आधुनिक सत्यवानाने दिले सावित्रीला किडनीदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2020 11:44 AM2020-01-07T11:44:43+5:302020-01-07T11:45:11+5:30
नागपुरात एका सत्यवानाने आपल्या पत्नीला किडनीदान करून जीवनदान दिले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पती सत्यवानाला मृत्यूच्या दाढेतून ओढून आणणाऱ्या सावित्रीची कथा सर्वांनाच माहीत आहे. परंतु नागपुरात एका सत्यवानाने आपल्या पत्नीला किडनीदान करून जीवनदान दिले आहे. सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील मूत्रपिंड (किडनी) प्रत्यारोपण केंद्रात जीवन वाचविण्याची ३० वर प्रकरणे आहेत. मात्र सोमवारी पहिल्यांदाच एका पतीने पत्नीला स्वत:ची किडनी दान करून पत्नीसोबतच कुटुंबाला जीवनदान दिलेय. राजेश जिभकाटे (४७) रा. पवनी भंडारा असे त्या पतीचे नाव. विशेष म्हणजे, राजेश हे शेतकरी आहेत.
प्राप्त माहितीनुसार, राजेश यांच्या पत्नी लक्ष्मी जिभकाटे (४४) यांना गेल्या काही महिन्यांपासून मूत्रपिंडाचा आजार होता. त्यांचे दोन्ही मूत्रपिंड निकामी झाले होते. जून २०१९ पासून सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या नेफ्रोलॉजी विभागात त्यांच्यावर उपचार सुरू होते. येथील डॉक्टरांनी मूत्रपिंड प्रत्यारोपणाचा सल्ला दिला. यात त्यांचे पती राजेशने पुढाकार घेतला. महत्त्वाचे म्हणजे, बहुसंख्य प्रकरणात पत्नीच्या माहेरच्याच लोकांचा रक्तगटापासून ते मूत्रपिंडाचा गु्रुप जुळला जातो.
परंतु या प्रकरणात राजेशचा रक्तगटासह इतरही गोष्टी जुळून आल्या. ६ जानेवारी रोजी मूत्रपिंड प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वी पार पडली. हे प्रत्यारोपण त्यांच्या पत्नीसाठीच नव्हे तर आईसाठी आणि तीन मुलींसाठी किती महत्त्वाचे आहे, याचे महत्त्व डोळ्यात अश्रू आणून राजेशने डॉक्टरांना सांगितले होते.
मूत्रपिंड प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे विशेष कार्यअधिकारी डॉ. मिलिंद फुलपाटील यांच्या मार्गदर्शनात मूत्रपिंड प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉ. संजय कोलते, मूत्रपिंड तज्ज्ञ डॉ. समीर चौबे, नेफ्रोलॉजी विभागाच्या प्रमुख डॉ. चारुलता बावनकुळे, यूरोलॉजी विभागप्रमुख डॉ. धनंजय सेलूकर, डॉ. कुणाल मेश्राम, डॉ. प्रतीक लढ्ढा, डॉ. रितेश बनोदे, डॉ. पीयूष किंमतकर, डॉ. वंदना आदमने व डॉ. मेहराज शेख यांंनी यशस्वी केली.