मोरगाव-माैदा मार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 04:08 AM2021-01-02T04:08:44+5:302021-01-02T04:08:44+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क रेवराल : माेरगाव-धर्मापुरी-माैदा हा माैदा तालुक्यातील महत्त्वाचा व वर्दळीचा मार्ग आहे. दुरुस्तीअभावी या मार्गावर छाेटेमाेठे खड्डे ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
रेवराल : माेरगाव-धर्मापुरी-माैदा हा माैदा तालुक्यातील महत्त्वाचा व वर्दळीचा मार्ग आहे. दुरुस्तीअभावी या मार्गावर छाेटेमाेठे खड्डे तयार झाले असून, दिवसेंदिवस त्यांचा आकार वाढत आहे. शिवाय, गिट्टीही विखुरली आहे. या खड्ड्यांमुळे अपघातांसाेबतच वाहनांचे प्रमाण वाढत असल्याने या मार्गावरून प्रवास करणे अलीकडच्या काळात धाेकादायक झाले आहे.
हा मार्ग माैदा तालुक्यातील धर्मापुरी, तांडा, मोरगाव, रेवराल, खंडाळा, पिपरी, आष्टी, नवरगाव, चारबा, सुंदरगाव, मांगली (तेली), आजनगाव, धामणगाव, निमखेडा, अरोली या महत्त्वाच्या गावांसह अन्य २५ गावांना जाेडला आहे. दुरुस्तीअभावी हा मार्ग उंच-सखल झाला असून, रस्त्यावरील डांबर केवळ नावालाच शिल्लक राहिले आहे. साेबतच खड्डे तयार झाले असून, माेठ्या प्रमाणात गिट्टी विखुरली आहे. ही गिट्टी वाहनांच्या चाकांमुळे उडत असल्याने रस्त्यालगत व परिसरात उभ्या अथवा जात असलेल्या व्यक्तीला इजा हाेण्याची शक्यता बळावली आहे.
गिट्टीमुळे दुचाकी वाहने स्लीप हाेत असून, खड्ड्यांमुळे दुचाकी व चारचाकी वाहनांचे नुकसान हाेत आहे. पाऊस काेसळताच या रस्त्याला डबक्यांचे स्वरूप प्राप्त हाेते. रात्रीच्यावेळी वाहनचालकांना रस्त्यावरील खड्डे व्यवस्थित दिसत नसल्याने अपघातांना निमंत्रण मिळत आहे. खड्ड्यांमुळे जड व प्रवासी वाहन उलटून माेठा अपघात हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही. या मार्गावरून शेतमालाची वाहतूक केली जात असल्याने खड्ड्यांमुळे ताे खराब हाेत असून, त्याचा भुर्दंडही शेतकऱ्यांना साेसावा लागताे. नागरिकांना इतर गावांमध्ये व शहरात तसेच आठवडी बाजाराला जाण्यासाठी त्रास हाेत असल्याने या मार्गाची तातडीने दुुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी जिल्हा परिषदेचे सदस्य राधा अग्रवाल, माजी पंचायत समिती सदस्य मुकेश अग्रवाल यांच्यासह या मार्गावरील गावांमधील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व नागरिकांनी केली आहे.
....
१०.५७ काेटी रुपये मंजूर
मागील पंचवार्षिकमध्ये या मार्गाच्या रुंदीकरण व दुरुस्तीसाठी राज्य शासनाने १० काेटी ५७ लाख रुपये मंजूर केले हाेते. कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण करून कंत्राटही देण्यात आले. कार्यादेश काढण्यात आल्यानंतर कंत्राटदाराने कामाला सुरुवात केली. त्याने या मार्गाचे जवळपास सहा काेटी रुपयांचे काम पूर्ण केले. मात्र,, त्याला देयके देण्यात न आल्याने त्याने काम बंद केले. त्यानंतर या मार्गाच्या कामाला सुरुवात करण्यात आली नाही. त्यामुळे हा तिढा साेडवून कामाला गती देणे आवश्यक असल्याचेही जाणकार व्यक्तींनी सांगितले.