रक्तगट जुळत नसतानाही होणार ‘किडनी ट्रान्सप्लांट’

By admin | Published: June 19, 2017 01:58 AM2017-06-19T01:58:44+5:302017-06-19T01:58:44+5:30

मूत्रपिंड दाता असतानाही अनेकदा रक्तगट व मूत्रपिंड जुळत (मॅच) नाही, या कारणाखाली रुग्णाला ‘डायलिसिस’वर जीवन जगावे लागते.

The kidney transplant will occur even when the blood group does not match. | रक्तगट जुळत नसतानाही होणार ‘किडनी ट्रान्सप्लांट’

रक्तगट जुळत नसतानाही होणार ‘किडनी ट्रान्सप्लांट’

Next

सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचा पुढाकार : ‘स्वॅप’ व ‘एबीओ इनकॉम्पॅटिबल’ पद्धत करणार सुरू
सुमेध वाघमारे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मूत्रपिंड दाता असतानाही अनेकदा रक्तगट व मूत्रपिंड जुळत (मॅच) नाही, या कारणाखाली रुग्णाला ‘डायलिसिस’वर जीवन जगावे लागते. मूत्रपिंड निकामी झालेल्या रुग्णांना जीवनदान देण्याचे प्रमाण वाढण्यासाठी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलने ‘स्वॅप किडनी ट्रान्सप्लान्ट’(मूत्रपिंड अदलाबदल प्रत्यारोपण) व ‘एबीओ इनकॉम्पॅटिबल किडनी ट्रान्सप्लान्ट’ पद्धत सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. या प्रक्रियेला सुरुवात झाल्यास राज्यातील हे पहिले शासकीय रुग्णालय ठरणार आहे.

मूत्रपिंड निकामी झाल्यामुळे राज्यातील हजारो रु ग्ण डायलिसिसवर जगत आहेत. यातील शेकडोहून अधिक रु ग्ण मूत्रपिंड प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेत आहेत. याला घेऊनच मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांनी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये ‘मूत्रपिंड प्रत्यारोपण केंद्र’ सुरू केले.

शासकीय रुग्णालयांमधील राज्यातील पहिले केंद्र ठरले आहे. या केंद्रात आतापर्यंत १६ यशस्वी प्रत्यारोपण झाले आहे. विशेष म्हणजे, या जून महिन्यापासून आठवड्यातून एकदा म्हणजे, दर बुधवारी किडनी ट्रान्सप्लान्ट करण्याच्या प्रयत्नांना सुरुवात झाली आहे. नेफ्रालॉजी विभागाचे अद्ययावत शस्त्रक्रियागृहाचे बांधकाम पूर्णत्वास आले आहे. यामुळे लवकरच सामान्य प्रत्यारोपणासोबतच ‘स्वॅप किडनी ट्रान्सप्लान्ट’ व ‘एबीओ इनकॉम्पॅटिबल किडनी ट्रान्सप्लान्ट’प्रकार सुरू करण्याची शक्यता पडताळून पाहिली जात आहे. अशा रुग्णांची वेगळी यादी तयार केली जात आहे.

‘स्वॅप’मुळे मागणी व पुरवठ्यामधील अंतर कमी होणार
भारतामध्ये दरवर्षी सुमारे ९० हजार लोकांना मूत्रपिंड निकामी झाल्यामुळे मूत्रपिंड प्रत्यारोपणाची गरज भासते. मात्र, यापैकी केवळ २.५ टक्के रुग्णांना मूत्रपिंड मिळू शकते. जवळचे नातेवाईक मूत्रपिंड दान करू इच्छित असले तरी रक्तगट व किडनी ‘मॅच’ होत नसल्याच्या कारणांमुळे साधारण ७५ टक्के मूत्रपिंडदाते प्रत्यारोपणासाठी अपात्र ठरतात. यावर ‘स्वॅप ट्रान्सप्लान्ट’ उपयोगी पडते. यात जवळचे नातेवाईक दाते आहेत. त्यांची किडनी व रक्तगट मॅच होत नाही. परंतु दुसऱ्या रुग्णाच्या नातेवाईकांचे हे दोन्ही मॅच होते, अशा प्रकरणात ‘स्वॅप ट्रान्सप्लान्ट’केले जाते. ‘स्वॅप’ पद्धतीमुळे अवयव मिळाल्यास मागणी आणि पुरवठ्यामधील अंतर कमी होण्याची शक्यता आहे.

सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये आतापर्यंत १६ यशस्वी किडनी ट्रान्सप्लान्ट झाले आहेत. लवकरच ‘मॉडर्न आॅपरेशन थिएटर’ उपलब्ध होणार आहे. यामुळे ‘स्वॅप ट्रान्सप्लान्ट’ व ‘एबीओ इनकॉम्पॅटीबल किडनी ट्रान्सप्लान्ट’ सुरू करण्याचा प्रयत्न आहे. त्या दिशेने वाटचाल सुरूही केली आहे. यात यश आल्यास रुग्णांना जीवनदान मिळण्याचे प्रमाण वाढेल.
-डॉ. अभिमन्यू निसवाडे, अधिष्ठाता, मेडिकल

असे आहे, ‘एबीओ इनकॉम्पॅटिबल किडनी ट्रान्सप्लांट’
प्रसिद्ध किडनी ट्रान्सप्लान्ट सर्जन डॉ. संजय कोलते यांनी सांगितले की, ज्या रुग्णाकडे जवळचे नातेवाईक डोनर (दाता) एकच आहे, परंतु त्यांचे रक्तगट जुळत नाही, त्यांच्याकरिता ‘एबीओ इनकॉम्पॅटिबल’ पद्धतीने किडनी ट्रान्सप्लान्ट करणे शक्य होते. यात विशेष इंजेक्शन व औषधांची मदत घेतली जाते. याला मोठा खर्च येतो.

Web Title: The kidney transplant will occur even when the blood group does not match.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.