फरार कैद्यांचे मिशन राजा गौस ?
By admin | Published: April 3, 2015 01:43 AM2015-04-03T01:43:06+5:302015-04-03T01:43:06+5:30
संघटित टोळीचा म्होरक्या राजा गौस याची ४ एप्रिल रोजी न्यायालयीन पेशी असून या दरम्यान त्याला कारागृहातून
नागपूर : संघटित टोळीचा म्होरक्या राजा गौस याची ४ एप्रिल रोजी न्यायालयीन पेशी असून या दरम्यान त्याला कारागृहातून फरार झालेले कच्चे कैदी पळवून नेण्याची शक्यता पोलिसांच्या गुप्तचर यंत्रणेने व्यक्त केल्याने न्यायालय आवारात कडेकोट बंदोबस्ताची आखणी करण्यात आली आहे. मंगळवारच्या पहाटे राजाच्या टोळीतील सत्येंद्र ऊर्फ राहुल राजबहादूर गुप्ता, बिशेनसिंग ऊर्फ फारूख ऊर्फ मुश्ताक उईके आणि सोएब खान ऊर्फ शिबू दानिश वलीमखान, असे तिघे पळून गेले. त्यांच्यासोबत अन्य गुन्ह्यातील आणखी दोघे पळून गेले.
राजा गौस आणि त्याचे साथीदार मध्य प्रदेशच्या लखनादौन कारागृहातून सुरक्षा रक्षकांवर हल्ला करून पळून गेले होते. पलायन केलेले कैदी पोलिसांवर हल्ला करून त्यांच्या रखवालीतील आपल्या साथीदारांना पळवून नेण्याच्या सवयीचे असल्याने राजा गौसच्या न्यायालयीन पेशी दरम्यान बंदोबस्ताची खास आखणी करण्यात आलेली आहे.
मोठा ताजबागच्या यासीन प्लॉट भागात राहणारा खतरनाक राजा ऊर्फ गौस अली वारीस अली ऊर्फ मुच्छू अली हा आंतरराज्यीय गुन्हेगार आहे. नागपुरात मागावर असलेल्या पोलिसांवर त्याने दोनवेळ गोळीबार केलेला आहे.
जानेवारी २०१३ रोजी नागपुरात आपल्या गुन्हेगारी कृत्याने दहशत निर्माण करून पसार झालेल्या राजा गौस, बिशेनसिंग, जग्गासिंग, इमरान खान, सोनू पौनीकर, अशा पाच जणांना शहर गुन्हेशाखेच्या पथकाने २९ मे २०१३ रोजी उत्तर प्रदेशच्या लखीमपूर येथून अटक करून नागपुरात आणले होते. यापूर्वी पथकाने राजा गौसचे खास साथीदार शोएबखान आणि मोहीन अन्सारी यांना अटक केली होती.
अटकेपूर्वी राजा गौसच्या टोळीने ११ जानेवारी २०१३ रोजी पिस्तुलातून गोळीबार करून नंदनवन भागातील हिवरीनगर येथील महालक्ष्मी ज्वेलर्स लुटले होते. मोठे घबाड हाती लागेल अशा हेतूने दिवसाढवळ्या २.४५ वाजताच्या सुमारास हा दरोडा घालण्यात आला होता. परंतु २५ हजाराचेच सोन्याचे दागिने त्यांच्या हाती लागले होते. पळून जाताना त्यांनी मोबाईल फोन आणि लोखंडी तिजोरीवर ठेवलेले सीसीटीव्ही यंत्र पळवून नेले होते. याशिवाय त्यांनी दुकानाच्या बाहेर बसलेल्या नोकरावर गोळीबार केला होता. नंदनवन पोलिसांनी भादंविच्या ३०७ आणि ३९५ कलमान्वये गुन्हा दाखल केला होता.
या गुन्ह्याचा आधार घेऊन सक्करदरा विभाग सहायक पोलीस आयुक्ताने पहिल्यांदाच राजा गौस टोळीविरुद्ध मोक्काची कारवाई केली होती. यात राजा गौस, कारागृहातून पळून गेलेले तिघे, इमरानखान ऊर्फ जुनेद इस्माईल खान आणि राकेश यांचा समावेश करण्यात आला होता. त्यापैकी राकेश हा अद्यापही गवसलेला नाही.
मोक्काच्या या प्रकरणात भंडारा, घुमा, लखनादौन, जरीपटका, पाचपावली आणि नंदनवन पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याचा समावेश करण्यात आला होता.आहे. या गुन्ह्यांपैकी राजा गौस हा पाच, सत्येंद्र गुप्ता हा चार, बिशेनसिंग हा एका तर सोएबखान हा दोन गुन्ह्यात आरोपी आहे.
आरोपींविरुद्ध मोक्का न्यायालयात दोषरोप निश्चित झाल्यानंतर एका आरोपीने स्वत:चा वकील हजर न केल्याने खटल्याची सुनावणी तूर्त टळली.
न्यायालयाने पुढची तारीख ४ एप्रिल २०१५ दिली. परंतु महत्त्वाचे तीन आरोपी पळून गेल्याने हे प्रकरण वांध्यात आले आहे. तरीही शनिवारी नियमित न्यायालयीन पेशीसाठी राजा गौसला न्यायालयात हजर केले जाणार आहे. मोक्काच्या या प्रकरणाशिवाय गौसविरुद्ध आठ प्रकरणे न्यायप्रविष्ट करण्यात आलेली आहेत. त्यात इमामवाडा हद्दीतील उंटखाना येथे झालेल्या समरीत या तरुणाच्या खुनाचा समावेश आहे.
ही घटना १७ एप्रिल २०१३ रोजी घडली होती. इतवारी भागात राहणारा समरीत हा मोटरसायकलने आपल्या प्रेयसीसोबत जात असताना त्यांचा पाठलाग करून गौस आणि सत्येंद्र गुप्ताने पिस्तुलातून गोळी झाडून त्याला ठार केले होते. (प्रतिनिधी)