राजा, राणी व राजकुमारही ठरले राजभवनचे गुलाब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2018 11:35 PM2018-11-23T23:35:16+5:302018-11-23T23:36:20+5:30
गोष्ट फुलांची केली आणि गुलाबाचा उल्लेख होणार नाही तर नवलचं. गुलाब पुष्पाचे लोभसवाणे रूप कुणालाही आकर्षित करणारे. म्हणून सौंदर्यवतीच्या सौंदर्यालाही गुलाबाची उपमा आणि राजबिंड्या राजाच्या रुबाबदार रूपालाही गुलाबाच लेणं. तर या पुष्पराजाचा विषय निघण्यासाठी कारण ठरले ते दहाव्या अॅग्रोव्हिजन प्रदर्शनामध्ये असलेल्या फ्लॉवर शोच्या निमित्ताने. या शोमध्ये लक्ष वेधत होते ते विविध प्रकारातील गुलाबपुष्प. यातही भाव खावून गेले ते राजभवनतर्फे ठेवलेले गुलाब. गुलाबाचा राजा, गुलाबाची राणी आणि गुलाब राजकुमार हे तिन्ही पुरस्कार राजभवनच्या गुलाबपुष्पांनी मिळविले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गोष्ट फुलांची केली आणि गुलाबाचा उल्लेख होणार नाही तर नवलचं. गुलाब पुष्पाचे लोभसवाणे रूप कुणालाही आकर्षित करणारे. म्हणून सौंदर्यवतीच्या सौंदर्यालाही गुलाबाची उपमा आणि राजबिंड्या राजाच्या रुबाबदार रूपालाही गुलाबाच लेणं. तर या पुष्पराजाचा विषय निघण्यासाठी कारण ठरले ते दहाव्या अॅग्रोव्हिजन प्रदर्शनामध्ये असलेल्या फ्लॉवर शोच्या निमित्ताने. या शोमध्ये लक्ष वेधत होते ते विविध प्रकारातील गुलाबपुष्प. यातही भाव खावून गेले ते राजभवनतर्फे ठेवलेले गुलाब. गुलाबाचा राजा, गुलाबाची राणी आणि गुलाब राजकुमार हे तिन्ही पुरस्कार राजभवनच्या गुलाबपुष्पांनी मिळविले.
या फ्लॉवर शोमध्ये शहरातील जवळपास ५०० शासकीय, अशासकीय संस्था, खासगी नर्सरीचालक व पुष्प संगोपन करणाऱ्या नागपूरकरांनी सहभाग घेतला आहे. गुलाब पुष्पांच्या सर्वाधिक २५० प्रवेशिका येथे आलेल्या आहेत. मात्र लक्ष वेधले ते राजभवनतर्फे ठेवलेल्या गुलाब पुष्पांनी. राजभवन म्हणजे शहराच्या मध्यभागी असलेले देशातील सर्व अति महत्त्वाच्या व्यक्तींचे निवासस्थान. या राजभवनमध्ये प्रभारी अधिकारी रमेश येवले यांच्या पुढाकाराने सुंदर असे गुलाब पुष्प उद्यान निर्माण झाले, ज्यामध्ये गुलाबाच्या जवळजवळ २५० प्रजातींची १७५० रोपटी लावण्यात आली होती. जुनी झालेली पूर्वीची रोपटे काढून यावर्षी आॅगस्ट महिन्यात नव्याने तेवढ्याच रोपट्यांची लागवड करण्यात आली. याच गुलाब उद्यानातील पहिल्या बहरातील गुलाबांचा समावेश या फ्लॉवर शोमध्ये करण्यात आला. आतापर्यंत केवळ अतिविशिष्ट व्यक्तींना मोहित करणाऱ्या या फुलांनी प्रदर्शनाला भेट देणाऱ्या नागरिकांची मने जिंकली आणि मनासोबत बक्षिसेही जिंकली. पहिल्या तिन्ही क्रमांकासह १८ बक्षिसे राजभवनच्या गुलाब फुलांनी जिंकली.