उपराजधानीत मूत्रपिंड प्रत्यारोपणाला फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2019 11:38 AM2019-06-24T11:38:39+5:302019-06-24T11:45:38+5:30
शासकीय रुग्णालयांमध्ये ५० मूत्रपिंड प्रत्यारोपण करणारे नागपुरातील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल हे राज्यात पहिले रुग्णालय ठरले आहे. मात्र यंत्र सामुग्री, सर्जिकल साहित्य उपलब्ध करून देण्यास हेच प्रशासन उदासीनता दाखवित आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शासकीय रुग्णालयांमध्ये ५० मूत्रपिंड प्रत्यारोपण करणारे नागपुरातील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल हे राज्यात पहिले रुग्णालय ठरले आहे. याचे सर्वत्र कौतुक होत आहे. रुग्णालय प्रशासनही आपली पाठ थोपटून घेत आहे, मात्र या शस्त्रक्रियेसाठी लागणारी यंत्र सामुग्री, सर्जिकल साहित्य उपलब्ध करून देण्यास हेच प्रशासन उदासीनता दाखवित आहे. परिणामी, १९ जून रोजी होणारे मूत्रपिंड प्रत्यारोपण पुढे ढकलावे लागले आहे.
वैद्यकीय शिक्षण विभागाच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांमध्ये मूत्रपिंड प्रत्यारोपण केंद्र सुरू करण्याचा मान नागपूर मेडिकलला मिळाला आहे. ९ फेब्रुवारी २०१६ पासून हाती घेण्यात आलेल्या या केंद्रामुळे ५० रुग्णांना नवे जीवन मिळाले आहे. अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा यांनी या संदर्भात पत्रपरिषद घेऊन ही माहिती दिली. सोबतच प्रत्यारोपणामध्ये सहभागी असलेल्या नेफ्रोलॉजी विभागाच्या प्रमुख डॉ. चारुलता बावनकुळे, युरोलॉजी विभाग प्रमुख डॉ. धनंजय सेलुकर, मूत्रपिंड प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉ. संजय कोलते, मूत्रपिंड तज्ज्ञ डॉ. समीर चौबे, बधिरीकरण तज्ज्ञ विजय श्रोते व डॉ. मेहराज शेख यांच्या कार्याचे कौतुकही केले. महिन्यातून दोन वेळा होणारे मूत्रपिंड प्रत्यारोपण आता महिन्यातून तीन वेळा करू, अशी ग्वाही त्यांनी दिली. परंतु या स्तुत्य कार्यात त्यांचेच अधिकारी त्यांना मदत करीत नसल्याचे चित्र आहे. यामुळे जून महिन्यात केवळच एकच प्रत्यारोपण होऊ शकले आहे.
वडील देणार होते मुलाला मूत्रपिंड
तरुण वयात मुलाचे मूत्रपिंड निकामी झाल्याने वडिलांनी पुढाकार घेत मुलाला मूत्रपिंड दान करण्याचा निर्णय घेतला. सर्व चाचण्या व कागदपत्रांची जुळवाजुळव झाल्यानंतर १९ जून रोजी प्रत्यारोपण करण्याची तारीख रुग्णालयाने दिली. शस्त्रक्रियेच्या आदल्या दिवशी वडील आणि मुलगा भरतीही झाले. रुग्ण व दात्याकडून शस्त्रक्रियेची तयारीही पूर्ण करून घेण्यात आली. परंतु ऐनवेळी यंत्र बंद असल्याचे व सर्जिकल साहित्य नसल्याचे कारण देऊन शस्त्रक्रिया थांबवली. सूत्रानुसार, रुग्णांच्या नातेवाईकांनी बंद यंत्राचा दुरुस्तीसाठी पैसे खर्च करण्यासही पुढाकार घेतला. परंतु प्रशासन जागे झालेले नव्हते.
मार्च महिन्यापासून यंत्र दुरुस्तीचा प्रस्ताव
शस्त्रक्रिया करताना रुग्णाला विद्युत उपकरणाचा झटका लागू नये म्हणून ‘कॉटरी’ या यंत्राची मदत घ्यावी लागते. सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये असे तीन यंत्र आहेत. यातील एक यंत्र बंद पडले आहे. सूत्रानुसार, नेफ्रोलॉजी विभागाने यंत्र दुरुस्तीचा व नवे सर्जिकल साहित्य घेण्याचा प्रस्ताव सर्जिकल स्टोअर्सला मार्च महिन्यात दिला होता. परंतु दोन महिन्यांचा कालावधी होऊनही यंत्र दुरुस्तही झाले नाही आणि साहित्यही मिळाले नाही. प्रशासनाच्या या उदासीनतेचा फटका मूत्रपिंड निकामी झालेल्या गंभीर रुग्णाला बसला आहे.