दोन बॉटल दारूसाठी बांबूने प्रहार करत हत्या, रेल्वे लाईन शेजारी फेकला मृतदेह
By योगेश पांडे | Published: August 1, 2024 04:09 PM2024-08-01T16:09:43+5:302024-08-01T16:10:20+5:30
Nagpur : कुख्यात शेखूला अटक
योगेश पांडे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दारूचे व्यसन असलेल्या एका व्यक्तीची बांबूने प्रहार करत हत्या करण्यात आली व त्याचा मृतदेह रेल्वे लाईनच्या शेजारी फेकण्यात आला. त्याने दोन बॉटल दारू न विचारता घेतल्याच्या कारणावरून त्याची हत्या करण्यात आली. जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. या प्रकरणात सुरुवातीला पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. मात्र मृतकाच्या बहिणीच्या तक्रारीनंतर सूत्रे हलली व आरोपीला अटक करण्यात आली.
प्रमोद पॉल फ्रांसिस (५२, लुंबिनीनगर, मेकोसाबाग) असे मृतकाचे नाव आहे. त्याला दारूचे व्यनस होते व तो त्याची बहीण रंजना कांबळे यांच्यासोबत रहायचा. तो कुठलेही काम करत नव्हता व दिवसभर दारूच्या नशेत असायचा. अनेकदा तर या नशेत तो आठ आठ दिवस बाहेरच असायचा. ३० जुलै रोजी सकाळी ११ वाजता तो बैरामजी टाऊन खदान परिसरातील रेल्वे लाईनजवळ उभा होता. त्याच्या बहिणीने त्याला त्यावरून टोकले व त्या नोकरीवर निघून गेला. त्या रात्री तो घरी आलाच नाही. बुधवारी सकाळी एका मुलाने येऊन प्रमोद खदानजवळील रेल्वे लाईनच्या शेजारी एका झाडाखाली पडला असल्याची माहिती दिली. रंजना या कुटुंबियांसह तेथे पोहोचल्या असता प्रमोद निपचित पडला होता. त्यांनी पोलिसांना माहिती दिली व जरीपटका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मात्र त्यांच्या परिचित असलेल्या एका डेकोरेशनवाल्याने प्रमोदची हत्या झाल्याची माहिती दिली. ३० जुलै रोजी रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास सिकंदर उर्फ शेखू शफी खान (३८, सिंधी कॉलनी, रेल्वेलाईनजवळ) याने प्रमोदवर लाकडी बांबूने प्रहार केले. त्यानंतरच प्रमोदचा मृत्यू झाल्याचे प्रत्यक्षदर्शीने सांगितले. यानंतर रंजना यांनी जरीपटका पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी शेखूविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३ (१) अंतर्गत गुन्हा नोंदवत त्याला अटक केली आहे. चौकशीदरम्यान प्रमोदने शेखूच्या दारूअड्ड्यावरून दोन बॉटल न विचारता घेतल्याने संतापातून शेखूने त्याच्यावर हल्ला केल्याची बाब समोर आली.
आरोपी शेखूचा अवैध दारूचा अड्डा
शेखूविरोधात अनेक गुन्हे दाखल आहेत. त्याला पिस्तुल व देशी कट्ट्याच्या तस्करीतदेखील अटक करण्यात आली होती. तो मेकोसाबाग परिसरात बऱ्याच काळापासून दारूचा अवैध अड्डा चालवितो. पोलिसांना याची माहिती असूनदेखील त्याच्यावर याबाबत कारवाई होत नव्हती. प्रमोद त्याच्याच अड्ड्यावर कधी कधी काम करायचा. त्याने न विचारता दारूच्या दोन बॉटल घेतल्याने शेखू संतापला व त्याने अड्ड्यावर त्याला बेदम मारहाण केली. यात प्रमोद बेशुद्ध पडला व त्याचा मृत्यू झाला. रात्रीच्या अंधारात त्याने प्रमोदचा मृतदेह रेल्वेलाईन शेजारी आणून टाकला होता.