नागपुरात हत्यांचे सत्र सुरूच; जुन्या वादातून कामगाराचा घेतला जीव
By योगेश पांडे | Published: July 6, 2023 05:55 PM2023-07-06T17:55:55+5:302023-07-06T17:56:31+5:30
Nagpur News उपराजधानीतील अधिकाऱ्यांकडून गुन्हे नियंत्रणात असल्याचा दावा करण्यात येत असला तरी प्रत्यक्षात हत्यांचे सत्र सुरूच आहे. जुन्या वादातून एका आरोपीने एका टाईल्स फिटिंगचे काम करणाऱ्या तरुणाचा जीव घेतला.
योगेश पांडे
नागपूर : उपराजधानीतील अधिकाऱ्यांकडून गुन्हे नियंत्रणात असल्याचा दावा करण्यात येत असला तरी प्रत्यक्षात हत्यांचे सत्र सुरूच आहे. जुन्या वादातून एका आरोपीने एका टाईल्स फिटिंगचे काम करणाऱ्या तरुणाचा जीव घेतला. यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.
भारत गुलाब उके (४०, पाहुणे ले आऊट, पिवळी नदी) असे मृतकाचे नाव असून रुपेश उर्फ बंटी यशवंत गडकरी (२८, मांडवा वसती) हा आरोपी आहे. बुधवारी रात्री १० वाजताच्या सुमारास भारत विश्वदीप बौद्धविहाराजवळील एका बाकड्यावर बसला होता. त्याच्यासोबत दीपक मेश्राम व सुखदेव सहारे हे मित्र होते. अचानक तेथे बंटी आला व जुन्या वादाच्या रागातून त्याने भारतच्या पाठीवर व मानेवर वार करून त्याला गंभीर जखमी केले. भारत रक्ताच्या थारोळ्यात पडल्यावर बंटी तेथून फरार झाला. परिसरातील लोकांनी भारतच्या नातेवाईकांना या घटनेची माहिती दिली. भारतला ऑटोतून मेयो इस्पितळात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. भारतचा आतेभाऊ अलंकार मासुरकर याने पोलिसांना या हत्येची माहिती दिली. त्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी बंटीविरोधात गुन्हा नोंदविला. बंटीला काही तासांतच अटकदेखील करण्यात आली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली होती.