कुशच्या मारेकऱ्याची तिहेरी जन्मठेप कायमच
By admin | Published: March 12, 2016 03:13 AM2016-03-12T03:13:17+5:302016-03-12T03:13:17+5:30
बहुचर्चित नंदनवन येथील कुश कटारिया या शाळकरी मुलाच्या अपहरण व निर्घृण हत्येप्रकरणी सर्वोच्च न्यायायालयाचे न्यायमूर्ती ...
सर्वोच्च न्यायालय : आयुष पुगलियाची याचिका फेटाळली
नागपूर : बहुचर्चित नंदनवन येथील कुश कटारिया या शाळकरी मुलाच्या अपहरण व निर्घृण हत्येप्रकरणी सर्वोच्च न्यायायालयाचे न्यायमूर्ती पी. सी. घोष आणि न्या. अमितवा रॉय यांच्या खंडपीठाने आरोपीची विशेष अनुमती याचिका फेटाळून उच्च न्यायालयाने सुनावलेली तिहेरी जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवली.
आयुष नरेश पुगलिया (२५), असे आरोपीचे नाव असून तो नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हिवरी ले-आऊट शांतीनाथ अपर्टमेंट येथील रहिवासी आहे.
अतिरिक्त सत्र न्यायाधीश जी. जे. अकर्ते यांच्या न्यायालयाने ४ एप्रिल २०१३ रोजी आयुष पुगलिया याला भादंविच्या ३६४ कलमांतर्गत जन्मठेप, एक हजार रुपये दंड, ३०२ कलमांतर्गतही जन्मठेप आणि एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली होती. भादंविच्या २०१ (पुरावा नष्ट करणे) अंतर्गत दोन वर्षे सश्रम कारावास आणि एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली होती. जन्मठेपेच्या दोन्ही शिक्षा एकामागे एक भोगाव्या लागतील, असेही न्यायालयाने निकालपत्रात नमूद केले होते.
या शिक्षेला उच्च न्यायालयात आव्हान म्हणून आरोपी आयुष पुगलिया याने फौजदारी अपील दाखल केले होते. सरकार पक्ष आणि फिर्यादीकडून आरोपीच्या शिक्षेत वाढ करून फाशीची शिक्षा सुनावण्यात यावी यासाठी अपील दाखल करण्यात आले होते. २२ जून २०१५ रोजी न्यायालयाने दोन्ही अपील फेटाळून लावत सत्र न्यायालयाने आरोपीला सुनावलेली शिक्षा कायम ठेवली. या शिवाय भादंविच्या ३६४-ए कलमांतर्गत आणखी एका जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. आरोपी आयुष पुगलिया याला तिहेरी जन्मठेप सुनावण्यात आली होती.आयुष पुगलिया याने उच्च न्यायालयाने सुनावलेल्या तिहेरी जन्मठेपेच्या शिक्षेविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुमती याचिका दाखल केली होती. राज्य सरकारने आणि फिर्यादी प्रशांत कटारिया यांनी आरोपीच्या शिक्षेत वाढ करून फाशीची शिक्षा सुनावण्यात यावी, यासाठी विशेष अनुमती याचिका दाखल केली होती. या सर्व विशेष अनुमती याचिकांवर सुनावणी होऊन फेटाळण्यात आल्या.
अपहरण करून केली होती कुशची हत्या
कुशच्या मारेकऱ्याची तिहेरी जन्मठेप कायमच
नागपूर : आरोपी आयुष नरेश पुगलिया आणि आठ वर्षीय शाळकरी मुलगा कुश प्रशांत कटारिया हे नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हिवरी ले-आऊट येथील शांतिनाथ अपार्टमेंट या एकाच वसाहतीत राहत होते. दोघांचेही फ्लॅट आमोरासमोर होते. कुशचे वडील प्रशांत कटारिया हे कळमना येथे मिरची दलाल आहेत.
आयुषने दोन कोटी रुपयांच्या खंडणीसाठी ११ आॅक्टोबर २०११ रोजी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास खाऊचे आमिष दाखवून कुशचे अपहरण केले होते. अपहरणानंतर आरोपीने कुशची आई छाया हिला फोनवर दोन कोटीच्या खंडणीची मागणी करून कुशला ठार मारण्याची धमकी दिली होती.
आयुषने निष्पाप कुशला कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सूर्यनगर येथील लता मंगेशकर उद्यानानजीकच्या अर्धवट बांधकाम झालेल्या इमारतीमध्ये नेले होते. या ठिकाणी कुशच्या डोक्यावर विटेने प्रहार करून त्याचा निर्घृणपणे खून केला होता. त्यानंतर मृतदेह पाण्याच्या टाकीत टाकून आरोपी पसार झाला होता.
१२ आॅक्टोबर २०११ रोजी प्रशांत कटारिया यांनी नंदनवन पोलीस ठाण्यात आपला मुलगा कुशच्या अपहरणाची तक्रार नोंदवली होती. त्यानुसार नंदनवन पोलिसांनी आयुषविरुद्ध भादंविच्या ३६३, ३६४-ए, ३६८, १२०-ब कलमान्वये गुन्हा दाखल केला होता. लागलीच आयुषला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले होते. त्याने दिलेल्या कबुलीवरून १४ आॅक्टोबर रोजी कुशचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला होता. त्यानंतर भादंविच्या ३०२, २०१ या कलमांची वाढ करण्यात आली होती. पोलीस निरीक्षक सुनील जयस्वाल यांनी तपास करून न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. सत्र न्यायालयात हा खटला विशेष सरकारी वकील अॅड. उज्ज्वल निकम तसेच फिर्यादीच्या वतीने अॅड. राजेंद्र डागा यांनी चालविला होता. (प्रतिनिधी)