नागपुरात धकातेची हत्या दहशत निर्माण करण्यासाठी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2019 08:41 PM2019-05-06T20:41:08+5:302019-05-06T20:41:51+5:30
गुन्हेगारांमधील आपसी वर्चस्वाच्या लढाईतूनच गोळीबार चौकाजवळ रविवारी रात्री अंकित धकातेची हत्या करण्यात आली. गुन्हेगारांच्या दोन टोळळ्यांमधील वर्चस्वाची लढाई या हत्येमागे आहे. त्याची हत्या करून आपल्या टोळीची दहशत निर्माण करण्यासाठी आरोपींनी अत्यंत क्रूरपणे धकातेची हत्या केल्याची माहिती पुढे आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गुन्हेगारांमधील आपसी वर्चस्वाच्या लढाईतूनच गोळीबार चौकाजवळ रविवारी रात्री अंकित धकातेची हत्या करण्यात आली. गुन्हेगारांच्या दोन टोळळ्यांमधील वर्चस्वाची लढाई या हत्येमागे आहे. त्याची हत्या करून आपल्या टोळीची दहशत निर्माण करण्यासाठी आरोपींनी अत्यंत क्रूरपणे धकातेची हत्या केल्याची माहिती पुढे आली आहे. तहसील पोलिसांनी हत्येचा सूत्रधार रोशन चिंचघरे आणि त्याचा साथीदार नितीन उर्फ मच्छी धकाते या दोघांना अटक केली. तर, गुन्ह्यांतील तीन आरोपी अद्याप फरार आहेत.
अंकित रामू धकाते (रा. पाचपावली) हा जुना गुन्हेगार असून, तो सध्या मटका अड्डा चालवायचा. वर्चस्वाच्या लढाईमुळे चिचघरे टोळीसोबत गेल्या काही दिवसांपासून टोकाचे वैमनस्य होते. अंकितची या भागात चांगली चलती आहे. त्याचे अवैध धंदे सुरू आहेत. त्याचे कोणतेही काम होते, ही बाब आरोपींना खटकत होती. तो पोलिसांचा खबरी आहे, असाही आरोपींना संशय आहे. त्यामुळे अंकितचे शत्रू त्याचा गेम करण्याची संधी शोधत होते. रविवारी रात्री ८.३० च्या सुमारास अंकित तहसीलमध्ये आला. तो गोळबार चौकाजवळच्या पटवी गल्लीतून जात असताना आरोपी रोशन चिंचघरे (वय २२), अंकूश चिंचघरे (वय २५) आणि सचिन चिंचघरे तसेच नितीन उर्फ मच्छी आणि राहुल (रा. सर्व पाचपावली) यांनी अंकितला घेरले. त्याच्यावर सत्तूर, गुप्तीसारख्या शस्त्राचे अनेक घाव घालून त्याची हत्या केली. आरोपींनी अंकितला एवढ्या निर्दयपणे मारले की त्याचा एक हात मनगटापासून तोडून टाकला. अत्यंत वर्दळीच्या भागात झालेल्या या अमानुष हत्याकांडामुळे परिसरात प्रचंड दहशत निर्माण झाली होती. माहिती कळताच तहसीलचे ठाणेदार अजयकुमार मालवीय आपल्या सहका-यांसह आरोपींच्या शोधासाठी कामी लागले होते. सोमवारी पहाटे त्यांनी आरोपी रोशन आणि नितीनला ताब्यात घेतले. अन्य फरार आरोपींचा शोध सुरू आहे.
आरोपींच्या मनात होती भीती
वर्षभरापूर्वी मित्र असलेल्या अंकित आणि आरोपी चिंचघरे टोळीत अलिकडे नेहमीच वाद व्हायचे. त्यांच्यात एक महिन्यापूर्वी कडाक्याचे भांडण झाले होते. यावेळी त्यांनी एकमेकांना संपविण्याची भाषा वापरली होती. अंकितचा गेम केला नाही तर तो आपल्याला संपवेल अशी चिंचघरे टोळीतील आरोपींना भीती वाटत होती. त्याचमुळे त्यांनी अंकितची हत्या केली.