किशोरदांची डायरी, मधाळ गाणी अन् मिलिंद इंगळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2018 10:43 PM2018-02-03T22:43:37+5:302018-02-03T22:47:22+5:30
आयुष्यातील घटना, प्रसंगांना ऐकण्याची उत्सुकता प्रेक्षकांना नेहमीच असते. ही संधी प्रसिद्ध गायक मिलिंद इंगळे यांनी नागपूरकरांना उपलब्ध करून दिली अन् ‘आज मुझे कुछ कहना हैं’ या संपूर्ण संहिताबद्ध कार्यक्रमाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : हरहुन्नरी अभिनेता, गीतकार, संगीतकार, निर्माता, दिग्दर्शक, पटकथालेखक आणि अतरंगी गायक अशा अनेक भूमिका एकाचवेळी जगणारा औलिया म्हणजे किशोर कुमार. अगदी दंतकथा ठरावी असे त्याचे आयुष्य. म्हणूनच त्याच्या आयुष्यातील घटना, प्रसंगांना ऐकण्याची उत्सुकता प्रेक्षकांना नेहमीच असते. ही संधी प्रसिद्ध गायक मिलिंद इंगळे यांनी नागपूरकरांना उपलब्ध करून दिली अन् ‘आज मुझे कुछ कहना हैं’ या संपूर्ण संहिताबद्ध कार्यक्रमाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. इनरव्हाईस प्रोडक्शनतर्फे शनिवारी डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात सादर झालेल्या या अभिनव कार्यक्रमात किशोरदांची काल्पनिक डायरी, त्यांनी गायलेली मधाळ गाणी अन् त्या गाण्यांना मिलिंद इंगळेंच्या आवाजाचा साज अशी ही जुगलबंदी मस्त रंगली. ‘आज मुझे कुछ कहना हैं’ या गीताने मिलिंद यांनी कार्यक्रमाचा प्रारंभ केला. यानंतर लगेच ‘एक लडकी भिगी भागीसी...’ हे उडत्या चालीतील किशोरदांचे गाणे त्यांनी खास त्यांच्या स्टाईलमध्येच सादर केले. ‘ख्वाब हो तुम या कोई हकिकत...’,‘नखरेवाली...’ ‘इना मिना डिका...’ ‘रूप तेरा मस्ताना...’या गाण्यांनी माहोल केला. संथचालीतील ‘चिंगारी कोई भडके...’‘कहेना हैं...’ या गाण्यांनाही श्रोत्यांची खास दाद मिळाली. आरजे दिलीप यांनी किशोरदांच्या काल्पनिक डायरीतून त्यांच्या आयुष्यातील अनेक अस्पर्शित पैलू उलगडून दाखवले. मिलिंद इंगळेंना आॅक्टोपॅडवर महेंद्र वातूलकर, तबला-प्रशांत नागमोते, कि-बोर्ड- परिमल जोशी, लिड गिटार-गौरव टाकसाळे तर बेस गिटारवर रॉबिन व्हिलियम्स यांनी सुरेल सहसंगत केली.