अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मारेकऱ्यांचा शोध घेतला जात नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2019 11:05 AM2019-09-23T11:05:06+5:302019-09-23T11:06:11+5:30
लेखकांना लिहू नका, बोलू नका, असे सांगितले जात आहे़ एवढेच नव्हे तर काय खावे, काय घालावे अशी बंधने घातली जात असल्याची आगपाखड सातव्या लेखिका साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष अरुणा सबाने यांनी रविवारी येथे केली़
प्रवीण खापरे।
लोकमत न्यूज नेटवर्क
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले व्यासपीठ (थडीपवनी) : कलबुर्गी, पानसरे, गौरी लंकेश यांच्यासारख्या अभिव्यक्तीच्या पुरस्कर्त्यांचा खून होतो़ मात्र, त्यांच्या मारेकऱ्यांना हुडकून काढण्यास जाणूनबुजून दुर्लक्ष केले जात आहे़ याउलट, लेखकांना लिहू नका, बोलू नका, असे सांगितले जात आहे़ एवढेच नव्हे तर काय खावे, काय घालावे अशी बंधने घातली जात असल्याची आगपाखड सातव्या लेखिका साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष अरुणा सबाने यांनी रविवारी येथे केली़
थडीपवनी येथे कृषी विकास प्रतिष्ठान आणि विदर्भ साहित्य संघाच्यावतीने नितीन गडकरी कृषी व कौशल्य विकास केंद्राच्या प्रांगणात उभारण्यात आलेल्या स्व़ तुळशीराम काजे परिसरातील क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले व्यासपीठावरून सातव्या लेखिका साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी सबाने बोलत होत्या़ व्यासपीठावर उद्घाटक प्रख्यात चित्रपट अभिनेत्री अलका कुबल-आठल्ये, रेशीम उद्योग महामंडळाच्या संचालक भाग्यश्री बानाईत, प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. गिरीश गांधी, स्वागताध्यक्ष खा़ कृपाल तुमाने, सहस्वागताध्यक्ष प्रकाश तागडे, विदर्भ साहित्य संघाचे कार्याध्यक्ष वामन तेलंग, थडीपवनीच्या सरपंच नीलिमा उमरकर, संध्या मातकर, संमेलन समितीच्या आमंत्रक शुभदा फडणवीस, प्रतिष्ठानचे श्रीराम काळे, राजेश गांधी, बंडोपंत उमरकर, नरेश अडसड उपस्थित होते़
एकीकडे विकासाचा झंझावात सुरू असल्याचे राज्यकर्ते नाकाने सांगत आहेत़ मात्र, त्यांच्याच काळात देशामध्ये दररोज एक कोटी लोक उपाशी झोपत असल्याचा अहवाल सर्वेक्षणातून उघडकीस आला आहे़ अशा स्थितीत विकास कशाला म्हणायचा, असा परखड सवाल सबाने यांनी यावेळी उपस्थित केला़ याच काळात राजकीय व्यक्तींकडून शेतकºयांना थेट व्यासपीठावरून अपशब्द उच्चारले जात आहेत़ विशिष्ट समाजाच्या गाण्याची रिंगटोन ठेवली म्हणून मारले जात आहे़ विशिष्ट प्राण्यांचे मांस भक्षण केल्याचा आरोप करून, त्यास बदडले जात आहे़ ते आम्ही कसे सहन करायचे? आम्ही सहन करतो म्हणून, काहीही सांगितले जात आहे आणि आम्ही काहीही मान्य करायला लागलो आहोत़ अशा तºहेने किती दिवस घाबरून राहायचे़ लेखिकांनी हे विषय उचलून धरणे गरजेचे आहे़ परिवर्तन महिलाच घडवू शकतात़
मात्र, लेखिका आजही पाने, फुले यांच्याच कविता करतात, प्रेमस्वप्नांच्या कथा लिहितात़ मात्र, आम्ही किती जणांवर प्रेम करतो, हे लिहिण्याचे धाडस दाखवत नाहीत़ तेथे मात्र, सती सावित्री असल्याचे ढोंग केले जाते़ अशा तºहेने राज्यघटनेने दिलेले लोकशाहीचे मूल्य आपणच तुडवत असल्याचा प्रहार सबाने यांनी केला़ ज्याच्या लेखणीला धार आहे, त्याने गप्प बसायला नको़ लेखिकांनी आपली धारदार लेखणी अशांवर प्रहार करण्यासाठी वापरायला हवी़ आमचे प्रश्न आम्हीच मांडले पाहिजे़ आता सुरक्षिक अंतर ठेवून लिहिण्याचे, स्वत:ची सुविधा बघण्याचे आणि कुणाला हवे म्हणून लिहिण्याचे तंत्र सोडा़ परंपरागत विषयाला दूर सारून, त्या पलिकडचे जग लेखनातून मांडा़ मुंबई-पुण्याकडील परिस्थिती विदर्भात लवकरच येणार आहे़ त्या स्थितीतील ‘लिव्ह इन रिलेशन’ हा विषय कधी हाताळाल? असे विषय हाताळण्यास सुरुवात करा़, असे आवाहन अरुणा सबाने यांनी अध्यक्षीय व्यासपीठावरून केले़ प्रास्ताविक डाँ़ गिरीश गांधी यांनी केले़ संचालन अर्चना घुळघुळे यांनी केले तर आभार डाँ़ मोना चिमोटे यांनी मानले़