‘सुपर’मध्ये किडनी ट्रान्सप्लांट!
By admin | Published: June 20, 2015 02:53 AM2015-06-20T02:53:36+5:302015-06-20T02:53:36+5:30
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाशी (मेडिकल) संलग्न असलेल्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयाला अखेर किडनी ट्रान्सप्लांट सेंटर (मूत्रपिंड प्रत्यारोपण केंद्र)...
चार सदस्यीय समितीकडून पाहणी : राज्यात प्रथमच शासकीय रुग्णालयात होणार प्रत्यारोपण
नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाशी (मेडिकल) संलग्न असलेल्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयाला अखेर किडनी ट्रान्सप्लांट सेंटर (मूत्रपिंड प्रत्यारोपण केंद्र) सुरू करण्याची मंजुरी मिळाली आहे. शासनाच्या चार सदस्यीय समितीने या संदर्भात शुक्रवारी पाहणी केली. यात आढळून आलेल्या त्रुटी दूर करण्याची लेखी हमी मिळाल्यानंतरच ही मंजुरी देण्यात आली. राज्यात प्रथमच नागपूरच्या शासकीय रुग्णालयात हे केंद्र सुरू होण्याच्या वाटेवर आहे.
शस्त्रक्रिया गृह व निवासी डॉक्टरांची कमी
‘किडनी ट्रान्सप्लांट’ सुरू करण्यासाठी आवश्यक असलेले शस्त्रक्रिया गृह व निवासी डॉक्टरांचा अभाव या दोन मुख्य त्रुटी या समितीने काढल्या. यावर अधिष्ठाता व संबंधित डॉक्टरांनी सध्याच्या स्थितीत ‘सीव्हीटीएस’च्या शस्त्रक्रिया गृहाचा वापर करण्याची व मेडिकलमधील निवासी डॉक्टरांची या केंद्रात ड्युटी लावण्याची हमी दिली. यावेळी समितीसोबत मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. निसवाडे, सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचे विशेष कार्य अधिकारी डॉ. मनीष श्रीगिरीवार, प्रसिद्ध किडनीविकार तज्ज्ञ डॉ. संजय कोलते, डॉ. समीर चौबे, डॉ. चारुलता बावनकुळे, डॉ. धनंजय सेलूकर, डॉ. श्रोते, डॉ. मकरंद देशपांडे आदी उपस्थित होते.
मूत्रपिंड निकामी झाल्यामुळे राज्यातील हजारो रु ग्ण डायलिसिसवर जगत आहेत. यातील हजाराहून अधिक रु ग्ण मूत्रपिंड प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेत आहेत. एकीकडे ब्रेन डेड घोषित केलेल्या व्यक्तीच्या (कॅडेव्हर) शरीरातून अवयव ट्रान्सप्लांटची प्रतीक्षा यादी मोठी आहे, तर दुसरीकडे शासकीय नियमांच्या गुंतागुंतीमुळे रु ग्णांना अवयवदाते मिळत नाहीत. कष्टप्रद डायलिसिसचे उपचार करून घेण्याशिवाय या रु ग्णांकडे पर्याय राहिलेला नाही. यातच हे ट्रान्सप्लांट शासकीय रुग्णालयात होत नाही. यामुळे त्यावरील खर्च सामान्यांना परडवणारा नाही. परंतु आता सुपर स्पेशालिटी रुग्णालयाला ‘किडनी ट्रान्सप्लांट’साठी मंजुरी मिळाल्याने याचा फायदा गरिबांसह सामान्य रुग्णांना होणार आहे. विशेष म्हणजे, यावर होणारा खर्च हा राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेतून होणार असल्याने दारिद्र्य रेषेखालील (बीपीएल) व दारिद्र्य रेषेवरील (एपीएल) रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे.
सुपर स्पेशालिटी रुग्णालयात ‘किडनी ट्रान्सप्लांट’ सुरू करण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरू होते. नुकताच अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांनी यात पुढाकार घेऊन किडनी ट्रान्सप्लांट केंद्राच्या तपासणीसाठी शासनाला अर्ज केला. त्यानुसार चार सदस्यीय समिती शुक्रवारी सकाळी ११ वाजता सुपर स्पेशालिटी रुग्णालयात धडकली. यात महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे अध्यक्ष डॉ. किशोर टावरी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. उमेश नावाडे, अकोला मेडिकलचे वैद्यक औषधशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. योगेंद्र बन्सोड, याच मेडिकलच्या शल्यचिकित्सक विभागाचे प्रमुख डॉ. अरविंद आडे सहभागी होते. त्यांनी सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या नेफ्रालॉजी व युरोलॉजी विभागाची पाहणी केली.
सोबतच किडनी ट्रान्सप्लांटच्या शस्त्रक्रिया कक्षाची व वॉर्डाची पाहणी करून संबंधित डॉक्टरांशी चर्चा केली. यात आढळून आलेल्या त्रुटी त्यांनी अधिष्ठातांसमोर मांडल्या. अधिष्ठातांनी व या केंद्राशी संबंधित डॉक्टरांनी त्रुटी दूर करण्याची लेखी हमी दिल्यानंतरच समितीने मंजुरी दिली.(प्रतिनिधी)