ढगांची मेहरबानी दुसऱ्या दिवशीही कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 04:11 AM2021-08-19T04:11:03+5:302021-08-19T04:11:03+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : ब्रेकनंतर मंगळवारपासून सुरू झालेली पावसाची धुवाधार बुधवारीही कायम हाेती. नागपूरसह विदर्भात सर्वदूर ढगांनी मेहरबानी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ब्रेकनंतर मंगळवारपासून सुरू झालेली पावसाची धुवाधार बुधवारीही कायम हाेती. नागपूरसह विदर्भात सर्वदूर ढगांनी मेहरबानी केली. हवामान विभागाने पुढचे काही दिवस काही जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला हाेता. बुधवारी यवतमाळ जिल्ह्यात सर्वाधिक ७५ मिमी पावसाची नाेंद करण्यात आली. काही तालुक्यात अतिवृष्टीची स्थिती हाेती. नागपूरसह अमरावती, चंद्रपूर जिल्ह्यांत पावसाने जाेरदार हजेरी लावली.
मंगळवारच्या चांगल्या सुरुवातीनंतर बुधवारी नागपुरात सकाळपासूनच ढगाळ वातावरण कायम हाेते. दुपारी २ वाजतानंतर पावसाला जाेर चढत गेला व थांबतथांबत काही तास चांगल्याच सरी बरसल्या. शहरात सायंकाळपर्यंत ३३.२ मिमी पावसाची नाेंद करण्यात आली. रात्रीही पावसाळी परिस्थिती कायम हाेती. ऑगस्टमध्ये आतापर्यंत २५ मिमी पाऊस नाेंदविला हाेता. पण दाेन दिवसांत पावसाने तूट भरून काढली. जाेरदार पावसामुळे मात्र सखल भागातील अनेक वस्त्यांमध्ये पाणी शिरल्याची माहिती आहे. रस्त्यावरही माेठ्या प्रमाणात पाणी साचले हाेते. आर्द्रता ९८ टक्के हाेती व ०.५ अंश वाढीसह ३० अंश तापमानाची नाेंद करण्यात आली.
दरम्यान, विदर्भात यवतमाळमध्ये सर्वाधिक पाऊस नाेंदविला गेला. याशिवाय अमरावतीमध्ये ४९ मिमी व त्या खालाेखाल चंद्रपूर जिल्ह्यात ४५.४ मिमी पाऊस नाेंदविला गेला. यासह अकाेला २३.७ मिमी, वर्धा १६.६ मिमी, वाशिम १६ मिमी, गडचिराेली १० बुलडाणामध्ये ९ मिमी पावसाची नाेंद करण्यात आली. गाेंदिया जिल्ह्यात मात्र आज पावसाची जाेर कमी झाला व केवळ ७.२ मिमी पाऊस बरसला. दिवसाचे कमाल तापमान अकाेल्यामध्ये २८.६ अंश, अमरावती २७ अंश, बुलडाणा २४ अंश, चंदपूर २९.८ अंश, गडचिराेली २९.२ अंश, गाेंदिया २९.२ तर वर्धा २९ अंशाची नाेंद करण्यात आली. हवामान विभागाने पुढचे तीन दिवस नागपूरसह सर्व जिल्ह्यांमध्ये पावसाचा जाेर कायम राहणार असून भंडारा व चंद्रपूर जिल्ह्यात सतर्कतेचा इशारा दिला आहे.