"किशोर गजभिये राजीनामा देईनात, पटोले कारवाई करेनात", काँग्रेसमधूनच पाठबळ असल्याची शंका
By कमलेश वानखेडे | Published: April 1, 2024 01:39 PM2024-04-01T13:39:25+5:302024-04-01T13:39:40+5:30
२०१९ मध्ये किशोर गजभिये यांनी रामटेकची जागा काँग्रेसकडन लढविली होती.
नागपूर : रामटेक लोकसभा मतदारसंघात बंडखोरी करणारे काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष किशोर गजभिये यांनी आता यु टर्न घेत आपण पक्षाचा राजीनामा देणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. विशेष म्हणजे नरेंद्र जिचकार यांच्यावर तत्काळ कारवाईसाठी ग्रीन सिग्नल देणारे प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी काँग्रेससाठी प्रतिष्ठेची जागा असलेल्या रामटेकमध्ये बंडखोरीनंतरही अद्याप गजभिये यांच्यावर कारवाईसाठी पुढाकार घेतलेला नाही. त्यामुळे पक्षातूनच तर गजभिये यांना पाठबळ नाही ना, अशी शंका निर्माण झाली आहे.
२०१९ मध्ये किशोर गजभिये यांनी रामटेकची जागा काँग्रेसकडन लढविली होती. त्यावेळी शिवसेनेचे कृपाल तुमाने यांनी मोठ्या फरकाने त्यांचा पराभव केला. यावेळी गजभिये पुन्हा उमेदवारीसाठी इच्छुक होते. पण पक्षश्रेष्ठींनी माजी मंत्री सुनील केदार यांच्या आग्रहास्तव जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष रश्मी बर्वे यांची उमेदवारी निश्चित केली. पण रश्मी बर्वे यांचे जात वैधता प्रमाणपत्र रद्द ठरल्यामुळे ऐनवेळी त्यांचे पती श्यामकुमार बर्वे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. यामुळे नाराज झालेले किशोर गजभिये अपक्ष म्हणून रिंगणात आहेत.
अर्ज दाखल केल्यानंतर गजभिये यांनी आपण काँग्रेस पक्षाचा राजीनामा देणार असल्याचे सांगितले होते. आता मात्र आपण स्वत:हून काँग्रेसचा राजीनामा देणार नाही. काँग्रेस पक्षाने हवी ती कारवाई करावी, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. गजभिये म्हणाले, मी काँग्रेस पक्षाचे प्रामाणिकपणे काम केले. मी पदवीधर मतदारसंघात २० हजार मते घेतली होती. ती मते माझ्यामुळे काँग्रेसच्या उमेदवाराला मिळाली. मी सक्षम व पात्र उमेदवार होतो. माझा पर्यायी उमेदवार म्हणूनही विचार केला नाही, याचे वाईट वाटते. काँग्रेसने मला अपक्ष उमेदवार म्हणून लढण्यास भाग पाडले. मी बंडखोरी केलेली नाही, असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, गजभिये यांच्या बंडखोरीची दखल घेत प्रदेश काँग्रेसने अद्याप कारवाई केलेली नाही. काँग्रेस उमेदवार श्यामकुमार बर्वे यांच्या समर्थक पदाधिकाऱ्यांनी काँग्रेस पक्षाच्या शिस्तपालन समितीकडे गजभिये यांची तक्रार केली असून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.