पावणेदोन वर्षानंतर शाळांमध्ये चिमुकल्यांचा किलबिलाट सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2021 09:24 PM2021-12-16T21:24:46+5:302021-12-16T21:26:44+5:30
Nagpur News नागपूर महापालिका क्षेत्रातील इयत्ता पहिली ते सातवीच्या शाळा गुरुवारी सुरू झाल्या. पावणेदोन वर्षानंतर प्राथमिक शाळात चिमुकल्यांचा किलबिलाट ऐकू आला.
नागपूर : महापालिका क्षेत्रातील इयत्ता पहिली ते सातवीच्या शाळा गुरुवारी सुरू झाल्या. पावणेदोन वर्षानंतर प्राथमिक शाळात चिमुकल्यांचा किलबिलाट ऐकू आला. पदाधिकारी, शिक्षकांनी पुष्प देऊन तर कुठे चॉकलेट देऊन चिमुकल्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. पहिल्याच दिवशी ४०.१० टक्के विद्यार्थी उपस्थित होते.
कोरोना संक्रमणाचा धोका कमी झाल्याने आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी जारी केलेल्या आदेशानुसार, मनपा क्षेत्रातील प्राथमिक शाळा सुरू झाल्या. मनपाच्या विवेकानंदनगर हिंदी उच्च प्राथमिक व माध्यमिक शाळेमध्ये शिक्षण समिती सभापती प्रा. दिलीप दिवे, क्रीडा समिती सभापती प्रमोद तभाने व शिक्षणाधिकारी प्रीती मिश्रीकोटकर यांनी गुलाबाचे फुल देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत केले. शाळेचा पहिला दिवस असल्याने बहुसंख्य विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांनी शाळेत सोडले.
मनपा क्षेत्रात ११६९ प्राथमिक शाळा आहेत. यातील मनपाच्या ११६ व १०५३ खासगी शाळा अशा एकूण १०६९ शाळा सुरू झाल्या. या शाळात २ लाख ४९ हजार ९५३ विद्यार्थी आहेत. पहिल्या दिवशी १ लाख २२३ विद्यार्थी उपस्थित होते. कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनांकडे विशेष लक्ष देत शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे स्वागत झाले.
विवेकानंदनगर हिंदी शाळेत विद्यार्थ्यांचे स्वागत करीत शिक्षण समिती सभापती प्रा. दिलीप दिवे यांनी त्यांच्याशी संवाद साधला. कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत मनपाच्या शाळेतील विद्यार्थ्यांचे शिक्षण बंद होऊ नये, यासाठी ऑनलाईन माध्यमातून शिक्षण देण्यात येत होते. प्रत्यक्ष शाळा सुरू झाल्यामुळे विद्यार्थ्यांना आता कुठल्याही अडथळ्याविना शिक्षण घेणे शक्य झाल्याचे दिवे यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांची थर्मल स्क्रिनिंग
मनपाच्या विवेकानंदनगर हिंदी उच्च प्राथमिक व माध्यमिक शाळेसह सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांची थर्मल स्क्रिनिंग करण्यात आली. मास्क लावण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यात आले. पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना हात धुणे, सॅनिटायझरचा वापर आणि कोविड संदर्भातील सुरक्षेची माहिती देण्यात आली.
एका बाकावर एक विद्यार्थी
कोविड नियमांचे पालन म्हणून वर्गखोल्यांमध्येही सुरक्षेची काळजी घेण्यात आली. एका बाकावर एक विद्यार्थी याप्रमाणे बैठक व्यवस्था करण्यात आलेली आहे. मनपा शाळांना अशा स्वरूपाचे निर्देश देण्यात आले आहे.