सुमारास त्याच्या मोबाईलवर काही फोन आले. त्यानंतर तो घरून बाहेर गेला. बराच वेळ होऊनही तो घरी परतला नाही. त्यामुळे चिंतित झालेल्या कुटुंबीयांनी त्याच्या मित्रांकडे आणि नातेवाईकांकडे चौकशी केली. काहीच माहिती मिळाली नाही त्यामुळे ३ आॅक्टोबरला पोलिसांकडे तक्रार नोंदवण्यात आली. अपहृत मुलगा बेपत्ता होण्यापूर्वी त्याच्या विद्यार्थी मित्रांच्या संपर्कात असल्याचे प्राथमिक चौकशीत पोलिसांच्या लक्षात आले.
त्यामुळे पोलिसांनी संबंधित विद्यार्थी-विद्यार्थिनींकडे चौकशी केली. त्यांनी अपहृत मित्रासोबत संपर्क झाल्याचे मान्य केले. मात्र, तो कुठे गेला त्याबाबत अनभिज्ञता दर्शविली.
दरम्यान, चौकशी सुरू असताना गुरूवारी रात्री अपहृत मुलाच्या मोबाईलवरून वडिलांना फोन आला.
‘भुरू बोल रहा है क्या, तेरा बेटा हमारे पास है यदि उसे सहीसलामत होना है तो एक करोड़ रुपए लगेंगे’ असे म्हणून फोन कापला. यामुळे हादरलेल्या वाहतूक व्यावसायिकांनी पोलिसांना कळविले. त्यानंतर सर्वत्र एकच खळबळ उडाली.
पोलिसांनी अपहृत मुलाशी जुळलेल्या दोन संशयास्पद युवकांवर नजर वळवली. ते दोघेही बेपत्ता असल्याचे कळाल्याने पोलिसांचा संशय वाढला. शुक्रवारी सकाळी या दोघांच्याही घरी पोलिसांनी धाव घेतली.
एकाच्या कुटुंबीयांनी गुरुवारी रात्री तो दुसऱ्यासोबत कपडे घेऊन गेल्याचे म्हटले आहे. यामुळे या दोघांवर अपहरणाचा संशय अधिकच पक्का झाला आहे.
ठिकठिकाणी छापेमारी
खंडणीसाठी यापूर्वी झालेले अपहरण आणि नंतरचा परिणाम लक्षात घेत पोलीस यंत्रणा कमालीची सक्रिय झाली आहे. त्यांनी या प्रकरणात अपहृत मुलाचा शोध घेऊन संशयितांना पकडण्यासाठी ठिकठिकाणी छापेमारी चालवली आहे. शहराच्या बाजूला असलेल्या जंगलात आणि निर्जन ठिकाणीही पोलिसांची छापेमारी सुरू आहे.