श्रद्धाच्या अपहरणकर्त्याने आधीही केले होते दोघांचे अपहरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2018 12:28 AM2018-03-25T00:28:57+5:302018-03-25T00:29:07+5:30
चार वर्षीय श्रद्धा अरुण सारवाणे हिचे अपहरण करून तिला मेडिकलमध्ये सोडून देणारा आरोपी थामदेव श्रीधर मेंढूलकर (वय ३७, रा. खरबी) याने पाच महिन्यांपूर्वी दोन चिमुकल्यांचे अपहरण केले होते, अशी खळबळजनक माहिती उजेडात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : चार वर्षीय श्रद्धा अरुण सारवाणे हिचे अपहरण करून तिला मेडिकलमध्ये सोडून देणारा आरोपी थामदेव श्रीधर मेंढूलकर (वय ३७, रा. खरबी) याने पाच महिन्यांपूर्वी दोन चिमुकल्यांचे अपहरण केले होते, अशी खळबळजनक माहिती उजेडात आली आहे. आरोपी मेंढूलकर सध्या लकडगंज पोलिसांच्या कस्टडीत असून, त्यानेच पोलिसांना या गुन्ह्याची कबुलीवजा माहिती दिली आहे.
१४ मार्चच्या दुपारी ४ च्या सुमारास आरोपी मेंढूलकरने चिमुकल्या श्रद्धाला कबुतर दाखवतो, असे म्हणून तिचे अपहरण केले आणि तिला मेडिकलमध्ये नेऊन सोडले. लकडगंज पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपीची कसून शोधाशोध केली. त्यानंतर १९ मार्चला रात्री त्याच्या खरबी चौकाजवळ मुसक्या बांधल्या. कोर्टातून त्याचा २४ मार्चपर्यंत पीसीआर मिळाला होता. कोठडीत त्याने पोलिसांना धक्कादायक माहिती दिली. नोव्हेंबर २०१७ च्या शेवटच्या आठवड्यात कन्हान गावात तो गेला होता. तेथे त्याला रस्त्यावर एक सहा वर्षांची मुलगी आणि आठ वर्षांचा मुलगा उभा दिसला. त्या दोघांजवळ जाऊन आरोपी मेंढूलकरने त्यांना ‘तुमच्या वडिलांनी बोलविले. चला तुम्हाला सोडून देतो’, असे म्हणून आपल्या दुचाकीवर बसवले. त्यानंतर मुलाला कन्हानमधीलच साई मंदिराजवळ सोडले. तर, मुलीला कामठीच्या शुक्रवारी बाजारात सोडून आरोपी पळून गेला. या प्रकरणात त्यावेळी कन्हान पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता.
कन्हान पोलीस घेणार ताब्यात
आरोपीची पोलीस कोठडी संपल्याने त्याला कारागृहात पाठविण्यात येणार असून, तेथून त्याला कन्हान पोलीस ताब्यात घेतील. त्याला दोन चिमुकल्यांच्या अपहरणाच्या आरोपात अटक केल्यानंतर कन्हान पोलीस त्याची चौकशी करणार आहेत. वरून अतिशय साधा-भोळा वाटणारा आरोपी मेंढूलकर विकृतासारखा वागतो, असे पोलीस सांगतात. तो अत्यंत धूर्त असून, श्रद्धाच्या अपहरणात लुनाचा वापर केल्याचे वृत्तपत्रातून कळताच त्याने दुसऱ्या दिवशीपासून लुना वापरणे बंद केले होते. मात्र, पोलिसांनी सीसीटीव्हीवरून त्याचे छायाचित्र मिळवून त्याला शिताफीने अटक केली.