नागपूरच्या फूटपाथवरील मुलांना मिळाली ‘सुपर’ प्रेरणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2019 10:43 PM2019-08-07T22:43:25+5:302019-08-07T22:44:25+5:30
त्यांंची मैत्री फूटपाथवर फुलणारी अन् सुखासीन मुलांसारख्या आयुष्याचे स्वप्न पाहत संपणारी. पण यावर्षीचा मैत्री दिवस या अभावग्रस्तांसाठी मैत्रीची नवी पहाट दाखविणारा ठरला. ‘गुलमोहर’ बहरावा तसा त्यांचा दिवस फुलला आणि मैत्रीचा नवा अर्थ कळला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जन्मापासूनच फूटपाथवरचे जगणे. दोन वेळच्या खायचीही भ्रांत. त्यांना कुठे ठाउक ‘फ्रेन्डशीप डे’ कशाला म्हणतात? त्यांंची मैत्री फूटपाथवर फुलणारी अन् सुखासीन मुलांसारख्या आयुष्याचे स्वप्न पाहत संपणारी. पण यावर्षीचा मैत्री दिवस या अभावग्रस्तांसाठी मैत्रीची नवी पहाट दाखविणारा ठरला. ‘गुलमोहर’ बहरावा तसा त्यांचा दिवस फुलला आणि मैत्रीचा नवा अर्थ कळला. या मुलांसाठी हा दिवस आनंद देणाराच ठरला नाही तर प्रयत्न केल्यास बदल घडतो ही नवजीवनाची ‘सुपर’ प्रेरणाही देऊन गेला.
फूटपाथवरील या अभावग्रस्त मुलांच्या आयुष्यात हा अविस्मरणीय क्षण गुलमोहर बहुउद्देशीय संस्था आणि इनरव्हील क्लब यांच्या संवेदनशील भावनेमुळे आला. दरवर्षी आपण मित्रांमध्ये फ्रेन्डशीप डे साजरा करतो. यावर्षी मात्र वेगळ्या पद्धतीने हा दिवस साजरा करण्याचा विचार या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी केला. सामान्य घरातील मुलांप्रमाणे आयुष्याचे स्वप्न पाहणाºया वंचित आणि अभावग्रस्त मुलांसाठी मैत्रीचा हात पुढे करण्याचा निर्धार संस्थांनी केला. शहरात उपाय संस्थेच्या तरुण स्वयंसेवकाद्वारे अनेक ठिकाणी फूटपाथ स्कूल चालविले जाते. याच मुलांना वेगळा आनंद देण्याची संकल्पना गुलमोहरच्या संयोजिका व विज्ञान संस्थेतील डॉ. सुजाता देव तसेच इनरव्हीलच्या शीला देशमुख यांनी ठेवली. यात डॉ. प्रकाश इटणकर, डॉ. ज्योत्स्ना इटणकर, प्रतीक कडव, मंजुश्री कडव, डॉ. तृप्ती अत्रे यांनी सहभाग घेतला. यामध्ये किरण कलंत्री यांचे सहकार्य मिळाले. सीताबर्डीच्या मदन गोपाल हायस्कूलच्या प्राचार्याही शाळेच्या विद्यार्थ्यांसह या आनंदात सहभागी झाल्या. मुलांना दिवसभराचा विरंगुळा देण्यासह ‘सुपर ३०’ हा चित्रपट दाखविण्याचा बेत ठरला.
प्रत्यक्ष मैत्री दिनाच्या दिवशी सकाळी ठरल्याप्रमाणे बसेस फूटपाथवर लागल्या आणि या क्षणाची वाट पाहणारी मुले भराभर या बसमध्ये चढली. फूटपाथवरील १५० मुलांना घेउन या बसेस थेट चित्रपटगृहात पोहचल्या आणि मुलांनी प्रचंड जल्लोषात चित्रपटगृहात प्रवेश केला. संगम चित्रपटगृहाचे राजेश राऊत यांनी मुलांसाठी सर्व व्यवस्था करून मोलाचे सहकार्य केल्याचे डॉ. सुजाता देव यांनी सांगितले. मुलांनी अतिशय आनंदात हा चित्रपट बघितला. आयुष्याचे ध्येय ठेवले आणि त्यानुसार प्रयत्न केले तर असलेल्या परिस्थितीत बदल करता येतो, ही प्रेरणा मुलांना मिळाली. यानंतर पिकनिक प्रमाणे या मुलांसाठी नाश्त्याचा बेत आखला गेला होता. मुले प्रचंड उत्साहात होती.
मुले प्रचंड उत्साहात होती. त्यांनी एकमेकांना फ्रेन्डशीप बॅन्ड बांधला, गुलमोहर व इनरव्हीलच्या सदस्यांसोबत सेल्फी काढून घेतला. गाणी, गप्पा मारल्या रंगल्या आणि मैत्रीचा उत्साह फुलला. मनसोक्त आनंदासह हा दिवस या मुलांसाठी अविस्मरणीय ठरला. खरंतर या मुलांसोबत आमच्यासाठीही हा क्षण अविस्मरणीय आणि जीवनाचा नवा अर्थ सांगणारा होता, अशी भावना डॉ. सुजाता देव यांनी व्यक्त केली.