कळमन्यात घाणीचे साम्राज्य, प्रशासकाचे स्वच्छतेकडे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:07 AM2021-05-20T04:07:58+5:302021-05-20T04:07:58+5:30

- रोगराई वाढण्याची शक्यता : सर्वच रस्त्यावर कचऱ्याचे ढीग नागपूर : कळमन्यातील सातही बाजारपेठांमध्ये दररोज कचरा उचलला जात नसल्याने ...

The kingdom of filth in Kalamanya, the administrator's disregard for cleanliness | कळमन्यात घाणीचे साम्राज्य, प्रशासकाचे स्वच्छतेकडे दुर्लक्ष

कळमन्यात घाणीचे साम्राज्य, प्रशासकाचे स्वच्छतेकडे दुर्लक्ष

Next

- रोगराई वाढण्याची शक्यता : सर्वच रस्त्यावर कचऱ्याचे ढीग

नागपूर : कळमन्यातील सातही बाजारपेठांमध्ये दररोज कचरा उचलला जात नसल्याने घाणीचे साम्राज्य पसरले आहे. सर्वच रस्त्यावर कचऱ्याचे ढीग दिसत आहेत. याकडे कळमना कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक राजेश भुसारी यांचा अधिकारी व कर्मचाऱ्यांवर वचक नसल्याने बाजारात सर्वत्र घाण पसरली असल्याचा आरोप बाजारातील सर्व असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांचा आहे.

सदर प्रतिनिधीने कळमना बाजारपेठांची पाहणी केली असता भाजी, फळ, मिरची आणि धान्यबाजारात सर्वत्र कचऱ्याचे ढीग दिसून आले. कचरा दररोज उचलला जात असल्याचे कर्मचाऱ्यांचे मत आहे. याकरिता कंत्राट दिल्याची माहिती आहे. त्यानंतरही कचऱ्याचा ढीग साचून राहणे म्हणजे प्रशासकाचा ढिसाळपणा आहे. बाजार समितीचे अधिकारीही याकडे दुर्लक्ष करीत असल्याने बाजारात कोरोना वाढीसह रोगराईची समस्या वाढली आहे. बाजार समिती खरेदीदारांकडून १.०५ रुपये सेस वसूल करते. वर्षभरात जवळपास ३० कोटींचा सेस गोळा होतो. यातून बाजाराची साफसफाई करणे आवश्यक आहे. पण साफसफाई करणारी आणि त्यावर नियंत्रण ठेवणारी यंत्रणाच सुस्त असल्याने कळमना कृषी उत्पन्न बाजार समिती रोगराईचे मुख्य केंद्र झाल्याचा आरोप होत आहे. यासंदर्भात भुसारी यांच्याशी मोबाईलवर वारंवार संपर्क साधला असता, तो होऊ शकला नाही.

तेवढीच जबाबदारी अडतिया व व्यापाऱ्यांची

बाजारात कचरा साचू नये, याची जबाबदारी बाजार समितीची असली तरीही त्यापेक्षा जास्त जबाबदारी सर्वच बाजारातील अडतिया आणि व्यापाऱ्यांची आहे. सर्वांनी आपापल्या दुकानासमोरील घाण आणि कचरा एका ठिकाणी गोळा करावा. कचरा उचलून नेणारी यंत्रणा बाजार समितीकडे आहे. पण अडतिया आणि व्यापारी आपली जबाबदारी विसरतात. याकडेही कटाक्षाने लक्ष देण्याची गरज असल्याचे काही अडतिये आणि व्यापाऱ्यांनी सांगितले.

मुख्य गेट सुरू करा, चिखली गेट बंद करा

कळमना चौकातून कळमना बाजाराकडे येणारा अर्ध्या किमीचा सिमेंट रस्ता बनविताना तब्बल तीन ते चार वर्ष कळमन्याचे मुख्य गेट बंद होते. तेव्हा चिखली गेटवरून वाहतूक सुरू होती. या रस्त्यावरून वाहतूक सुरू झाल्यानंतर गेट सुरू झाले. आता एक महिन्यापासून मुख्य गेट प्रशासकाने पुन्हा बंद केले. त्यामुळे शेतकऱ्यांसह सर्वांना अर्धा किमी फिरून एकेरी मार्गावरून वाहतूक करावी लागते. गेट का बंद केले, हे एक कोडेच आहे. पोलिसांसोबतच्या आर्थिक व्यवहारामुळे मुख्य गेट बंद केल्याचा काही व्यापाऱ्यांचा आरोप आहे. गेट सुरू केल्यास वाहतूक सुरळीत होईल, असे व्यापाऱ्यांनी सांगितले.

चोरांचा सुळसुळाट, पोलिसांचे दुर्लक्ष

उन्हाळ्यात फळांची आवक मोठ्या प्रमाणात सुरू झाल्यानंतर चोरांचा सुळसुळाट वाढला आहे. रात्रंदिवस फळ चोरण्यासाठी चोरटे या भागात फिरत असतात. दररोज माल चोरीला जात असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान होते. तक्रारीनंतरही प्रशासक गंभीर नाहीत आणि पोलिसांना सूचनाही केल्या नाहीत. कळमना पोलीस ठाणे बाजारात असल्यानंतरही चोरट्यांवर नियंत्रण आणण्यात पोलीस अपयशी ठरले आहेत. आर्थिक व्यवहारामुळे हा प्रकार घडत असल्याचा व्यापाऱ्यांचा आरोप आहे.

Web Title: The kingdom of filth in Kalamanya, the administrator's disregard for cleanliness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.