साप चावल्यामुळे महाराजबागेतील वाघिण ‘जाई’ची किडनी निकामी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2017 12:06 AM2017-11-24T00:06:12+5:302017-11-24T00:09:15+5:30
महाराजबाग प्राणिसंग्रहालयात ‘जाई’ वाघिणीच्या दोन्ही किडनी साप चावल्यामुळे निकामी झाल्या आहेत. वाघिण सक्रिय दिसत आहे, पण के्रटिनचा स्तर वाढल्यामुळे तिने खाणेपिणे सोडल्याने प्रकृती खालावली आहे, असे प्राणिसंग्रहालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
आॅनलाईन लोकमत
नागपूर : महाराजबाग प्राणिसंग्रहालयात ‘जाई’ वाघिणीच्या दोन्ही किडनी साप चावल्यामुळे निकामी झाल्या आहेत. वाघिण सक्रिय दिसत आहे, पण के्रटिनचा स्तर वाढल्यामुळे तिने खाणेपिणे सोडल्याने प्रकृती खालावली आहे, असे प्राणिसंग्रहालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
रविवार, ५ नोव्हेंबरला सायंकाळी तिच्या पिंजऱ्यात प्रेक्षकांना साप दिसला होता. त्यानंतर पायात सूज असल्यामुळे ती लंगडत होती. वाघिणीची जखम पाहण्यासाठी तिला बेशुद्ध करणे आवश्यक आहे. पण साप चावल्यामुळे मनुष्य वा वन्यजीवाला बेशुद्ध करणे जोखिमेचे असते. त्यामुळे वाघिणीला बेशुद्ध करून साप चावल्याची जखम पाहणे कठीण आहे. वाघिणीला अॅन्टी स्नेक व्हॅनमचे इंजेक्शन देण्यात आले. त्यामुळे दुसऱ्या दिवशी तिच्या पायाची सूज कमी झाली आणि तिने खाणेपिणे सुरू केले. त्यानंतर ९ नोव्हेंबरला पिंजऱ्यात सोडण्यात आले. पण वाघिणीने पुन्हा खाणेपिणे सोडले. अखेर १७ नोव्हेंबरला तिला ट्रीटमेंट केजमध्ये स्थानांतरित करण्यात आले. तिच्या रक्ताच्या नमुन्याची तपासणी केल्यानंतर किडनी निकामी झाल्याची बाब पुढे आली. सापाच्या विषाचा परिणाम थेट मूत्रपिंडावर पडला आहे. त्यामुळे तिची प्रकृती दिवसेंदिवस खालावत चालली आहे. डॉ. सुनील बावस्कर, डॉ. नारायण दक्षिणकर, डॉ. गौतम भोजने, डॉ. विनोद धूत या डॉक्टरांची चमू तिच्यावर उपचार करीत आहेत.
नऊ वर्षांपूर्वी आईपासून ताटातूट
चंद्रपूर वनक्षेत्रात नऊ वर्षांपूर्वी आईपासून ताटातूट झालेले छावे जाई, जुई, जान, ली आणि चेरी कमजोर अवस्थेत आढळून आले होते. त्यांना २ नोव्हेंबर २००८ रोजी उपचारासाठी नागपूर महाराजबाग प्राणिसंग्रहालयात आणले होते. या छाव्यांपैकी जुईची प्रकृती गंभीर होती. तिला रक्त देण्यात आले, पण उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला होता. त्यानंतर ली, जान, चेरी आणि जाई महाराजबागेत मोठी झाली. काही वर्षांपूर्वी चेरीला छत्तीसगड येथील प्राणिसंग्रहालयात पाठविण्यात आले तर ‘ली’ला गोरेवाडा प्राणिसंग्रहालयात ब्रीडिंगसाठी पाठविण्यात आले आहे. त्यानंतर महाराजबागेत वाघिण जान आणि जाई एकत्र राहतात.