अन् रस्त्यावर उत्साहात साजरा झाला किन्नरचा हॅप्पी बर्थ डे.. !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 08:05 AM2021-06-16T08:05:48+5:302021-06-16T10:26:47+5:30

Nagpur News वेळ -मंगळवारी, सायंकाळी ४. ३० ते ५ वाजताची. स्थळ - रहाटे कॉलनी चाैक ते दीक्षाभूमी मार्गावरचा सिग्नल. येथे जमलेले किन्नर आनंदाश्रूना वाट मोकळी करून देतानाच ‘स्वप्नपूर्ती’ करणाऱ्या महिला-मुलांना लाख दुवा देत होते.

Kinnar ‘wish’ dream fulfillment ceremony; He was overwhelmed by the company of many | अन् रस्त्यावर उत्साहात साजरा झाला किन्नरचा हॅप्पी बर्थ डे.. !

अन् रस्त्यावर उत्साहात साजरा झाला किन्नरचा हॅप्पी बर्थ डे.. !

googlenewsNext
ठळक मुद्देव्यक्ती छोटी असो अथवा मोठी, स्त्री असो की पुरुष, अतिआनंद झाला की त्याच्या नेत्रातून आनंदाश्रू आपसूकच तरळतात. मान सन्मान, आपलेपणा मिळेल, अशी अपेक्षाच न बाळगणाऱ्या किन्नरांसाठी हा प्रसंग स्वप्नासारखाच होता. त्याचमुळे केवळ किन्नर इच्छाच नव्हे तर तिच्या समुदा

नरेश डोंगरे ।

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर - वेळ -मंगळवारी, सायंकाळी ४. ३० ते ५ वाजताची. स्थळ - रहाटे कॉलनी चाैक ते दीक्षाभूमी मार्गावरचा सिग्नल. येथे जमलेले किन्नर आनंदाश्रूना वाट मोकळी करून देतानाच ‘स्वप्नपूर्ती’ करणाऱ्या महिला-मुलांना लाख दुवा देत होते. विशेष म्हणजे, यावेळी त्या वाजवात तशा त्यांच्या नेहमीच्या टाळ्या नव्हत्या. आताच्या टाळ्यांना लयबद्ध शुभेच्छांची साथ होती. हॅप्पी बर्थ डे टू यू... चे गीत होते. सामाजिक भान राखणाऱ्या महिला-मुलांनी भर रस्त्यावर साजरा केलेल्या एका किन्नराच्या वाढदिवसाच्या या अनोख्या कार्यक्रमात अनेक अनाहूत पाहुणे सहभागी झाले होते. त्यांनी हा अनोखा कार्यक्रम आपल्या मोबाईलमध्ये व्हिडीओच्या रुपाने कैद करून क्षणात तो असंख्य व्हॉटस्ॲप ग्रुपवर व्हायरल केला होता अन् पहिल्यांदाच तिरस्काराऐवजी त्या बिचाऱ्यांच्या वाट्याला काैतुक आले होते.

तिरस्कृत अन् बहिष्कृत जीवन जगणारा घटक म्हणजे किन्नर ! त्याचे नुसते नाव जरी कानावर पडले तरी बहुतांश मंडळींचे नाकतोंड मुरडले जाते. पदोपदी उपेक्षा अन् तिटकारा सहन करत जगणारे किन्नर कधी रेल्वेत, कधी बाजारात तर कधी गर्दीच्या ठिकाणी फिरून आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी लढाई लढताना दिसतात. कोरोनाने गर्दी कमी केली. बाजाराला टाळे लावले अन् रेल्वेतही जागा नाकारली. त्यामुळे अलिकडे ही मंडळी सिग्नलवर टाळ्या वाजवत आपली सांज भागविताना दिसतात. अनेकजण त्यांना काही देण्याचे सोडा, ते नुसते जवळ जरी आले तरी अंग चोरून घेताना दिसतात. मात्र, तिरस्काराचा अनुभव घेणाऱ्या या समूहाची आजची सायंकाळ कमालीची मस्तानी ठरली. कोणताही गाजावाजा न करता रस्त्यावरच्या निराधार जीवांना मोफत जेवण वाटत फिरणाऱ्या सुषमा नागरे कांबळे, अनुश्री खोब्रागडे, विक्की गायधने, सूरज सोलंकी रोजच्या प्रमाणे मंगळवारी सायंकाळी ४.३० च्या सुमारास रहाटे कॉलनी चाैकाजवळ पोहचले. तेथे त्यांनी जेवणाची थाळी एका किन्नराच्या हातात ठेवली अन् तिच्या (की, त्याच्या ?)सह अवतीभवती असणाऱ्यांनी टाळ्या वाजवत या भोजनदान करणाऱ्या मंडळींना आशीर्वाद दिले. ‘इसका नाम ईच्छा है... इसका आज बर्थ डे है’, असेही सांगितले. त्यांनी हे सहज सांगितले. मात्र, भोजनदान देणाऱ्यांनी ते खूपच आस्थेने घेतले. लगेच बाजूच्या चाैकातून बर्थ डे केक बोलवून घेण्यात आला अन् सिग्नलच्या बाजूला, फूटपाथवर किन्नर इच्छाचा बर्थ डे साजरा करण्यात आला. फक्त ५ ते १० मिनिटांचाच हा कार्यक्रम. परंतू सिग्नलवर थांबलेल्या अनेकांना तो भावला. त्यांनी आपापली वाहने बाजूला थांबवून टाळ्या वाजवत इच्छासह तिच्यासोबतच्या किन्नरांना शुभेच्छा दिल्या. त्याचा व्हिडीओही बनविला. हा व्हिडीओ क्षणात अनेकांच्या मोबाईलवर पोहचला.

...दस लाख की दुआए लाैटाती है !

बालकाच्या नामकरण सोहळ्यापासून तो विविध आनंद सोहळ्यात किन्नरांना आशीर्वाद देण्यासाठी बोलवले जाते. त्यांचे तेवढे काम आटोपले की नंतर मात्र त्यांना आमंत्रित करणाऱ्यापासून तो कार्यक्रमात उपस्थित असलेल्यांपैकी बहुतांश मंडळी तुच्छ नजरेने बघतात. हा समूह मात्र ‘सदा खूश रहो’चा आशीर्वाद देत निघून जातो. कुणी एक शायर यांच्या बाबतीत म्हणतो...

“सिर्फ दस रुपये दिल से देके देखो,

उसे दस लाख की दुआए लाैटाती है!

किन्नर है साहाब जात उसकी,

दुसरोंकी खुशियों के लिये ही वो इबादत करके आती है !!

Web Title: Kinnar ‘wish’ dream fulfillment ceremony; He was overwhelmed by the company of many

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.