चिमुकल्यांचा मूड रमला घरात, अभ्यासाची पुस्तके दप्तरात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 10:48 AM2021-07-12T10:48:37+5:302021-07-12T11:03:02+5:30

Nagpur News लॉकडाऊनमध्ये मुलांचे संपूर्ण लक्ष आई-वडील-आजी-आजोबांसोबत रमण्यातच आहे. पालकांनी कितीही शिकवितो म्हटले तरी शिक्षकांची किमया साधणे कठीण आहे.

kids are in playing mood is at home, study books in the bag! | चिमुकल्यांचा मूड रमला घरात, अभ्यासाची पुस्तके दप्तरात!

चिमुकल्यांचा मूड रमला घरात, अभ्यासाची पुस्तके दप्तरात!

googlenewsNext
ठळक मुद्देचवथीपर्यंतची मुले यंदाही शाळेविनाच मित्रमंडळी, अभ्यासाचा पडतोय विसर


लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : शाळा हे विद्येचे मंदिर आणि बालवयातील सर्वांगीण विकासासाठी शाळा हे सर्वोत्तम स्थळ मानले जाते. मात्र, गेल्या १६-१७ महिन्यांपासून शाळा बंद आहेत. ऑनलाईन शिक्षण सुरू असले तरी चिमुकल्यांना मॅडम रागावतात किंवा लाड करतात, याच्या पलीकडे अ, ब, क - ए, बी, सी, डी म्हणा किंवा एक, दोन, तीन - वन, टू, थ्री म्हणा याशी काही देणेघेणे राहिले नाही. लॉकडाऊनमध्ये मुलांचे संपूर्ण लक्ष आई-वडील-आजी-आजोबांसोबत रमण्यातच आहे. पालकांनी कितीही शिकवितो म्हटले तरी शिक्षकांची किमया साधणे कठीण आहे. अभ्यासाची पुस्तके दप्तरात (बॅग) आणि मुले रमली घरात, अशी स्थिती सर्वदूर आहे.

अक्षर-अंक ओळख विसरले

* नवाकर्षण हे बालवयातील प्रमुख लक्षण आहे. त्यामुळे, या वयात बालकांच्या मनावर-मेंदूवर ज्या गोष्टींचा सतत प्रभाव टाकला जातो, त्या गोष्टी आयुष्यभर स्मरणात राहतात.

* दीर्घकालीन लॉकडाऊन आणि शाळा बंद असल्याने मुलांना शिक्षकी भयाचा सामना करावा लागत नाही.

* मोबाईल हे तसेही आभासी माध्यम आहे आणि स्क्रिन सतत बदलत असल्याने यातून मिळणारे शिक्षणही क्षणिक स्मरणाचे ठरते.

* पहिली व दुसरीचे विद्यार्थी ऑनलाईन वर्गात केवळ ऐकू शकतात. ते किमी स्मरणात राहिल हे सांगता येत नाहीत. त्यामुळे, अक्षर-अंकाची ओळख प्रारंभीच अडखळली आहे.

* दुसरी व चवथीचे विद्यार्थी नव अक्षर-अंक शिकण्यापासून वंचित होत आहे. पहिली व दुसरीमध्ये घेतलेली अक्षर-अंक ओळख विसरत चालले आहेत.

अभ्यास टाळण्याची अनेक कारणे

* खेळण्या-बागडण्याच्या वयात मुलांसाठी अभ्यास हा कंटाळवाणा विषय असतो.

* मधातच भूक लागली, झोप लागली हे कारणे पुढे येतात.

* पालक शिकवित असताना मुले डायव्हर्ट होण्याचा प्रयत्न करतात. हे काय, ते काय असे प्रश्न विचारतात.

* अचानक, खेळण्याची इच्छा व्यक्त केली जाते.

* इच्छापूर्तीस नकार दिल्यास अश्रूविहीन रडणे अर्थात नुसतेच ओरडणे सुरू होते.

हा काळ फायद्याचा अन् तोट्याचा

दीर्घकालीन लॉकडाऊनमुळे मुले जास्तीत जास्त वेळ आपल्या पालकांसोबत घालवत आहेत. याच वयात मुले ऑनलाईन होत आहेत, शिक्षकही तंत्रज्ञान प्रशिक्षित होत आहेत, ही चांगली बाब झाली. मात्र, मोबाईल आणि सतत घरी राहत असल्याचे चिडचिडे होत आहेत, हा तोटा आहे. मुलांना मिसळता येत नाही, शिक्षकांशी थेट आमना-सामना करता येत नाही, या त्रुटी या काळात दिसून येत आहेत. हे वर्षही पहिली ते चवथीच्या मुलांना शाळेविनाच घालवावे लागणार आहे. पालकांनी आता मुलांना आपल्या प्रत्येक गोष्टी इन्व्हॉल्व्ह करून त्यांना प्राथमिक शिक्षण देण्याची तयारी ठेवावी. मात्र, शाळा जेव्हा सुरू होतील तेव्हा या विद्यार्थ्यांना हाताळणे हे शिक्षकांसाठी प्रचंड आव्हानात्मक असणार आहे.

- रवींद्र फडणवीस, शिक्षणतज्ज्ञ

पालकांची होतेय अडचण

मुलांचे लाड पूर्ण करणे, ही प्रत्येक पालकांची हौस असते. मात्र, शिक्षण देणे तेवढेच अवघड. मुलांच्या मनात पालक आणि शिक्षकांसाठी वेगवेगळे स्थान असते. त्याचे वर्गीकरण त्यांच्याच डोक्यात आपसुकच झालेले असते. त्यामुळे, शिक्षकांसारखे शिकविण्याचा प्रयत्न करणारे पालक मुलांसाठी कायम विनोदाच विषय असतो. आपले रडगाणे ज्यांच्याजवळ मांडतो, तोच पालक शिक्षकांसारखा बघण्याचा इच्छा त्यांची नसते. त्यामुळेच, पालकांची मोठी अडचण या काळात होत असल्याचे दिसून येते.

रोजगाराच्या टेेन्शनमध्ये पालक

कोरोना काळात अनेक पालकांचे रोजगार हिरावले गेले आहेत. ती समस्या वाढतच चालली. अशा स्थितीत पालक घरगाडा चालविण्यासाठी सतत रोजगाराच्या टेन्शनमध्ये आहेत. त्यांना सतत बाहेर पडावे लागत आहे. अशा स्थितीत कोवळ्या वयातील मुलांना शिकवावे कसे आणि शिकविले तरी त्यांची मानसिकता समजण्यास अडचण निर्माण होत असल्याचे अनेकांच्या संवादातून स्पष्ट झाले.

............................

Web Title: kids are in playing mood is at home, study books in the bag!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.