विदर्भातल्या दूध‘गंगे’साठी ‘किसान ते किसान तक’! तीन जिल्ह्यांत पायलट प्रोजेक्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2023 08:00 AM2023-05-11T08:00:00+5:302023-05-11T08:00:07+5:30
Nagpur News राष्ट्रीय दुग्धविकास मंडळ (एनडीडीबी), महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ आणि मदर डेअरीच्या वतीने ‘किसान ते किसान तक’ या संकल्पनेवर आधारित नागपूर, वर्धा आणि अमरावती जिल्ह्यांत तीन मायक्रो ट्रेनिंग सेंटर (एमटीसी) सुरू करण्यात आले आहेत.
जितेंद्र ढवळे
नागपूर : विदर्भात दुग्ध उत्पादनाचा ग्राफ वाढावा. येथील शेतकरी सक्षम व्हावा, यासाठी राष्ट्रीय दुग्धविकास मंडळ (एनडीडीबी), महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ आणि मदर डेअरीच्या वतीने ‘किसान ते किसान तक’ या संकल्पनेवर आधारित नागपूर, वर्धा आणि अमरावती जिल्ह्यांत तीन मायक्रो ट्रेनिंग सेंटर (एमटीसी) सुरू करण्यात आले आहेत. या केंद्रावर संबंधित जिल्ह्यात दूध उत्पादनात उल्लेखनीय कामगिरी बजावणारा शेतकरी इतर शेतकऱ्यांना दुग्ध उत्पादन वाढीचे धडे देतो आहे. गत वर्षभरात या केंद्रावर १३२९ शेतकऱ्यांना दुग्ध विकास आणि स्मार्ट पशुपालनाचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. यात जनावरांच्या चारा व्यवस्थापनासह स्वच्छ दूध संकलन अशा एकूण १२ घटकांवर शेतकऱ्यांना डेअरी फार्मवर प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण दिले जात आहे.
नागपूर जिल्ह्यात कामठी तालुक्यातील बिना येथील सचिन चिकनकर, वर्धा जिल्ह्यात जोगाहेट्टी येथील चंद्रशेखर आसोले तर अमरावती जिल्ह्यातील कामानापूर घुसळी येथील छाया देशमुख या तीन शेतकऱ्यांची एमटीसी सेंटरवर प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
काय आहे एमटीसी?
तंत्रज्ञानाच्या आधार घेत योग्य पद्धतीने दुग्ध उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांचा डेअरी फार्म म्हणजे एमटीसी. येथे शेतकऱ्यांना प्रात्यक्षिकाद्वारे स्मार्ट पशुपालन आणि दुग्ध उत्पादन वाढीचे धडे दिले जातात.
एका प्रगत दूध उत्पादकाने इतर शेतकऱ्यांना दुग्ध उत्पादनाचे प्रशिक्षण द्यावे. प्रशिक्षण अधिक तांत्रिक स्वरूपाचे न होता ते थेट फार्मवर व्हावे, हा या प्रकल्पाचा उद्देश आहे. प्रायोगिक तत्त्वावर तीन जिल्ह्यांत याला यश येताना दिसते आहे. केस स्टडीनंतर या प्रकल्पाची व्याप्ती विदर्भ आणि मराठवाड्यात वाढविण्याचा मानस आहे.
-डॉ. अनिल भिकाने, संचालक (विस्तार शिक्षण)
महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ
आदर्श डेअरी फार्म कसा असावा. या सर्व घटकांचा विचार करीत तीन एमटीसी सुरू करण्यात आले आहेत. हे केंद्र चालविणाऱ्या शेतकऱ्यांना कोल्हापूर आणि दिल्ली येथे प्रशिक्षण देण्यात आले आहे. याशिवाय एनडीडीबी, माफसू या संस्थांच्या मदतीने येथे अद्ययावत असा सेट उभारण्यात आला आहे. सध्या विदर्भातील ८ आणि मराठवाड्यातील ३ अशा ११ जिल्ह्यांतून रोज ३ लाख लिटर दूध मदर डेअरी संकलित करते. पुढील तीन वर्षांचे टास्क रोज ६ लाख लिटर असे आहे.
-डॉ. सचिन शंखपाल,
व्यवस्थापक, राष्ट्रीय दुग्धविकास मंडळ
मी रोज २०० लिटर दुधाचे उत्पादन घेतो. बिना येथील एमटीसीवर आतापर्यंत ५०० शेतकऱ्यांनी प्रशिक्षण घेतले आहे. दुग्ध उत्पादनाच्या तांत्रिक ज्ञानासह या प्रकल्पाच्या माध्यमातून रोजगारही मिळाला. शिवाय इतर शेतकऱ्यांच्या दुग्ध उत्पादनातही वाढ होत आहे.
-सचिन चिकनकर,
शेतकरी तथा प्रशिक्षक,
एमटीसी, बिना, ता. कामठी, जि. नागपूर